ज्येष्ठ गायक पंडित विजय सरदेशमुख यांचा जन्म २३ जून १९५२ रोजी झाला.
विजय सरदेशमुख यांचे वडील पं.विठ्ठलराव सरदेशमुख हे गायक आणि पेटीवादक आणि संगीत व संस्कृतचे उत्तम जाणकार आणि शिक्षक. घरातूनच विजय सरदेशमुखांना संगीताचा वारसा लाभला.
पं.विठ्ठलराव सरदेशमुख हे पं.भीमसेनजींना साथ करीत असत, त्यामुळे घरी पं.भीमसेनजी, सुरेशबाबू माने, विदुषी माणिक वर्मा, पं. कुमार गंधर्व, पं.वसंतराव देशपांडे, विदुषी सिद्धेश्ववरी देवी अशा अनेक सुप्रसिद्ध आणि अव्वल दर्जाच्या गायक मंडळींची उठबस आणि चर्चा, गायन ही नित्याची गोष्ट होती. वडील गायनाचे वर्गही घरातच घेत असत. त्यामुळे गायन, गायनाविषयी बोलणे हे विजय सरदेशमुख मन लावून ऐकत असत, ग्रहण करीत असत. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांचं वडिलांकडे गायनाचं शिक्षण सुरू झालं. त्या वेळच्या अकरावीमध्ये संगीत विषय घेऊन त्यात ते पहिले आले. बाराव्या वर्षी कुमारांना प्रथम तानपुऱ्यावर साथ केली. तेव्हापासून त्या झंकारणार तानपुऱ्यांची आणि गायकीची ओढ त्यांना लागली. वडील किराणा घराण्याचे विचार, गायकी अनुसरत असूनही कुमारांकडे शिकायला त्यांनी काहीच हरकत घेतली नाही हा त्यांचा विशेष! दहाव्या वर्षांपासूनच विजयजींनी रेडिओवर गायन सुरू केलं. १९५४ सालापासून ते कुमारजींच्या मागे तानपुऱ्यावर साथ करत राहिले. तानपुऱ्यातून राग-संगीत कसं उमलत- फुलत जातं याचं जणू शिक्षणच या साथीतून मिळत गेलं.
विजय सरदेशमुखांची पहिली जाहीर मैफल झाली तीच मुळी विदुषी हिराबाई बडोदेकरांच घरी. १९७० सालापासून विजय सरदेशमुखांनी कुमारजींकडे गायन शिकायला सुरुवात केली. वर्षातून एखादेवेळेस राहून आणि बाकी वेळा जमेल तसं देवासला जाऊन उणीपुरी बावीस वर्षं ते कुमारजींकडून विद्या ग्रहण करीत राहिले. याच वेळेस कौटुंबिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्यानं बी.कॉम झाल्यावर लगेचच बँक ऑफ इंडियात नोकरी सुरू केली तीही जवळजवळ सत्तावीस वर्षं. एकीकडे नोकरी, प्रपंच सांभाळून अतिशय निष्ठेनं विद्याव्यासंग वाढवून त्यात खोलवर बुडी मारून स्वर- लयीचं ध्यान केलंअसं म्हटलं तर विजयजींच्या बाबतीत ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
मैफली, प्रसिद्धी, पुरस्कार, याची अजिबात फिकीर न करता एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणं स्वर-साधना करत रहाणं ही आजच्या काळात सोपी गोष्ट नाही. परंतु हा कलाकार स्वर-लयीत ध्यानस्थ राहिला, एखाद्या रागातील स्वरस्थान मनासारखं लागलं नाही तर मात्र हा कलाकार अस्वस्थ होत असे. एरवी मृदुभाषी, नम्र स्वभावाचे विजय सरदेशमुख मैफलीत मात्र आवश्यक तिथं अतिशय नाजूक नक्षीकाम आणि जरूर असेल तिथं अत्यंत आक्रमक आणि जोरकस, दाणेदार, गमकेच्या ताना घेऊ शकत. असंख्य पारंपारिक बंदिशी आणि कुमारांच्या बंदिशी, ख्याल, टप्पा, तराणा हे सगळेच सारख्याच समर्थतेनं गायचे ते. कुमारांच्या आक्रमक, चपळ गायकीत स्वविचारांची वेगळी भर घालून, आपली हळुवार गायकी ते उपज अंगानं खुलवीत नेत.
सवाई गंधर्व महोत्सव- पुणे, तानसेन समारोह- ग्वाल्हेर, घराना सम्मेलन- कोल्हापूर, तोडी महोत्सव- मुंबई, प्रयाग संगीत समिती- अलाहाबाद, विष्णु दिगंबर समारोह- दिल्ली, संगीत रिसर्च अकादमी- कोलकता आणि पुणे, मुंबईपासून सर्व प्रमुख शहरांत त्यांच्या मैफली झाल्या होत्या.
विशेष म्हणजे हा विद्यासंपन्न, सत्वशील कलावंत घरी मैफलीला बोलाविलं तर बिदागीची फिकीर न करता प्रेमानं आपलं निखळ संगीत ऐकवायचा. त्यांचं गाणं ऐकताना तुमचीही गानसमाधी लागून जायची. सुसूत्रता आणि उस्फूर्त पेशकश यांचा अनोखा संगम या गायकीत होता. आवर्तन भरणं म्हणजे काय हे त्यांच्याकडूनच शिकावं. ख्याल, ठुमरी, टप्पा, तराणा हे प्रकार तर ते तयारीनं आणि ताकदीनं ऐकवायचेच. पण त्यांचं निर्गुणी भजन एक अत्यंत वेगळी अशी पारलौकिक अनुभूती देतं.
रागसंगीताचं त्यांचं ज्ञान तर अतिशय संपन्न आहेच, पण भावसंगीत, चित्रपटसंगीत, त्यातले बारकावे देखिल ते उत्तम रीतीनं उलगडून सांगत असत. कित्येक वेळा पाऊण एक तास तानपुरा लावण्यात जायचा आणि त्यानंतरच शिकवणं सुरू व्हायचं. परंतु हा वेचक वेळ सार्थकी लागलेला असतो यात शंकाच नाही. मारवा, तोडी, ललत, देसी…. अशा अनेक रागांमधले सूक्ष्म स्वरभेद जाणून घ्यायचे म्हटलं तरी हा जन्म पुरणार नाही! संगीता इतकीच त्यांची तीव्र बुद्धिमत्ता सर्व प्रांतांत सारखीच चालायची. त्यांचं भाषाप्रभुत्व फार कमी लोकांना माहीतीय! संस्कृतमधली सुभाषितं, श्लोक त्यांना मुखोद्गत होते.
संस्कृतमधली कोणतीही शंका विचारली तरी तत्काळ निरसन होत असे. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कलाकार होते. विजय सरदेशमुख यांच्या गायनाच्या एचएमव्ही आणि अलूरकर म्युझिक हाऊसने ध्वनिफिती आणि सी.डी प्रकाशित केल्या आहेत. कुमारजींची गायकी युवा पिढीपर्यंत पोहोचवून त्यांनी अनेक शिष्य घडविले. त्यांना आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे २०११ साली वत्सलाबाई जोशी हा पुरस्कार मिळाला होता. तसेच वसंतराव देशपांडे पुरस्कार मिळाला होता.
विजय सरदेशमुख यांचे ५ ऑक्टोबर २०१९ रोजी निधन झाले.
— डॉ. शुभदा कुलकर्णी.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply