स्नेहल भाटकरांचे नाव उच्चारले की जुन्या मंडळींना चटकन कभी तनहाईयों मे युँ, हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम च्या आवाजातील सदाबहार गीत आठवते. खरे तर हे गीत भाटकरजींना लतादीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते; पण ठरलेले असूनही लागोपाठ तीन दिवस लतादीदी तिथे फिरकल्याच नाहीत हे पाहून कोणतीही तक्रार न करता त्यांनी हे गाणे मुबारक बेगमच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले आणि मग पुढचा त्या गाण्याने जो इतिहास घडवला तो सर्वश्रुतच आहे. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव. त्यांचा जन्म १७ जुलै १९१९ रोजी झाला. त्यातील स्नेहल घेऊन केदार शर्मा ह्यांनी सुहागरात ह्या चित्रपटाच्या वेळी त्यांचे स्नेहल भाटकर असे नव्याने बारसे केले. नोकरीत म्हणजे आकाशवाणी मध्ये ते व्ही.जी भाटकर म्हणून वावरले तर भजनी मंडळात भाटकरबुवा म्हणून वावरले.
संगीतकार आणि गायक म्हणून कधी स्नेहल तर कधी वासुदेव भाटकर हे नाव घेऊन वावरले. स्नेहल भाटकर, भाटकर बुवा, व्ही.जी.भाटकर, वासुदेव भाटकर,बी वासुदेव! एकाच माणसाची ही अनेक.त्यांचे पूर्ण नाव वासुदेव गंगाराम भाटकर. आकाशवाणीच्या नोकरीत राहून देखिल संगीत दिग्दर्शनाचा व्यवसाय करता यावा म्हणून शोधलेला, नियमाला बगल देणारा हा मार्ग होतागोड गळ्याची देणगी त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली होती. त्या नंतर श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच आजुबाजुच्या त्या परिसरात नियमितपणे भजनं चालत, त्यातही ते उत्साहाने भाग घेत आणि “ह्यातूनही आपण बरेच शिकलो” असे ते प्रांजळपणे नमूद करतात. ह्या भजनांचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसतो की ज्यामुळे त्यांचा स्वभाव अतिशय निगर्वी आणि समाधानी झाला.कलेच्या ह्या क्षेत्रात ते अजातशत्रू राहिले ते ह्याच स्वभावामुळे. म्हणूनच आयुष्यभर त्यांनी ह्या भजनांची साथ कधीच सोडली नाही. भजनी मंडळात ते भाटकरबुवा म्हणूनच प्रसिद्ध होते. १९३९ साली त्यांनी एच.एम.व्हीत पेटीवादक म्हणून नोकरी पत्करली पण पुढे आपल्या स्वत:च्या कुवतीवर ते संगीतकार म्हणून नावारुपाला आले. १९४४ च्या सुमारास बाबुराव पेंटर ह्यांच्या रुक्मिणी स्वयंवर ह्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांची सुधीर फडके ह्यांच्याबरोबरीने निवड झाली आणि मग वसुदेव-सुधीर ह्या नावाने त्या चित्रपटाला त्या दोघांनी संगीत दिले.गंमत म्हणजे ह्यांतील भाटकरांनी संगीत दिलेली काही गाणी बाबुजींच्या पत्नी ललिता फडके ह्यांनी गायलेली होती.
केदार शर्मा ही व्यक्ती भाटकरबुवांच्या आयुष्यातील एक अती महत्वाची व्यक्ती होती. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात केदार शर्मांनी बुवांना जो हात दिला त्याचा विसर कधीही पडू न देता केदार शर्मांच्या पडत्या काळातही पैसे न घेता बुवांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिलंय.बुवांचे वैषिष्ठ्य हे की त्यांनी राज कपूरने पहिल्यांदाच नायक म्हणून काम केलेल्या नीलकमल ह्या चित्रपटातील त्याच्या तोंडच्या गाण्यासाठी आपला आवाज उसना म्हणून दिलेला आहे.ह्या चित्रपटाचे संगीतकार देखिल ते स्वत:च होते. इथे त्यांनी बी वासुदेव हे नाव धारण केलेले होते.तसेच मधुबाला,तनुजा,गीताबाली,नूतन इत्यादिंच्या चित्रपट पदार्पणातील पहिल्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय.आधी नायिका म्हणून गाजलेल्या आणि नंतर निर्मात्या बनलेल्या कमळाबाई मंगरुळकर,कमला कोटणीस,शोभना समर्थ वगैरे स्त्री निर्मात्यांच्या पहिल्या चित्रपटांनाही बुवांनीच संगीत दिलंय. नीलकमल, सुहागरात, हमारी बेटी, गुनाह,हमारी याद आयेगी,प्यासे नैन,भोला शंकर, आजकी बात,दिवाली की रात,पहला कदम इत्यादि हिंदी चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत खूपच गाजलंय. तसेच मराठीतील रुक्मिणी स्वयंवर,चिमुकला पाहुणा,नंदकिशोर,मानला तर देव,बहकलेला ब्रह्मचारी इत्यादि चित्रपटांचे संगीतही विलक्षण गाजलंय.नंदनवन,राधामाई,भूमिकन्या सीता,बुवा तेथे बाया इत्यादि नाटकांचे संगीतही चांगलेच गाजलेय. स्नेहल भाटकर यांचे २९ मे २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. प्रमोद देव
Leave a Reply