नवीन लेखन...

शब्द भले वेगवेगळे..

आपण सगळेच स्वत:शीच आयुष्यभर Hide & Seek चा गमतीशीर खेळ खेळत असतो. कालानुरूप वा व्यक्तिनिहाय त्या खेळाचे स्वरूप बदलत असले तरी त्या खेळाचा आत्मा मात्र आयुष्यभर आपल्यातला माणूस शेवटपर्यंत जागा ठेवत असतो. आपल्याला पावलोपावली नात्याच्या गुंत्यातून मोकळा श्वास घ्यायला उसंत हवी असते.कधी आपल्या पाऊलखुणा मागे रेंगाळाव्या वाटत रहातात, तर कधी पादत्राणाचे ठसे देखील पुसून जावेसे वाटतात.प्रत्येक नात्याचा आपला असा एक वकूब असतो.प्रत्येक नात्यात आपली अशी एक आदब असते.अर्थात हे सगळं एक तर समजायला कठीण आणि उमजायला तर अवघड असते.आपण निसर्गाचा साधा नियम पचनी पडून घेत नाही तो हा कि – आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या..अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी आपल्याला आपला जसा मानस आहे तश्याच दिसतात.आपण पहिल्यांदा ठरवित असतो कि त्यात काय पाहायचे आहे..आणि आपण ते जे काही पहात असतो..ते पहाताना आपण त्या गोष्टीचे आणि त्या गोष्टीच्या गुणावगुणाचे आपल्याला रुचलेले रूप डोळ्यात साठवून त्याच्या दिसण्यावर आपल्यात ठसलेल्या त्या गोष्टीच्या प्रतिमेचे आरोपण करीत असतो,नि साक्षात्कार झाला म्हणून कृतकृत्य होऊन जातो.आपण आधीच फैसला केला असल्याने कसल्या कैफियतीला आपण आपल्या सदरी पाय ठेऊन देत नाही.म्हणून एका ठराविक गोष्टीचे अनेक व्यक्तीकडून होणारे रसग्रहण व्यक्तींच्या प्रकृतीस साजेसे होत असते.कधी कुणा सज्जनाच्या हातून एकाद्या गोष्टीची नैसर्गिक ओळख पुसून जावी इतपत उद्दातीकरण होत जाते ..तर कधी एकाद्या गोष्टीला काव्यात्मक न्यायाच्या बुरख्याआडून नैसर्गिक न्याय नाकारला जातो.

इथे कुठलेही तत्वज्ञान ..कुठलाही विचार वा आचार त्याच्या मूळ सिद्धांताना शेवटपर्यंत खांद्यावर डोके ठेवण्यास मुभा देणारा नसतो.आणि तो तसा नसणे ही देखील एक नैसर्गिक न्यायाची आगळीवेगळी व्यवस्था असते.आपले असे होते कि आपण सगळ्या ठिकाणी एकच मोजपट्टी घेऊन ..एकच मापदंड लावून कुठल्याही तत्वाचे ..विचाराचे वा आचाराचे पातिव्रत्य तपासून पहात असतो.आपल्याला हे ठाऊक नसते असे नाही कि इथल्या सृष्टीतील सर्व घटकांना असणारी ओळख आणि अस्तित्व हे कुठल्या न कुठल्या संदर्भाच्या मर्जीवर बेतलेले असते.संदर्भाच्या दिशा नि त्या दिशांचे संदर्भ बदलत जाताना त्या घटकांना त्या त्या वेळी नव्या क्षितीजांची चौकट लाभत असते.आपणही जर का अशावेळी चार पावलं मागे सरून..अंमळ डोळे मिटून उसंत खाऊन आपल्या स्पर्शाला थोडीशी त्याच्या कलाने जगण्याची मुभा द्यायला शिकलं पाहिजे..प्रत्येकाला अशा वेळी नाजूक प्रहरातून जावे लागते.ही वाटचाल फारच जीवघेणी असते बरं..अशा मोक्याच्या क्षणांना आपण आपल्यात दोन्ही हात उंचावून सामावून जाणं ही त्या वेळेची साद असते.आणि या वेळी ओठातून निसटणारी शीळ ही खरंतर आपली आणि परमेश्वराची गळाभेट असते.

आपल्या आयुष्यात कुठलीही घटना अकारण..उगीचच ..अशीच म्हणून जन्म घेत नसते.प्रत्येक घटनेचा गर्भ खूप खूप दिवस आधी अंकुरला गेला असतो..आपल्या नकळत त्याची वाढ होत असते..आणि ठरलेल्या वेळी..ठरलेल्या ठिकाणी ..ठरलेल्या रंग_रुपात तो अवतरत असतो.आपले याच्याशी असणारे ऋणानुबंध केवळ आपल्या पुण्याईच्या बळावर बेतलेले नसतात तर आपल्या बऱ्याच हितचिंतकांचा त्यात खारीचा वाटा असतो.आणि हो काही प्रमाणात आपल्या हातून कळत_नकळत झालेल्या प्रमादांचा त्यात सिंहाचा वाटा असतो.

आपल्या आयुष्यातील सुख_दु:खाच्या अनुभवांना आपण आपली प्रतिमा म्हणून स्वीकारण्यास कधीच तयार नसतो. आपली आरश्यातील प्रतिमा आपल्या खऱ्या असण्याला लपवून समाजात मान्य अशा बेगडी बहुरूप्याच्या भूमिकेला शरण जाणारी दिसावी असा आपला दुराग्रह असतो.असे आपल्याशी प्रतारणा करणारे रूप आणि स्वरूप मिरविताना आपण कुणाचे जगणे जगत रहातो याची न आपल्याला खबर असते ना त्याबद्दल खंत वा खेद असतो.आपल्याला अशी काही भुरळ पडलेली असलेली असते कि आपल्या पावलोपावलीच्या मरणाचे मातम आपण उत्सव म्हणून साजरे करीत असतो.आपण अशा दुराग्रहाच्या समोर गुडघे टेकून तहातील सर्व अटी मान्य करीत असतो.

आपण आपले आयुष्य जगताना आपल्या ओळखीसाठी दात वेंगाडून इतरांच्या शिफारशीवर भर देऊन असतो.आपल्याला आपण सोडवलेली प्रश्नपत्रिका कितपत गुण देणार याची पूर्ण खात्री असताना आपण कुणा परीक्षकाच्या हातून होणाऱ्या मूल्यांकनावर आपले यश _अपयश वेठीस ठेऊन दे दान ..सुटू दे गिरान म्हणून हताश नजरेने आभाळाकडे तोंड फिरवून दिवस ढकलीत जात असतो. यात आणखी गंभीर गोष्ट अशी कि आपण मंदावत जाणाऱ्या सुख_दु:खाच्या लाटांवर उभे राहून जाणूनबुजून आकाश चुंबावयास पहात असतो..नि वेडेपणात पाण्याला टेकलेल्या आभाळाच्या दिशेने धाव घेत असतो..आभाळ कधीच हाती लागत नाही..अशा अवाजवी महत्वाकांक्षाना आपल्या जगण्याचे निरुपण करताना दमशाक होऊन आपला कपाळमोक्ष होऊन जातो.

आपल्यासमोर प्रत्येकवेळी पर्याय असतात..प्रसंगी कुपोषणाचा धोका पत्करून आत्मसन्मान जपावायाचा कि उष्ट्या खरकट्या पत्रावळीतील मेहेरबानीवर सुधृढ व्हायचे ..आपला नेहमी कमीकष्टाचा खुष्कीचा शॉर्टकट चोखाळण्याकडे कल असतो.त्याकामी आपण सतत कुठल्या न कुठल्या चरणावर डोके ठेऊन अशा मार्गाची वाट दाखव म्हणून कौल लावून बसत असतो.आपण आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या सगळ्याच पाऊलात असणारा देव आपण ओळखत नाही..आणि आपल्या पावलात असणारा देव तर आपण कधीच नाकारलेला असतो.या नाकारण्यामुळेच आपल्या हातून आपल्या माणूसपणास काळिमा फासणारी कृत्ये होत रहातात..जर का आपण आपल्यातील परमेश्वर ओळखला तर आपल्या हातून कदापिही पाप_पुण्याच्या सीमारेषाना जिवंत ठेवणाऱ्या विवेकाचे सर कलम होणार नाही.. जगल्या आयुष्यात कृतार्थ होताना कुठल्याही क्षणास येणाऱ्या मृत्यूच्या मिठीत सामावताना जीवाची घालमेल होणार नाही.चिरंजीव आयुष्यासाठी साकडे घालण्याऐवजी जगलेला ..जगणारा प्रत्येक श्वास चिरंजीव होऊन ध्यानात ठेवावासा वाटावा असे जगणे लाभावे अशी आपल्यासाठी नि सर्वासाठी प्रार्थना करताना दोन्ही हात सहज जुळावेत आणि अशा स्वर्गीय अभिषेकात आकंठ बुडताना अवघी काया आणि काळीजमाया एकरूप व्हावी एवढाच प्रत्येकाच्या गाण्याचा सूर असावा

..शब्द भले वेगवेगळे..

— रजनीकान्त

Avatar
About रजनीकान्त महादेव शेंबडे 11 Articles
रजनीकान्त महादेव शेंबडे..वास्तव्य कराड…अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून महावितरण इस्लाम्पूर विभागीय कार्यालयात कार्यरत.. लेखन कविता…ललित…स्फुट ..
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..