ज्येष्ठ गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांचा जन्म १४ मार्च १९६३ रोजी झाला.
रघुनंदन पणशीकर यांचा जन्म वेदशास्त्रसंपन्न घराण्यातला. ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर हे त्यांचे वडील, तर वेदशास्त्रसंपन्न असे दाजी पणशीकर हे त्यांचे काका होत. तेव्हा ‘कला’ आणि ‘संस्कृत’ या दोन्ही गोष्टी त्यांच्या घरात होत्याच. प्रभाकर पणशीकर यांची ‘नाट्यसंपदा’ नावाची नाटक कंपनी होती.
गाणं शिकावं, असं त्यांच्या मनात खरंतर कधीच नव्हतं. मात्र, योगायोग माणसाला वेगळ्या वाटेवरून घेऊन जात असतात. ‘गुरुगृही १२ वर्षं राहून गुरूची सेवा करायची’ एवढंच रघुनंदन पणशीकर यांच्या मनात तरुणपणी होतं. गुरुसेवेचं महत्त्व त्यांचे वडील आणि काका दोघांनीही त्यांच्यावर लहानपणापासूनच ठसवलं होतं. सुरवातीच्या काळात रघुनंदन पणशीकर हे वसंतराव कुलकर्णी यांच्याकडं काही काळ गाणं शिकत होते. तसेच त्यांनी पं. जसराज आणि पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्याकडे त्यांनी गाण्याचे शिक्षण घेतले. पण किशोरी अमोणकर यांच्याकडेच शिकायचे, हे त्यांच्यासाठी विधिलिखित होते.
रघुनंदन पणशीकर हे ज्येष्ठ गायिका किशोरी अमोणकर यांच्या खास शिष्या पैकी एक होय.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी गाणे शिकण्यासोबत‘नाटय़संपदा’ संस्थेचे काम पाहावे असे ठरवले होते. त्या वेळी ‘नाट्यसंपदा’द्वारे ‘तुझी वाट वेगळी’ हे संगीत-नाटक करायचं ठरलं होतं. त्याचे संगीत दिग्दर्शन ज्येष्ठ गायिका किशोरी अमोणकर करत होत्या. तेव्हा ‘नाट्यसंपदाचा माणूस’ म्हणून रघुनंदन पणशीकर हे किशोरीताईंना मदतनीस या नात्यानं काम करत होते. एकदा त्या कुणालातरी गाणं शिकवत होत्या; पण समोरच्या व्यक्तीला ते काही जमत नव्हतं. मी तिथंच बसलेला असल्यानं रघुनंदन पणशीकर यांच्या कडं वळून किशोरीताईनी पटकन विचारलं : ”तू पण गाणं शिकतोस ना रे?” मग किशोरीताई त्या व्यक्तीला जे काही शिकवत होत्या, तेच त्यांनी रघुनंदन यांनाही म्हणून दाखवायला सांगितलं. त्यांनी ते त्या वेळी अगदी सहजतेनं गाऊन दाखवलं. कारण, त्या वेळी ते किशोरीताईंकडं शिकत नसल्यानं त्यांच्यासमोर गाऊन दाखवण्याबाबतचं कसलंच दडपण त्यांच्यावर नव्हतं! रघुनंदन यांनी गायलेलं त्यांनी ऐकलं आणि त्या लगेचच म्हणाल्या : ”तू आज संध्याकाळपासूनच माझ्याकडं गाणं शिकायला ये.” आणि अशा प्रकारे किशोरीताई या रघुनंदन यांना गुरू लाभल्या. या सर्वात त्यांना घरच्यांचाही पाठिंबा होता.
रघुनंदन पणशीकर हे किशोरीताईंकडं एक तपच नव्हे, तर तब्बल वीस वर्षं गाणे शिकले. आलापी ही किशोरीताईंची खासियत होती. आलापी कशी विकसित करत न्यायची, हे रघुनंदन यांना त्यांच्या कडून खास शिकता आली.
किशोरीताईंनी त्यांना गझल, मराठी-हिंदी भजनं, कानडी संगीतही शिकवलं. आपल्या शिष्यांचा आवाज चौफेर कसा तयार होईल, याकडं त्यांचं लक्ष असायचं.
रघुनंदन पणशीकर यांनी आपली पहिली व्यावसायिक मैफल १९८४ मध्ये केली होती. त्या वेळी त्यांनी राग भूप सादर केला होता. सिंग बंधूंच्या ‘सूरशृंगार’ या संस्थेच्या कार्यक्रमात त्यांना पाऊण तास गाण्याची संधी मिळाली होती. मुंबईत बिर्ला मातोश्री सभागृहातही गाण्याची संधी रघुनंदन पणशीकर यांना मिळाली होती. त्या मैफिलीला किशोरीताई उपस्थित होत्या. त्यांना ती मैफल खूप आवडली व त्यांनी रघुनंदन यांना त्याबद्दल शाबासकीही दिली. गेल्या आठ वर्षांपासून रघुनंदन पणशीकर यांनी ‘गानसरस्वती महोत्सव’ सुरू केला आहे. किशोरीताईंच्या गानकर्तृत्वाला मानवंदना म्हणून हा महोत्सव साजरा केला जातो. अनेक दिग्गजांनी या महोत्सवात आपली कला सादर केली आहे. किशोरीताईंच्या कृपेनं हा महोत्सव सुरू झाला असून, तो पुढंही सुरूच राहील.
पंडित रघुनंदन पणशीकर यांनी भारतातील शहरांव्यतिरिक्त युरोप, अमेरिका आणि आखाती देशांतील श्रोत्यांना आपल्या गायकीने मंत्रमुग्ध केलेले आहे.
रघुनंदन पणशीकर यांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार व २०१७ मध्ये बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा देवगंधर्व भास्करबुवा बखले पुरस्कार मिळाला आहे. या सोबतच त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. या सोबतच रघुनंदन पणशीकर नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त म्हणून काम बघतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply