भालचंद्र देव यांचा जन्म २ एप्रिल १९३६ रोजी मुंबई येथे झाला.
पं. भालचंद्र देव नाना म्हणून संगीत क्षेत्रात ओळखले जात. त्यांचे वडील दामोदर देव हे ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक होते.ते पंडीत अनंत मनोहर जोशी उर्फ अंतूबुवा यांचे शिष्य होते. दामोदर देव हे मुंबई महापालिकेच्या गुजराथी शाळेत संगीत-शिक्षक होते. ते उत्तम गात आणि हार्मीनियमही वाजवीत असत.
बालपणापासून भालचंद्र यांच्या वर सुरांचे आणि तालांचे संस्कार झाले. पुरंतु अंतुबुवांचे चिरंजीव पंडित गजाननबुवा जोशी यांचे व्हायोलीन वादन भालचंद्रच्या वडीलांना फार आवडायचे आणि आपल्या एका तरी मुलाने व्हायोलीन शिकावे व त्यात नाव कमवावे असे त्यांच्या मनात होते. म्हणून त्यांनी कोठून तरी एक लहान आकाराचे व्हायोलीन भालचंद्र यांच्यासाठी मागवले. ते भालचंद्र यांच्या हातात देऊन सुरवातीचे स्वरपाठ शिकवायला सुरवात केली. आणि काय योगायोग…भालचंद्र यांना ते जमू लागले. भालचंद्र थोरल्या भावाला हार्मानियम आणि भालचंद्र यांना व्हायोलीन असे शिक्षण सुरु झाले. त्यावेळी भालचंद्र यांचे वय ९ वर्षाचे होते. व्हायोलीनचे तंत्र भालचंद्र यांना जमते आहे असे पाहिल्यावर वडील हार्मोनियम वाजवीत व भालचंद्र त्यांच्या बरोबर व्हायोलीन वाजवित असे. कधी कधी थोरला भाऊ हार्मोनियम, भालचंद्र व्हायोलीन आणि वडील डग्ग्यावर ठेका धरीत. त्यामुळे सुराबरोबरच तालात वाजविण्याची भालचंद्र यांना सवय झाली. कधी कधी वडील भालचंद्र यांना त्यांच्या शाळेत घेऊन जात व तिथल्या मुली व शिक्षिका यांच्यासमोर भालचंद्र यांना व्हायोलीन वाजविण्यास सांगत.
पुढे वडील सेवानिवृत्त झाल्यावर भालचंद्र त्यांच्या गावी म्हणजे पुण्याजवळच्या चिंचवडला स्वतःच्या घरात रहायला आले. परंतु भालचंद्र यांना पुण्याच्या शाळेत घातल्यामुळे भालचंद्र बराच वेळ घराबाहेर असे आणि घरी आल्यावर दमून जात असे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर भालचंद्र पटकन माडीवर जाऊन झोपून जात असे..
परंतु वडील भालचंद्र यांना खाली बोलवीत व अर्धा तास रियाज करावयास लावीत. भालचंद्र यांना त्या वेळी या गोष्टीचा राग येत असे परंतु त्याचे महत्व आता भालचंद्र यांना पटते होते. गावातील निरनिराळ्या उत्सवात भालचंद्र यांचे वादन होत असे. तेव्हा चिंचवड गावात भालचंद्र हे एकटेच व्हायोलीन वाजविणारे व तो ही वयाने लहान. त्यामुळे लोकांकडून भरपूर कोतूक होई.
चिंचवडला भालचंद्र तीनच वर्षे राहिले. नंतर भालचंद्र यांच्या शिक्षणासाठी वडीलांनी पुण्याला जायचे ठरविले. लवकरच पुण्यास कसबा पेठेतील मोटे मंगल कार्यालयात यांना जागा मिळाली व ते पुणेकर झाले.
शाळेत जाणे-येणे सोपे झाले. त्यामुळे व्हायोलीन वादनासाठी अधिक वेळ मिळू लागला. भालचंद्र यांच्याच वाड्यात प्रसिध्द गायक व हार्मानियम वादक पं. बबवराव कुलकर्णी रहात होते. घरातच त्यांचा क्लास होता. त्यांचीही ओळख होउन भालचंद्र याना मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे जाऊ लागले. ते शास्त्रीय संगीत तर गायचेच परंतु भजन, गौळणी, अभंग, अष्टपदी, ठुमरी, भावगीत असे प्रकारही फारच सुंदर गायचे. हळू हळू त्यांच्याबरोबर कार्यक्रमातही साथ करु लागले .असेच एकदा त्यांच्या क्लासच्या गुरुपौर्णीमेच्या कार्यक्रमात यांनी दुर्गा राग वाजवीत होते. इतक्यात जवळच राहणारे प्रसिध्द संगीततज्ञ सरदार आबासाहेब मुजूमदार त्या ठिकाणी हजर झाले. भालचंद्र चे वादन संपल्यावर ते गुरुजींना म्हणाले, `वा! बबनराव हे रत्न तुम्ही कुठून पैदा केलेत.. ? एका थोर जाणकाराकडून भालचंद्र यांना मिळालेली ती पहिली पावती शाबासकी होती. पुण्यात त्यांनी अनेकविध कार्यक्रमातुन साथ केली. भारत गायन समाजात पन्नास वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना व्हायोलीनचे धडे दिले.
१९६० मध्ये लखनौ येथील सांस्कृतिक स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळाले होते. मुंबईच्या रायकर व्हायोलिन ॲकॅडमीने त्यांचा ‘व्हायोलिन गुरू’ही उपाधी देवून गौरव केला होता. त्यांच्या एक कन्या आणि शिष्या चारुशीला देव गोसावी या ही उत्तम व्हायोलिन वादक आहेत.
पं.भालचंद्र देव यांचे ११ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले.
https://www.youtube.com/watch?v=PPOXM4hpHeY&feature=emb_logo
https://www.youtube.com/watch?v=6spOrT3FlDk
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply