“नवरा” आणि “बायको” हे दोन्ही कानांना काहीसे रांगडे भासणारे शब्द मराठीत अगदी रूढ झाले आले आहेत.
त्यांपेक्षा “यजमान” आणी “पत्नी” हे संस्कृतोद्भव शब्द कानांना सुसंस्कृत भासतात.
“हा माझा नवरा”, “ही माझी बायको” ह्यांपेक्षा “हे माझे यजमान”, “ह्या माझ्या पत्नी” अशी ओळख करून देणारे शब्द कानांना अभिरुचीपूर्ण भासतात.
इंग्रजी भाषेतून उचललेले “हे माझे मिस्टर”, “ह्या माझ्या मिसेस” हे काहीसे प्रचारात असलेले शब्ददेखील “हा माझा नवरा”, “ही माझी बायको” ह्यांपेक्षा सुसंस्कृत भासतात.
“नवरा-बायको” — पती-पत्नी — आपापसात किंवा लोकांदेखत एकमेकांना एकेरी संबोधत असले तरीही इतरांशी बोलत असताना आपल्या जोडीदाराचा उल्लेख आदरार्थी केरण्याची प्रथा मराठीभाषिक समाजात असती तर ते सुसंस्कृततेच्या दृष्टीने चांगले भासले असते.
काळाच्या ओघात समाजांमधे प्रथा पडत असतात आणि त्यांपैकी काही बदलत असतात. “संस्कृती/सुसंस्कृतता” ह्याबद्दलच्या काही कल्पनासुद्धा काही वेळा बदलत असतात. “हे माझे यजमान”, “ह्या माझ्या पत्नी” हे शब्द “नव्या जमान्यात”ल्या “नव्या” संस्कृतीत पुष्कळ लोकांना “जुनाट” संस्कृतीचे वाटतील. आपल्या “नवर्या”चे/यजमानांचे नाव न उच्चारता त्याऐवजी “हे” असा शब्द वापरायची पूर्वी समाजात प्रथा असे. ती आता “सुशिक्षित” वर्गात मागे पडली आहे हे मात्र चांगले झाले आहे.
खेड्यापाड्यातून विवाहित स्त्रिया आपल्या यजमानांना अजूनही “आमचे मालक” असे संबोधतात, त्यामागे खेड्यापाड्यातल्या पुरुषवर्गाची आपल्या भार्यांबाबतची परंपरेने चालत आलेली “मालकी हक्का”ची भावना आहे. वास्तविक परस्परांबाबत सन्मानाची भावना पती-पत्नींमधे सुसंस्कृततेची निदर्शक आहे.
— आकाश विहारकर
Leave a Reply