मराठी चित्रकार आणि नेपथ्यकार पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म १ नोव्हेंबर १८८८ रोजी वाई जवळ मेणवली येथे झाला.
पुरुषोत्तम श्री काळे यांना जवळचे लोक अण्णा म्हणत असत. ललितकलादर्श’चे कल्पक चित्रकार आणि नेपथ्यकार म्हणून पु.श्री. काळे यांची ओळख होती. १९२१ साली ते ललितकलादर्श नाटक कंपनी पडदे रंगवायले जे आले ते १९३७ साली ती कंपनी बंद होईपर्यंत तेथेच होते. १९२२ सालीच पुरुषोत्तम श्री काळे यांनी भा.वि. वरेरकर यांच्या ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकाकाच्या रंगमंच सजावटीत स्टेजवर आतल्या पडद्यांऐवजी ‘बॉक्स सेट’ चा वापर केला हा अशा प्रकारचा वापर मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच झाला होता. श्री या नाटकामध्ये रंगमंचावर चलत्चित्रपटाच्या साहाय्याने घोड्यांची रेस दाखवण्याची करामत पु.श्री. काळेंची होती. वधूपरीक्षा नाटकातील त्रिवेणी ही नायिका विहिरीत उडी घेते आणि पाण्याच्या आवाजाबरोबर पाणी वर उडण्याची योजना केली होती. त्यानंतर नायक धुरंधर विहिरीत उडी मारताना तसाच आवाज होऊन पाणी परत वर उडते. शेवटी ओले चिंब झालेले धुरंधर आणि त्रिवेणी पायर्यात चढून विहिरीबाहेर येतात. रंगमंचावरील ही सर्व कमाल पु.श्री काळे यांच्या नेपथ्यामुळे शक्य झाली होती. असे नेपथ्य पाहिल्यावर १९२८ सालच्या प्रेक्षकांचे काय झाले असेल याची कल्पनाही करता येत नाही.
१९३३ साली रंगमंचावर आलेल्या ‘आंधळ्यांची शाळा’ या श्री.वि. वर्तकलिखित नाटकात आलेला दिवाणखाना पुढे दशकानुदशके कायम येत राहिला. या अमर दिवाणखान्याचा जन्म पु.श्री. काळे यांनी ’सत्तेचे गुलाम’ या नाटकातून केला. या नाटकाच्या सुरुवातीलाच मृत्युपत्राया वाचनासाठी एक दिवाणखाना उभारला होता.या दिवाणखान्याची लांबी, रुंदी आणि भिंतींची जाडीही दाखवण्यात आली होती. चांगल्या फर्निचरने आणि सुशोभित खिडक्या दरवाज्यांना साजेसे पडदे लावून शृंगारलेला हा दिवाणखाना मराठी रंगभूमीवर अजरामर झाला. याच नाटकातील केरोपंत वकिलांचे ऑफिस आणि देवघर यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर सत्यसृष्टी उभी केली.
सत्तेचे गुलाममध्ये चेंबूर गावातील शेतावरील वैकुंठाच्या झोपडीचे पडदा उघडताच होणारे दर्शन प्रेक्षकांना अहाहा करायला लावे. नारळाच्या झावळ्यांची ती झोपडी गर्द झाडीत शोभून दिसत असे. पाठीमागे दूरवर दिसणारी शेती, सायंकाळच्या वेळचे ते रंगीबेरंगी आकाश आणि डोंगरांची रांग दृश्याला खोली (depth) देत असे. शेताच्या रक्षणासाठी बांधलेला धिप्पाड कुत्रा आणि पाटाचे पाणी झाडाला सोडल्याचे पाहताच प्रेक्षक दिङ्मूढ होत असत. नाटकाच्या तिसर्या प्रयोगात लोकांच्या परिचयाचा प्रिन्सेस स्ट्रीट, त्यावरील ओळखीच्या इमारती, अशोक स्टोअर्सची डोळे भरणारी पाटी पाहिली की प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करीत असत.
नाट्य- चित्रकलेच्या प्रांतात यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अनेक व्यक्ती पु.श्री.काळे यांच्या सहवासात आल्या. त्यात केशवराव भोसले (‘ललितकलादर्श चे मालक), बापूराव कोल्हटकर (‘ललित कला आदर्श चे उत्तराधिकारी), सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर), नारायणराव राजहंस (बालगंधर्व), मामा वरेरकर (लेखक), बाबूराव पेंटर (चित्रकार), गोविंदराव टेंबे (पेटीवादक), बशीर खान (गायक), गोपाळराव गो. फाटक, बाबूराव देवभक्त. या दिग्गजांचे व्यक्तिचित्रण ‘पुश्री नी ‘ललितकलेच्या सहवासात’ या पुस्तकात नेमक्या आणि मोजक्या शब्दांत व्यक्त केले आहे. या व्यक्तिचित्रणात त्या त्या व्यक्तीचे गुण दिलखुलासपणे वर्णिले आहेत.
मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत. व.पु. काळे यांनी आपल्या वडिलांच्या वर “वपु सांगे वडिलांची कीर्ती” हे पुस्तक लिहिले आहे.
— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply