ज्येष्ठ गायक, अभिनेते रामदास कामत यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३१ रोजी म्हापसा येथे झाला.
व्यावसायिक मराठी संगीत रंगभूमीवर अभिनेता आणि गायक म्हणून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे आपली नाममुद्रा केवळ नाटय़संगीतावरच नव्हे तर भावसंगीत, चित्रपट संगीत आणि लोकसंगीतावरही ज्यांनी तेवढय़ाच समर्थपणे उमटविली व ज्यांची गाणी आज इतक्या वर्षांनंतरही रसिकांच्या स्मरणात आणि ओठावर आहेत ते रामदास कामतहे मूळचे गोव्याचे.
मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले पंडित रामदास कामत लहानपणीपासून वडिल बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या कामत यांनी नाट्यसंगीताचेही शिक्षण घेतले. पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरच प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या हाताखाली त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. तर यशवंत देवांकडून त्यांनी भावगीत शिकून घेतले. संगीताचा गाढा अभ्यास केलेल्या पंडित रामदास कामत यांनी धि गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरूवात केली होती.
कामत मुंबईला येऊन अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. पण त्यांच्या मनात गाणे कायम रुंजी घालत होते. तरी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही. नोकरी सांभाळूनच ते आकाशवाणीवर गात आणि जमेल तेव्हा संगीत नाटकांत कामे करीत. १९६४साली आलेल्या ‘मत्स्यगंधा’ नाटकाने रामदास कामत यांचे नाव घराघरांत पोहोचले आणि पुढे ते गायक अभिनेते म्हणूनच प्रसिद्धीस आले. पाठोपाठ नाटक ‘ययाती देवयानी’ आले आणि ‘सर्वात्मका सर्वेश्वरा…’ ही त्यांची प्रार्थना अजरामर झाली. पुढे ‘धन्य ते गायनी कळा’, ‘मीरामधुरा’, ‘हे बंध रेशमाचे’ अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका व पदे गाजली.
नंतर रामदास कामत यांनी ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्रा’, ‘धन्य ते गायनी कळा’, ‘मदनाची मंजिरी’, ‘मानापमान’, ‘मीरा मधुरा’, ‘मृच्छकटिक’, ‘शारदा’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सौभद्र’, ‘स्वरसम्राज्ञी’, ‘होनाजी बाळा’ आदी संगीत नाटकांतून कामे केली. ही सर्व नाटके आणि त्यातील गाणी गाजली. पण त्यातही ‘मत्स्यगंधा’ व ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकांनी त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली. ‘मत्स्यगंधा’ नाटकात त्यांनी ‘पराशर’ तर ‘ययाति आणि देवयानी’ नाटकात ‘कच’ या भूमिका साकारल्या. या दोन्ही नाटकांतील ‘गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘नको विसरु संकेत मीलनाचा’, ‘साद देती हिमशिखरे’ (सर्व मत्स्यगंधा) तसेच ‘तम निशेचा सरला’, ‘प्रेम वरदान स्मरत राहा’ (ययाति आणि देवयानी) ही त्यांची नाटय़पदे गाजली. कामत यांनी गायलेली ‘अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे’, ‘जन विजन झाले’, ‘बहुत दिनी नच भेटलो सुंदरीला’, ‘श्रीरंगा कमला कांता’ ही गाणीही रसिकांच्या स्मरणात आहेत.
‘मुंबईचा जावई’ या चित्रपटासाठी त्यांनी गायलेल्या ‘प्रथम तुज पाहता जीव वेडावला’ या गाण्याची लोकप्रियता आजही तसूभर कमी झालेली नाही. या गाण्याविषयी बोलताना कामत एका मुलाखतीत म्हणतात, गायक व संगीतकार सुधीर फडके यांचा मला दूरध्वनी आला आणि त्यांनी चित्रपटातील हे गाणे तुम्ही गावे असे सांगून रविवारी गाण्याचे ध्वनिमुद्रण करायचे आहे तर तुम्ही या, असे सांगितले. त्याच दरम्यान म्हणजे शनिवारी बार्शी येथे माझा गाण्याचा कार्यक्रम होता आणि रविवारी गाण्याचे ध्वनिमुद्रण करायचे असल्याने मी जमणार नाही म्हटले. पण सुधीर फडके यांनी कसेही करून हे जमवाच असा आग्रह धरला. मी त्यांना होकार दिला. शनिवारी बार्शीचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्रीच्या गाडीने मुंबईला परतायचे ठरवले. आरक्षण केलेले नसल्याने तिकीट काढून कसेबसे गाडीत चढलो. पुण्याला बसायला मिळाले. रात्रभर झोप झालेली नव्हती. माझा आवाज पार बसलेला होता. रविवारी दुपारी मुंबईत परतल्यानंतर फडके यांना मी आल्याचे सांगितले. गाण्याच्या ध्वनिमुद्रणासाठी गेलो. संगीतसाथीला वसंत आचरेकर (तबला), राम नारायण (सारंगी), प्रभाकर पेडणेकर (ऑर्गन) अशी मंडळी होती. माझा आवाज बसलाय, मी चांगले गाऊ शकणार नाही, असे सांगून पाहिले, पण ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी गाण्याचे ध्वनिमुद्रण करणे गरजेचे होते, कारण सोमवारी कोल्हापूरला त्या गाण्याचे चित्रीकरण होणार होते व त्यासाठी रविवारी रात्रीच ते गाणे कोल्हापूरला पाठवायचे होते. त्यामुळे गळ्याचे काही व्यायाम करून मी माझा बसलेला आवाज मोकळा केला आणि ते गाणे ध्वनिमुद्रित केले. ते गाणे आजही रसिकांच्या स्मरणात आहे. कामत यांनी नाटय़संगीतासह भावगीते, चित्रपट गीतेही गायली असून ‘एचएमव्ही’ कंपनीने त्यांच्या ६५ गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत.
‘मत्स्यगंधा’ नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे कामत यांचे ध्वनिमुद्रित झालेले पहिले गाणे. त्यांनी गायलेली ‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा’, ‘देवा तुझा मी सोनार’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’, ‘हे आदिमा हे अंतिमा’, ‘विनायका हो सिद्ध गणेशा’, ‘हे गणनायक सिद्धिविनायक’, ‘हे शिवशंकर गिरिजा तनया’ आदी भावगीते, चित्रपट गीतेही लोकप्रिय आहेत. तसेच रावणकृत शिवतांडव स्तोत्र हे रामदास कामत यांनी खड्या आवाजात गायलेले आहे. १९९७ साली त्यांनी रंगभूमीवरून ‘निवृत्ती घेतली.
Leave a Reply