मी तरुणाईत शिरलो तेव्हा –
समोर मातीचे ढीग होते.
त्यांनी सांगितले – ” यातून तुम्ही घडवा ”
क्षणभरासाठी मी विश्वकर्मा झालो
इतरांसारखा -इतरांबरोबर !
सोबतीला मेहनतीचं पाणी होतं
अक्षरांची बीजे पेरायला खडू होते
आणि चुकलेलं पुसायला डस्टर !
पहिल्या दमाने मी मूर्ती घडवायला बसलो
पण मनासारखी निर्मिती होईना
कोठेतरी ,काहीतरी चुकलं होतं.
वारंवार तपासलं तरी
न दुरुस्त होणारं घडलं होतं.
मूर्तींना काही केल्या
पाठीचे कणेच टिकत नव्हते .
ओठांना स्वतःची वाणी नव्हती
आणि चालण्यास पाय !
मध्येच केव्हांतरी त्यांनी विचारलं –
” काय ,कुठवर आलंय काम ?”
नाउमेदीने मी माझं काम त्यांच्यासमोर मांडलं
आणि सजेची वाट पाहत उभा राहिलो.
अकस्मात ते म्हणाले –
“वा ! अत्युत्तम ! अगदी आमच्या मनासारख्या !
आम्हांला हव्या होत्या तशाच झाल्यात मूर्ती !”
आणि मला माझ्या चुकीबद्दल कायमची शाबासकी मिळाली !
कायमची शाबासकी मिळाली !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply