पशु-गॅवार, ढोर अरु नारी,
ये सब ताडन के अधिकारी’
केरळातल्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश असावा की नसावा यावरुन देशात युद्धसदृष परिस्थिती आहे. स्त्रियांना या मंदिरात प्रवेश नाही, ही काही कालच घडलेली घटना नाही. गेली ८०० वर्ष ही प्रथा सुरू आहे. अधे मध्ये ह्या प्रथेला किरकोळ विरोध व्हायचा, पण पूर्ण देशभर त्याचे पडसाद उमटलेले माझ्या स्मरणात नाहीत. मग आताच अशी बेबंद परिस्थिती निर्माण होणं हा निवडणुकांच्या मोसमात काही किंवा सर्वच राजकारणी पक्षांच्या स्वार्थाचा भाग आहे, हे ओळखणं अवघड नाही. हे लक्षात येतं. राजकारणाच्या बाहेर आधुनिक युगात जुनाट आणि कालबाह्य परंपरा उराशी कवटाळून बसणं योग्य नाही हे वैयक्तिकरित्या बहुतेकांना मान्य असतं, पण अशा व्यक्तिश: मान्य असणारांचा कळप झाला आणि ह्या कल्पक उद्दिष्ट राजकीय असाल, की मग हे ‘मानते’ आधुनिक युगातून थेट आदीम युगात पोहोचतात आणि आपल्या जुन्या परंपरांचा त्यांना ज्वलंत वैगेरे अभिमान वाटू लागतो आणि समाजाच्या अर्ध्या अंगाला त्याज्य ठरवणाऱ्या ह्या कालबाह्य परंपरा कवटाळून बसण्याचा आग्रह होतो आणि हिंसाही होते.
जुन्या परंपरांचा असा अभिमान वाटणं एकवेळ ठिक आहे, मलाही वाटतो. पण त्या प्रथा-परंपरा जन्माला आला तो काळ, त्या काळची परिस्थिती आणि त्या परिस्थितीचा त्या काळातील आपल्या पूर्वजांनी, त्या काळच्या त्यांच्या बुद्धीने लावलेला अर्थ जर त्या काळाच्या संदर्भात समजून घेतला तर, आपल्याला त्या प्रथा-परंपरांबद्दल आजच्या काळात वाटत असलेला अभिमान किती व्यर्थ आहे ते समजून येतं. परंतु जुन्या प्रथा-परंपरा केवळ राजकीय स्वार्थापायी उराशी कवटाळून बसलेल्या काही कळपांना अशी बुद्धी होणार नाही आणि ते कळप इतरांना तशी बुद्धी होऊ देणार नाहीत. राजकीय पक्षांना आपले कर्तेधर्ते मानणाऱ्या अनुयायांना तर, त्यांना पटत असलं तरी, त्यांच्या नेत्यांचं अंधानुकरण करण्यावाचून पर्याय नसतो. कारण अनुयायांनी त्यांच्या कुठल्या न कुठल्या स्वार्थापायीच त्या कळपात प्रवेश केलेला असतो आणि तो स्वार्थ त्यांना परमार्थ नक्की कशात आहे हे समजूनही उमजू देत नाही. कळप म्हटला की बुद्धीचा संबंध असाही तुटतोच.
शबरीमला असो, शनी शिंगणापूर असो की मग इतरही काही धार्मिक ठिकाणं असोत, जिथे स्त्रीचा प्रवेश किंवा तिचा संचार ज्या काळात मर्यादीत केला गेला, त्या मागच्या काळाचा आढावा घेतला तर, प्राचीन काळातला आपला समाज स्त्री कडे काय दृष्टीने पाहात होता, ते समजतं. ‘पशु-गॅवार, ढोर(ढोल) अरु(और) नारी, ये सब ताडन के अधिकारी’ हे तुलसीदासांचं सुप्रसिद्ध वचन आपण सर्वांनी कधी न कधी ऐकलं असेलच. ह्या वचनाचे दोन अर्थ काढता येतात. वचनाचे म्हणण्यापेक्षा ह्या वचनातील ‘ताडन’ ह्या शब्दाचे. ‘ताडन’ ह्या शब्दाकडे पाहिलं असता, त्याचा एक अर्थ ‘पीडा’ असा होतो. त्याकाळातील समाज देव-धर्माच्या प्रचंड पगड्याखाली होता, त्या काळात स्त्री ही धर्माच्या, मोक्षाच्या काळातली धोंड मानली जात असे. क्षुद्र आणि नारी याना धार्मिक कार्यात वा कर्मकांडात भाग घेण्याचा अधिकार नाही असं समजलं जात होत. आजही रजस्वला स्त्रीला धार्मिक कार्यात भाग घेता येत नाही हे वास्तव आहे. मग त्याकाळात काय होत असेल याची कल्पना करा. नाही धार्मिक कार्याच्या आड येऊ पाहणाऱ्यांना पीडा देणं हे त्या काळात समाजसंमत होतं.
‘ताडन’ ह्या शब्दाचा दुसरा अर्थ ‘जाणणे’ किंवा ‘परीक्षा पहाणे’ किंवा ‘ओळखणे’ असा होतो. आजही आपण ‘ताडने’ ह्या शब्दाचा मराठीतला अर्थ ‘ओळखणे’ असा घेतो. आता पशु, नोकर (शूद्र),आणि ढोल ह्यांची ‘परीक्षा’ आजही आपण प्रेमाने काही घेत नाही, तिथे त्याकाळात काय परिस्थिती असेल याची सहज कल्पना आपल्याला येते. पशु, नोकर आणि ढोल हे बडवल्याशिवाय समजत नाहीत किंवा बडवल्याशिवाय त्यांना कळत नाही, हीच धारणा त्याकाळात असली तर नवल नाही. ह्या सर्वांची तुलना ‘नारींशी केली गेली आहे आता त्या काळातली स्त्री जर पशू आणि क्षुद्रासमान समजली जात असेल, तर मग पशुं आणि क्षुद्र जातीच्या वाट्याला येणारी सर्व कर्म आणि दु:ख तिच्याही वाट्याला आलीच असणार. म्हणून तर तिला स्वतंत्रपणे धार्मिक आणि सामाजिक कार्यात भाग घेता येत नव्हता..! पशुंना आणि क्षुद्रांना मंदिरात प्रवेश नाही, पासून असलाच तर तो फक्त बलिवेदीपर्यंत जाण्यासाठी. पशुंना-क्षुद्रांना-नोकरांना शिक्षणाचा अधिकार नाही. त्यांना फक्त ‘माणसा’च्या आज्ञा पाळण्याइतपतच अक्कल असावी. पशूंनी-नोकरांनी मालकांचं आज्ञापालन केलं नाही तर त्यांचं मालकाचा मार खाणं हेच त्याचं कर्तव्य होतं. हीच समजूत त्याकाळात नारीच्या बाबतीतही होती असा तुलसीदासांच्या वचनाचा अर्थ होतो. अशा समजुती असलेल्या काळाच्या पुढे-मागे उगम पावलेल्या ह्या सर्व प्रथा-परंपरा आहेत. शबरीमला मंदिर किंवा अशा काही ठिकणी स्त्रीयांना जी प्रवेशबंदी आहे, त्या मागे जुन्या प्रथांवर त्या काळात असलेल्या स्त्री विषयक या क्षुद्र भावनांचा अद्यापही प्रभाव आहे आणि तो किती चुकीचा आहे, हे थोडा विचार करता लक्षात येईल..!
आज नारीची तुलना (जाहिररित्या) पशुसोबत केली जात नाही. त्याकळच्या समाजाची असलेली जाहीर भुमिका आज निश्चितच बदललेली आहे (खाजगीतलं वास्तवं बरंचसं वेगळं आहे). समाजाच्या या बदललेल्या जाहीर धारणेमागे आपल्या समाजात होऊन गेलेल्या समाजसुधारकांचे उर्वरीत सनातन सामाजाचा रोष पत्करुन केले गेलेले प्रयत्न आणि त्या त्या वेळच्या राजसत्तेकडून वेळोवेळी केले गेलेले आणि तेवढ्याच कठोरपणे राबवले गेलेले कायदेही तेवढेच कारणीभूत आहेत. शिक्षणाचाही थोडाफार परिणाम झाला आहे. सुधारकांच्या आणि कायद्याच्या दट्ट्याने स्त्रीला पशूपासून माणूस म्हणून मान्यता देण्याचं धाडस समाजपुरूष दाखवू शकतो, असं असलं तरी, आजच्या आधुनिक काळात, कायद्याने स्त्रीला समानता दिली असली तरी, समाजात नारीचं स्थान आजही दुय्यम आहे. अनेक महत्वाच्या व्यवहाराचे निर्णय आजही बहुतकरुन पुरुषच घेत असतो. ‘बायकांना अक्कल नसते’ ह्यावर बहुतेक पुरषोत्तमांचा विश्वास असतो आणि ते ते प्रसंगानुरूप बोलूनही दाखवत असतात. कुत्रा-घोडा-हत्ती आदींना शिकवणारा ट्रेनर आजही हातात हंटर घेऊन उभा असतो आणि ‘माझं ऐकलं नाहीस तर बघ’ हे बहुतेक ‘विवाहित मालकांचं’ त्यांच्या ‘नोकराला’ ‘बजावणं’ असतं.
स्त्रीला आज समाजात कायद्याने समानता लाभली असली तरी आपल्या समाजाच्या खाजगी आणि सार्वजनिक मनातून ‘पिता रक्षति कौमार्ये, भर्ता रक्षति यौवने, पुत्रश्च स्थाविरे भावे, न स्त्री स्वातंत्र्य मर्हती !’ या मनुच्या वचनाचा प्रभाव संपूर्णपणे गेलेला नाही, असं म्हणायला वाव आहे. मनुने जेंव्हा कधी हे लिहिलं, तेंव्हा ते त्या काळाशी सुसंगत असेलही. पण आताच्या काळात हे संपूर्ण गैरलागू आहे.
आज स्त्री देशा-परदेशात सोडाच, अंतराळातही स्वतंत्रपणे एकटी जातेय. देश चालवतेय, तिचे निर्णय ती घेतेय, पण तिला, ती केवळ स्त्री असल्याने, काही मंदिरांत मात्र जाता येत नाही, आश्चर्य म्हणजे पुरुषांइतकं स्त्रीयांच्या मनावरुनही या मनूच्या वचनाचा पगडा अद्याप साफ पुसला गेलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायधिशांच्या खंडपिठातील न्यायमुर्ती श्रीमती इंदू मल्होत्रांनी यांनीच महिलांवरील प्रवेशबंदी उठवण्याच्या विरोधात मत नोंदवले. न्यायालयाने धार्मिक परंपरांच्या प्रश्नात लक्ष घालू नये, असे न्या. मल्होत्रा यांचे म्हणणे लक्षात घेता तसाच अर्थ काढावा लागते. स्त्रियांचीच स्त्रियांविषयी हि भावना असेल, तर पुरुषांच्या मनात काय असेल याचा विचार करा.
मुंबईच्या हाजी अलीच्या मजारीत स्त्रियांना प्रवेशनिषेध, बुरखा आणि तीन तलाक या मुसलमानांतील ‘प्राचीन धार्मिक प्रथा’ बंद करण्यास मुसलमान पुरुषांचा ठाम विरोध होता किंवा आहे. याबाबतही नेमकी शबरीमालासारखीच भावना मुसलमान पुरुषांमध्ये होती किंवा आहे. त्यावेळी हिंदू पुरुष या प्रथेबाबत मुसलमान पुरुषांच्या विरुद्ध आणि मुसलमान स्त्रियांच्या बाजूने उभा होता. ज्या हिंदूंना मुसलमानांमध्ये असलेल्या बुरखा आणि तीन तलाक या प्रथा मुसलमान स्त्रीयांवर अन्याय करणाऱ्या वाटतात, त्याच हिंदूंना शबरीमाला मंदिरात किंवा शनीच्या चौथऱ्यावर असलेली स्त्रियांची प्रवेशबंदी मात्र ‘प्राचीन धार्मिक प्रथा’ या नावाखाली समर्थनीय वाटते, ही गम्मतच आहे. ‘स्त्रीविषयक’ भावनांबाबतचा हा दुटप्पीपणा नाही तर काय ? हिन्दू आणि मुसलमान या एकमेंकांमधून विस्तवही न जाणाऱ्या धर्मातील पुरुषांमध्ये, आपापल्या धर्माच्या स्त्रीकडे पाहण्याच्या त्याच जुनाट दृष्टीकोनाबाबत मात्र कमालिची एकजूट दिसते. एकंदर ‘बाईधर्मा’बाबत देशातील प्रमुख धर्मांच्या मनात अगदी तिच पुरातन ‘मालकीची’ भावना आहे आणि हे दुर्दैवच आहे.
धर्माचं राज्य आणू पाहणाऱ्यांच्या मनातलं हे वास्तव जोपर्यंत बदलत नाही, तो पर्यंत आपल्या समाजाचं उत्थान होणार नाही.. !
— @ नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply