सर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द. अगदी ठार अडाण्यालाही या शब्दाचा अर्थ पटकन समजतो.
महिन्याचे १ ते १० असे दहा दिवस पगाराचे असतात. मी जी माहिती आपल्याला देणार आहे ती आपल्यास नसल्याने आपले काहीच बिघडणार नाही मात्र माहित असल्याने ‘पगार’ घेताना (पगार नाही) मजा मात्र दुप्पट वाढेल..!
मित्रांनो हा कोणत्याही भाषिकाला अगदी आपला वाटणारा शब्द मुळात ‘पोर्तुगीज़’ आहे हे माहित आहे का आपल्याला..?
‘हापूस (अल्फान्सो)’ आंब्याप्रमाणेच ‘पगार’ हा शब्द देखील आपल्याला गोव्यातील पोर्तुगीज़ांकडून वारशात(?) मिळालेला आहे. (‘हापुस’ व ‘पायरी’ हे शब्द पोर्तुगीज ‘अल्फान्सो’ व ‘परेरा’ या शब्दांचे अपभ्रंश आहे.)
पोर्तुगीज ‘पागा’ या शब्दापासून ‘पगार’ हा शब्द सिद्ध झाला आहे व त्याचा मुळ पोर्तुगीज अर्थ ‘श्रमाचा मोबदला’ असाच आहे. कोळी बांधव मासेमारीला ‘मासे पागणे’ असे म्हणतात ते याच अर्थाने. इतकेच कशाला मुंबईतील लोक खोली घेताना ‘पागडी’ देत, म्हणजेच मालकाला ‘मोबदला’ देत तोही याच अर्थाने.
‘वेतन’ हा शब्द चक्क वेताच्या छडी वरून आला आहे. तर कसा ?
फाऊन्टन पेनाचा शोध लागण्यापूर्वी बोरूने लिहीण्याची पद्धत होती व हा बोरू वेतापासून बनवत असत. वेतापासून तयार केलेल्या बोरूने कारकून लिखानाचे काम करीत व त्याबद्दल त्यांना जो मेहेनताना दिला जाई त्याल ‘वेतन’ असे नांव प्राप्त झाले.
‘वेतन’ या शब्दाची आणखी एक गम्मत आहे. वेताची काठी म्हणजे गवताचाचं एक प्रकार. अतिशय ‘लवचिक’ असणे हा या वेताचा गुणधर्म! आता बघां, नोकरदार माणसानं ‘लवचिक’ म्हणजे दुसर्या अर्थाने ‘नम्र’ असावंच लागतं असेच ‘वेतन’ शब्द सुचवित नाही का?
‘पगार’ हा शब्द साधारणतः शारिरीक कष्टाची कामे करणारा कामगार वर्ग उपयोगात आणतो तर ‘वेतन’ हा शब्द पांढरपेशे बुद्धीजीवी नोकरदार वापरतात. ही विभागणी आजही लक्षात येते.
इंग्रजी ‘Salary’ हा शब्द मुळ रोमन असून तो ‘Salt’ म्हणजे ‘मीठ’ या शब्दापासून तयार झाला आहे. पुर्वीच्या काळात रोमन सैनिकांना दिला जाणारा मोबदला मीठाच्या स्वरूपात दिला जाई तर फ्रान्सच्या सैनिकांना मीठ देण्याऐवजी ते विकत घेण्यासाठी ‘सोल’ या नांवाचे नाणे दिले जाई. है मीठ सैनिकांना त्यांच्या घोड्यासाठी उपयोगास येई. पुढच्या काळात मीठ देणे बंद झाले तरी केलेल्या कामाच्या मोबदल्यासाठी Salary हा शब्द सुरूच राहिला.
आपण नेहमी आपल्या मेहेनतीच्या पैशाला ‘घामाचा पैसा’ असे म्हणतो. आता बघा, घामाची चव खारट असते म्हणजेच त्यात ‘मीठ’ असते हे विज्ञान सांगते. म्हणजे ‘Salary’ हा मोबदल्यासाठी किती योग्य शब्द आहे नाही? आपल्या मराठीतील ‘खाल्ल्या मीठाला जागणे’ या वाकप्रचाराचा अर्थ आता आपल्या नीट लक्षात येईल.
— गणेश साळुंखे
९३२१८११०९१
आपल्या सदराचें/ लेखमालेचें नांव मी चुकून शब्दगंध लिहिलें, तें शब्दनाद असें लिहायला हवें होतें. क्षमस्व.
सुभाष स. नाईक
नमस्कार.
– आपलें शब्दगंध हें ‘सदर’ मी कायम वाचतो, व वाचून नेहमीच आनंदित होतो.
– शब्दांचें origin (Eytomalogy ) हा एक fascinating विषय आहेेेे. खूप माहिती आपण पुरवता, त्याबद्दल धन्यवाद.
– आपल्या सदरातील अन्य लेखांवरही कांहीं लिहायचें होतें, पण वेबसाईटच्या टेकनिकल अडचणींमुळे तें शक्य झालें नाहीं. तें शक्य होईल, तेव्हां लिहीनच .
– आपण ‘पागा’ पोर्तुगीझ शब्दाचा उल्लेख केलेला आहे. घोड्यांचीही ‘पागा’ असते ( ज्यावरून पागनीस — पागानवीस, हें आडनांव पडलेलें आहे ), त्या पागेचा या पागेशी कांहीं संबंध आाहे काय ?
– इ.स. १००० नंतर आफ्रिकेतील ‘बर्बर’ जमातीनें युरोपचा दक्षिणेकडील बाग पादाक्रांत केला होता, व तेथें राज्यें स्थापली होती, जी कांहीं शतकें अस्तित्वात होती. आजही स्पॅनिश मूरस् त्याचे साक्षी आहेत.
– तसेंच , Crusadesच्या काळात, युरोपीयन नुसते Holy Land मध्ये लढले एवढेंच नव्हे तर, येथें त्यांची राज्येही होती.
– या सर्वाच्या परिणामस्वरूप, स्पॅनिश व पोर्तुगीझ , व अन्य युरोपीय भाषामध्ये , अरबी व फारसीही शब्द शिरले व तिथें शतकानुशतकें स्थिरावले आहेत.
– हें सर्व आपणाला माहीत असेलच. पण मी त्याचा इथें खास उल्लेख करायचें कारण असें की,वरील ( किंवा अन्य) स्पॅनिश-पोर्तुगीझ शब्दाच्या मागे असा एखादा अरबी-फारसी शब्द आहे काय, याबद्दल आपण illuminate केलेत, तर आनंद होईल.
स्नेहादरपूर्वक,
सुभाष स. नाईक