‘उत्तानपणे प्रणयराधना करण्यात आम्ही सर्वांच्या पुढे’ अशी माणसाने बिलकुल बढाई मारायला नको! सेरेंगेटीच्या अरण्यवनात देखण्या प्रियेच्या भोवती पिंगा घालणारे रंगेल नर पहा म्हणजे खात्री पटेल. जंगलचा राजा प्रियेची अशी मनधरणी करतांना कधी दिसला की समजेल.
‘सिंह म्हणजे अगदी लाजकोंबडा आणि आपल्या एकटेपणात कुढणारा’-असा बरेच दिवसांपासून समज होता. मात्र अगदी अलिकडेच एका शास्त्रज्ञांच्या चमूने निर्वाळा दिला, ‘‘सिंहाला कळपात राहायला खूप आवडते. तो समूहप्रिय आहे. कळपात राहून एकत्र शिकार करायला तर त्याला फार आवडते. विश्वास ठेवा अगर ठेऊ नका. पण सिंहीण आपली पिल्ले शिशुशाळेत म्हणजे नर्सरीत ठेवायला पसंत करते. त्यावेळी पोरांवर हल्ला करण्याचा दुसऱ्या सिंहाने प्रयत्न केलाच तर सिंहांचा आख्खा कळप आक्रमण करणाऱ्या परकियावर अस्सा तुटून पडतो!’’ हे मत मांडले, सेरेंगेटीत तीस वर्षे संशोधन केलेल्या तज्ज्ञांच्या एका टीमने. सेरेंगेटी अरण्यवन म्हणजे श्वापदांची जिवंत चालती बोलती जगातली सर्वात भव्य प्रयोगशाळा आहे. पंधरा हजार चौ.किमी व्याप्तीच्या प्रदेशात पंधरा लक्ष वन्य पशू राहतात. यात अडीच लाख झेब्रे आणि असंख्य मगरींचा समावेश नाही.
1990 साली प्रसिद्ध झालेल्या संशोधन पत्रात म्हटले होते, सिंहांना स्वतःहून एकट्यानेच हल्ला करायला आवडते. कारण सिंह अल्प शक्तीच्या श्वापदांशी एकटा झुंझतो. मात्र साध्यासुध्या प्राण्यांची शिकार करायला सिंहीणी पुर्या पडतात. अशा वेळी सारा कळप रणरागिणीची मर्दुमकी लांबून पाहत असतो. मात्र वनगायीसारख्या किंवा उन्मत्त झेब्र्यासारख्या सामर्थ्यवान प्राण्याशी समरप्रसंग खडा झाल्यावर सिंह दोस्तांना साद घालतात. सेरेंगेटीत एकट्या दुकट्या सिंहाला तसे पोटापुरते पुरेसे भक्ष्य मिळविणे जरा अवघडच. मोसमाच्या कालावधीत खायला पुरेसे मिळत असले तरी अन्य वेळी मात्र भक्ष्याची टंचाई भासते. पाच जणींचा सिंहीणीचा कळप शक्तीमान म्हशीसारख्या भक्ष्याला लोळवू शकतो. मात्र कळपात दोन चार जणी असल्या तर आक्रमणाच्या फंदात पडत नाहीत.
सिंहीण बाळंत झाल्यावर पहिले काही आठवडे ती एकट्याने बाळाचे संगोपन त्याला झुडुपात लपवून ठेऊन करते. बाळ मोठे झाले की ती त्याला थेट कळपाच्या नर्सरीत घेऊन येते. गंमत म्हणजे, तेथे सार्या लेकुरवाळ्या आया एकमेकीच्या पुढची एक दोन वर्षे झक्कपैकी मैत्रिणी बनतात! मात्र खरं म्हणजे नर्सरीतल्या बाळांचे खाण्यापिण्याचे तसे हालच होतात. कारण त्यांच्या मास्तरणीच बहुतांशी दुर्लक्ष करतात. त्यामुळे नाइलाज झाला तरच सिंहीणी बाळाला नर्सरीत ठेवतात.
सिंह कळपात असेपर्यंत निवासी सिंह नर्सरीतल्या बाळांचे रक्षण करतो. कळपाबाहेरच्या सिंहांच्या चाहुलीवर मात्र आयांची सक्त नजर असते. कारण बाहेरच्या सिंहाला नुकतीच बाळंतीण झालेली लेकुरवाळी आई मैत्रिण हवी असते. एकटी दुकटी आई आणि तिचे बाळ कधीकाळी दिसले तर परक सिंहा बाळाला ठार मारतो व त्याच्या आईशी जबरदस्ती करतो. एरव्ही निवासी सिंह कळपाच्या सीमेवर रक्षण करतात. तरीपण एखाद दुसरा परकीय सिंह नजरेतून सुटून नर्सरीमध्ये बिनधास्तपणे घुसतो. या परकीयात वाघ, चित्ते व बिबळे वाघ असू शकतात. अशा वेळी सर्व आया मिळून परक्याशी झुंज घेतात व रोमिओ सिंहाला पिटाळून लावतात. यामुळे बाळांची सुरक्षितता वाढते व एकंदरीत मग कळपाचा संतती-संवर्धनाच्या दक्षतेमुळे बाळांची संख्या पण वाढते. संशोधनात तज्ज्ञांनी सिंहाच्या कळपप्रियतेचा हा गुण अधोरेखीत केला.
सिंह आपल्या मुलुखाचे स्वामित्व कसोशीने कसे जपतात याचे संशोधन ‘कॅरन मॅकम्ब’ या संशोधक मॅडमने 1980-90 च्या दशकात केले. कॅरनने यासाठी प्रथम सेरेंगेटीच्या सिंहीणीच्या प्रतिकाराचे जवळून अध्ययन केले. तिने सर्वप्रथम सिंहिणींच्या गर्जनांचे ध्वनीलेखन केले. गर्जना म्हणजे सिंहाच्या भाषेत स्व-मालकीच्या जागेचा अधिकार जाहीर करण्यासाठी फुंकलेली जणू तुतारी असते. एखादीला परका सिंह आपल्या हद्दीत येऊन खुशाल वावरतोय असे पाहिल्यावर तिचे माथे भडकते. म्हणजे जणू बाहेरून घरी आल्यावर अचानक एखादा अनाहूत सिंह आपल्या दिवाणखान्यात खुशाल लोळतोय असे तिला वाटते. पण ताबडतोब डरकाळी फोडण्या अगोदर ती सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेते. तिच्या एकटीच्या डरकाळीने धावून यायला आसपासच्या मैत्रिणी सहसा राजी नसतात. त्या थोडा वेळ जाऊ देतात. चार चौघीजणी जमल्या की मग सगळ्याजणी पेटलेल्या वीरांगनेसारख्या संकटात असलेल्या सखीच्या सहाय्याला धाऊन जातात. या संशोधनाबरोबर ‘जोन ग्रिटनेल’ या मॅडमने नर सिंहाच्या प्रतिक्रियेचे अध्ययन केले. ती म्हणते, मादीपेक्षा नराची प्रतिक्रिया अगदी वेगळी असते. तो अनाहूत सिंहावर वीजेसारखा तात्काळ तुटून पडतो. प्रथम दुष्मनाच्या ताकदीचा विचार करण्याचे त्याच्या मनात येत नाही. याचे कारण विषद करतांना जोन लिहिते, ‘नव्या अपत्याबरोबर नर सिंह तसा अल्प काळ असतो. पण त्या कालावधीत आपल्या बाळावर ठार मारण्याच्या इच्छेने परक्या सिंहाने वाकडी नजर टाकली तर त्याला अजिबात खपत नाही व मग तो बेधडक हल्ला करायला मागे पुढे पाहत नाही.’
सिंहांना आपल्या हद्दीच्या मालकी हक्काची जाणीव त्यांच्या वाढत्या संतती चिरंजीवतेला कारणीभूत ठरते. या घटना चक्रामध्ये सिंहांच्या स्वमुलुख निवडीच्या प्रक्रियेला महत्त्वाचे स्थान असते हे दिसून येते. यासंदर्भात ‘अॅना मोझेर’ या संशोधक विदुषीने केलेले अध्ययन आणखी झोत टाकते. तिने तर सिंहांच्या इस्टेट क्षेत्राचा नकाशा तयार केला. प्रत्येक सिंहाने स्वतःची मालकी हक्क जाहीर केलेला टापू अॅनाने नकाशात दर्शविला. त्यात तिला मुख्यत्वे आढळले की सिंहाला स्वतःच्या जागेत कधीही येण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य हवे असते. प्रथमतः मुलूख निवडतांना तो तीन गोष्टींवर भर देतो. ते म्हणजे, अन्न, पाणी व अबाधित प्रवेश. त्याच्या मालकीच्या जागेजवळून जाणारे आणि भक्ष्य म्हणून जिभा चाटणाऱ्या प्राण्यांवर त्याचे कटाक्षाने लक्ष असते. पाण्याची मुबलकता त्याला प्राथमिकतेने हवी असते. कारण मगच लगतच्या झाडझुडपात त्याला व सिंहीणीला आपली पिले सुरक्षितपणे दडवता येतात. या दृष्टीने विचार करता मग नद्यांच्या किंवा दोन ओहळांच्या संगमांच्या जागा सिंहांना विशेष पसंत पडतात.
सेरेंगेटीच्या अरण्यवनातील प्राण्यांवरील संशोधन केवळ औत्सुक्य, माहिती व मनोरंजनासाठी होत नसते. वास्तविक अशा संशोधन निष्कर्षांचा माणसाच्या वैद्यकीय गरजांसाठी उपयोग होतो. माणसांना होणारे रोग, त्याची संभाव्य कारणे व त्यावर इलाज शोधून काढण्यासाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरत आहे. माणसाचा जीव वाचवणारी औषधे व औषधांचे बरे वाईट परिणाम समजावून घेण्यासाठी या संशोधनाचा सध्या सतत उपयोग होत आहे. नव्या औषधाचा उपयोग माणसासाठी करण्याअगोदर त्याच्या प्रतिक्रियेचा अंदाज प्राण्यांवर केलेल्या चाचण्यांमुळे समजू शकतो असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. या कारणामुळे प्राणी संशोधनाला उत्तरोतर उत्तेजन मिळणार आहे.
सेरेंगेटी वनात सिंहाबरोबरच्या पाच शक्तीमान श्वापदांचा समावेश होतो. या पंचप्राण्यांपैकी प्रत्येकाचे वैशिष्ट्य खास आहे.
- सिंहः सेरेंगेटी वनामध्ये तीन हजार पेक्षा जास्त सिंह असल्याचे गणतीत आढळले आहे. सिंह सर्वात शक्तिमान प्राणी आहे.
- आफ्रिकन चित्ताः सिंहा नंतर क्रूर व ताकदवान प्राणी म्हणजे चित्ता. तो साधारणतः संन्याशासारखा वेगळा राहतो. सिनेरोना भागात चित्याची जास्त वस्ती आहे. सुमारे एक हजार बिबटे या प्रदेशात आहेत.
- हत्तीः शिकाऱ्यांनी बिनधास्त शिकार केल्याने सेरेंगेटीतील हत्तींची संख्या रोडावत होती. मग शिकाऱ्यांच्या वर 1980 च्या दशकात कडक बंधने आणल्यावर त्यांची संख्या परत वाढायला लागली आहे. हत्ती सेरेंगेटीच्या उत्तर भागात प्रामुख्याने आढळतात.
- काळा गेंडाः यांची संख्या पण कमी होत चालली होती.पण चोरट्यांवर आता अंकुश आणल्यावर संख्या वाढत असल्याचे आढळले. मुख्यतः ते ‘सराई मारा’ या लगतच्या जंगल प्रदेशात राहतात. पण मधली सरहद्द ओलांडून ते आता सेरेगेंटी वनात येतात.
• आफ्रिकन रेडेः एके वेळी दांडग्या रेड्यांची संख्या बरीच होती. पण रोगाची लागवण होऊन बरेचसे रेडे मरण पावले. सध्या त्यांची संख्या वाढत आहे.
– अरुण मोकाशी
परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील हा लेख.
त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/
किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-
Leave a Reply