ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचा जन्म २४ जून १९२८ रोजी झाला.
पिण्याचे पाणी आणि महागाईच्या प्रश्नावरून आंदोलन करून सरकारला सळो की पळो करून सोडल्याने सामान्य जनतेत `पाणीवाली बाई’ आणि `लाटणेवाली बाई’ अशी झुंजार ओळख निर्माण केलेल्या मृणाल गोरे यांच्यावर त्या काळात ज्येष्ठ समाजवादी नेते साने गुरुजी, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, भाऊसाहेब रानडे यांचा प्रभाव पडला. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तमरीत्या पास होऊनही त्यांनी आपले शिक्षण थांबवून समाजकार्यात उतरण्याचा आपला मनोदय वडिलांसमोर जाहीर केला. त्यांचा हा निर्णय प्रचंड धक्कादायक होता. आंदोलन कार्यात असताना त्यांचा केशव गोरे ऊर्फ बंडू गोरे यांच्याशी परिचय होऊन १९४८ च्या सुमारास विवाह झाला. विवाहानंतर गोरेगावातील टोपीवाला बंगला हे त्यांचे निवासस्थान बनले. परंतु दुर्दैव असे की विवाहानंतर दहा वर्षांच्या आतच बंडू गोरे यांचे निधन झाले. त्यांच्या नितधनानंतर त्यांनी केशव गोरे स्मारक ट्रस्टची स्थापना केली.
झुंजार सामाजिक कार्यकर्त्या अशी मृणालताईंची ओळख होती. गर्भलिंग निदान चाचणीच्या विरोधातही त्यांनी वारंवार आंदोलने केली. राष्ट्रसेवादलासाठी त्यांनी वाहून घेतले होते. आणिबाणीविरोधात त्या आधी भूमिगत होऊन काम करत होत्या, नंतर त्यांना तुरूंगवासही झाला. १९७७ मध्ये जनता पार्टीच्या तिकिटावर त्या खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आल्या होत्या. महाराष्ट्रातल्या त्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यांनी स्त्री अत्याचारविरोधात प्रत्येक वेळी आवाज उठवला. काही वेळा तर प्रस्थापित प्रथेविरोधातही त्यांनी दोन हात केले. राजस्थानातील रूपकंवर सती प्रकरण, शाहबानो प्रकरण इत्यादी समाजविघातक प्रथेविरोधात त्यांनी महिलांना मोठया प्रमाणावर एकत्र करून आवाज उठवला. ठिकठिकाणी निदर्शने केली. समाजातील वंचित घटकाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. आयुष्याच्या उत्तरार्धात गोरेगाव हीच त्यांची कर्मभूमी ठरली. अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. गरीबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी मृणालताईंनी गोरेगाव येथे नागरी निवारा परिषदेची स्थापना केली. त्याठिकाणी त्यांनी ६ हजार लोकांना घरे मिळवून दिली. लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर मुंबईमधून त्यांचा पराभव झाला, तेव्हा यांचा प्रत्यय त्यांना आला. त्या पराभवाचे त्यांना खूपच वाईट वाटले. ज्या जनतेसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले, सातत्याने परिसरातील कामांनाच प्राधान्य दिले त्याच जनतेने हिंदुत्ववाद्यांना साथ दिली, याची सल त्यांच्या मनात सतत राहिली. त्यानंतर त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. या सर्व गोष्टींचे विस्तृत विवेचन या पुस्तकात वाचावयास मिळते. गरिबांसाठी त्यांनी स्वस्त किमतीमध्ये घरे बांधून शासनासमोर आणि संपूर्ण देशासमोर नवा आदर्श निर्माण केला. ‘सिमेंट घोटाळा’ ‘एन्रॉन प्रकल्प’ या विरोधात त्यांनी आवाज उठवला. शासनातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांनी बाहेर काढली. Footprints pf a crusader या पुस्तकात मृणाल गोरे यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनपट रोहिणी गवाणकर यांनी मांडला आहे. चरित्रकार स्वत: मृणाल गोरे यांची लहानपणापासूनची मैत्रीण असल्यामुळे मृणाल गोरे यांच्या जीवनातील बारीक तपशीलही खुबीने मांडले आहेत.
मृणाल गोरे यांचे निधन १७ जुलै २०१२ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे मृणाल गोरे यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply