संत कबीरांच्या मते आत्मा अगम्य आहे. तो सांसारिक आणि भौमिकतेचा विषय नाही. तो आपल्या चर्म चक्षूने पाहण्याचा अथवा फक्त कानाने ऐकण्याचा विषय नाही तर दिव्य दृष्टीने अनुभव घेण्याचा विषय आहे. त्यांनी साधकांना ज्योती स्वरूपाच्या दर्शनात न थांबता पुढे नाम निःअक्षर (परमात्मा) पर्यंत पोहोचण्याचा सल्ला दिलेला आहे. परमात्म्याचे प्रेम प्राप्त करणे ही फार मोठी गोष्ट आहे. त्या प्रेमाला प्राप्त करण्यासाठी तेवढीच मोठी साधनाही करावी लागते. जेव्हा साधक अशा प्रेमसाधनेत मग्न होतो तेव्हा त्याला हा संसार तुच्छ वाटावयास लागतो. अशा प्रकारचे प्रेम कोणत्याही बाजारात विकल्या जात नाही. कबीरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की,
प्रेम न बाडी उपजे, प्रेम न हाट बिकाय ।
बिना प्रेम के मानवा, बांधा यमपुर जाय।।
वरवरची भावुकता, प्रेम उन्माद आणि खोटे प्रेम यांचे येथे काहीच काम नाही. परमात्म्यावर विश्वास हीच या प्रेमाची किल्ली होय. जेथे विश्वास अढळ आहे, दुजाभाव नाही तेथे परमात्म्याला जाणण्यासाठी कोणतीही बाधा किंवा अडचण नाही. कबीर साधकांना प्रेमभक्तीचा पुरस्कार करण्याचा सल्ला नेहमी देत. त्यांची भक्ती पद्धतीही कोणत्याही प्रचलित भक्ती पद्धतीपेक्षा वेगळी आहे. त्यांच्या भक्ती पद्धतीला जाणण्यासाठी जी युक्ती त्यांनी सांगितली आहे त्या युक्तीला जाणणे आवश्यक आहे. ते म्हणतात.
मेरी भक्ती युक्ति कर जाना,
ताका आवागमन नसाना ।
भक्ति करे तब मुक्ति को होई,
नहीं तो बाना जाय बिगोई ।।
आपल्या देशात अनेक भक्ती पद्धती प्रचलित असून देखील कबीरांनी स्वतःची एक आगळीवेगळी ” भक्ती पद्धती साधकांसाठी विकसित केली. त्यांनी विकसित केलेल्या या भक्ती पद्धतीच्या आधाराने भक्त सहजतेने भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. स्वयंनिर्मित भक्ती पद्धतीला त्यांनी ‘शब्द-सूरती योग’ असे नाव दिलेले आहे.
यातील ‘शब्द’ हा लिहिणे, बोलणे किंवा वाचणे अशा प्रकारचा शब्द नसून तो विदेही शब्द आहे. तो तात्विक विषय आहे. आपली सूर्ती शब्दात समाविष्ट करून साधक त्या परमात्म्यापर्यंत पोहचू शकतो. एवढेच नव्हे तर ज्या साधकाला भक्तीच्या युक्तीची ही कला सद्गुरुकडून प्राप्त झाली, त्याला संपूर्ण सृष्टीचे रहस्यदेखील जाणता येते. त्यामुळे तो साधक भौतिकतेत रममाण होऊ शकत नाही. परमात्मा प्राप्तीच्या आनंदात तो सदा मग्न राहतो. त्यालाच कबीर ‘मुक्ती’ असे संबोधतात आणि तो भक्तीचा खरा उद्देश देखील आहे.
-संत कबीर
Leave a Reply