अक्षरांना अर्थ देणारे
शब्द
शब्दाला नि:शब्द करणारे
‘ पलिकडला ‘ अर्थ देणारे
शब्द
शब्दांनी शब्द वाढविणारे
अपशब्दांनी घायाळवणारे
शब्दच
कचऱ्याचा निचरा करणारे
होत्याचे नव्हते करणारे
शब्दच
भीतीने थिजविणारे
अंगाई-शब्दांनी निजविणारे
शब्द
श्रावण-शब्दांनी भिजविणारे
पेलविणारे, झुलविणारे आणि विझविणारे
शब्दच
सव्यसाचीस पूर्णोपदेशदाते
गीता-शब्द
कृतार्थ जीवनास पूर्णत्व,
मरणास शून्यत्व देणारे
बीजांडातून ब्रह्मांडाकडे नेणारे
ब्रम्ह-शब्द
शब्द हेच अर्थ, सार्थ वा निरर्थ,
शब्द क्षेम-कल्याण, शब्दच अकल्याण,
शब्द समाधान, कधी बनती निराकरण,
कधी शब्द स्वार्थ, कधी होती परमार्थ,
शब्दाचे बळ आगळे, शब्दातूनची मध पाघळे
वा अश्रुरूप ओघळे
शब्द हीच शक्ती, तेच देती मुक्ती,
शब्द-ब्रम्हासी जावे शरण,
न त्यागावे त्याचे चरण |
शब्द-सामर्थ्याची सार्थ जाण,
चित्ती असो द्यावी चिरंतन ||
—— शब्द सीमा ——
धन्यवाद
खपचं छान लिहिले आहे.