पं. जवाहरलाल नेहरू याच्यानंतर भारताची समर्थपणे धुरा सांभाळणारे लालबहादूर शास्त्री यांचे व्यक्तीमत्त्व कमालीचे सोज्वळ शांत व तेवढेच कणखर होते. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांनाही अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. ते नैनी कारागृहात असताना घडलेली एक घटना.
कारागृहात असताना त्यांची पुष्पा अचानक आजारी पडली व थोड्याच दिवसानी तिची प्रकृती गंभीर झाली. घरून निरोप आल्यावर कारागृहातील सहकाऱ्यांनी त्यांना पॅरोलवर सुटून घरी जाण्याची विनंती केली. त्याप्रमाणे शास्त्रीजींनी पॅरोलसाठी अर्ज केला. त्यांचा पॅरोल मंजूरही झाला.
मात्र तुरुंगाच्या अधिकाऱ्याने त्यांना अट घातली की, पॅरोलवर असताना बाहेरच्या सत्याग्रहींना कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही. शास्त्रीजींना ती अट मुळीच मान्य नव्हती. त्यामुळे पॅरोलवर सुटून घरी जाण्यास त्यांनी नकार दिला. तिकडे मुलीची प्रकृती जास्तच गंभीर झाली तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यानेच अट काढून टाकली व शास्त्रीजींची विनाअट पॅरोलवर सुटका केली. मात्र घरी जाईपर्यंत मुलीचे निधन झाले होते.
शास्त्रीजींनी शोक आवरून तिच्यावर अंत्यसंस्कार गेले. मात्र नंतर ते घरी गेले नाहीत. तर थेट तुरुंगात जाण्याची त्यांनी तयारी केली. आजुबाजूच्या लोकांनी त्यांना पॅरोलची अजुन मुदत आहे, त्यामुळे तुम्ही घरी राहू शकता असे वारंवार सांगितले. त्या लोकांना शास्त्रीजी म्हणाले, ज्या कारणासाठी मला पॅरोल मंजूर झाला ते कारणच आता राहिले नाही. त्यामुळे नियमाप्रमाणे मला थेट तुरुंगातच गेले पाहिजे आणि सर्वाचा निरोप घेऊन शास्त्रीजी थेट तुरुंगातच गेले. त्याच्या या निर्णयामुळे तुरुंगाचा अधिकारीही विस्मयचकित झाला.
Leave a Reply