‘चांदोबा..’
पहिल्या भागात मी ‘लोकसत्ते’च्या हेडींगने मला शब्दांच्या नादाला कसं लावलं, ते सांगीतलं होतं. लोकसत्ता तेंव्हा वाचनीय असायचा, आताही असतो, पण तेंव्हा काय वाचायचो ते समजायचं नाही पण काही तरी छान आहे येवढं मात्र समजत होतं. तेंव्हाच्या नकळत्या वयात डोळ्यांखालून गेलेल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेत्यांची नांवं व चेहेरे, देशांची नांवं, नट-नट्यांची नांव व चेहेरे, महत्वाच्या घटना व इतरही तपशील कुठेतरी मनावर नकळत नोंदला गेला होता व त्या तपशिलाचा मला पुढील आयुष्यात अतिशय उपयोग झाला आणि होतो आहे.
वाचनाची भुक तर वाढत चालली होती परंतू ती भागवण्यासाठी वाचायला काही मिळणं दुरापास्त होतं. महीन्याची टोकं जुळवणं आणि हाताचं नातं तोंडाशी असतं येवढंच त्याकाळी कळायचं, हाताचं नांत पुस्तकाशीही असतं, हे कुणाच्या लक्षातही यायचं नाही. दोन वेळचं खायला मिळणं महत्वाचं होतं, वाचन वैगेरेही करायचं असतं, हे कुणाच्या गांवीही नसायचं. वाचनाची ही भुक मग शाळेच्या पुस्तकावर भागवायला लागायची. शाळेची पुस्तकं जूनमधे हातात आल्यावर पहील्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत एकाच झटक्यात वाचून काढायची सवय तेंव्हापासून जी लागली, ती इयत्ता बारावी पर्यंत कायम होती. बारावीपर्यंत का, तर तो पर्यंत मराठी भाषा होती. इंग्रजीविषयी राग नाही, परंतू मी तिकडे फार आकर्षीत झालो नाही हे खरं. इंग्रजी पाठ्यपुस्तकं काय वाचली असतील, ती ही मार्कांसाठी, मराठीसारखी मनापासून नाहीच..!
माझ्या चाळीत समोरच्या घरात एक वेंगुर्लेकर नांवाचं कुटुंब राहायचं. कुटुंबप्रमुख नाटकवेडे आणि त्यांची मुलंही तशीच कलासक्त. मालवण साईडचं कुटुंब आणि चाळीतली बहुतेक कुटुंब तिकडचीच, त्यामुळे त्या ओढग्रस्तीतही नाटकं घालायचे. या कुटुंबातल्या मेघा आणि निलम या माझ्यापेक्षा दोन-चार वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलींशी तर माझं चांगलं जमायचं. या दोघीही चागल्याच गप्पीष्ट. विशेषत: पिच्चरच्या (मी लहानपणी ‘पिक्चर’ला ‘पिच्चर’च म्हणायचो आणि ‘अमिताभ बच्चन’ला ‘अमिता बच्चन’) स्टोऱ्या अशा रंगवून सांगायच्या, की जणूकाही थेटरात बसून तो पाहातोच आहे. निलम मला भाऊ मानून भाऊबिज करायची, मी गेलो तर अजुनही करेल. पण मेघाशी माझं विशेष जमायचं कारण तिला असलेली पुस्तकांची आवड. मला लायब्ररीचा मार्ग मेघानेच दाखवला आणि जणू अलिबाबाची गुहाच उघडून दिली. मेघा खुप अकाली चटका लावून गेली. हे काहीसं विषयांतर झालं, परंतू मी शब्दांच्या पालखीचा भोई झालो, त्या मागे वेंगुर्लेकरांच्या या दोन मुलींचा नकळतचा हातभार कसा होता, हे तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटलं..
लोकसत्तेतील वाचनात रमलो असतानाच पुढे या वेंगुर्लेकरांच्या रसिक घरात सर्वप्रथम ‘चांदोबा’ माझया आयुष्यात डोकावला आणि मग त्या लहानपणातल्या दुनियेत एक जादुई दालन उघडलं गेलं आणि इथून पुढे शब्द माझ्याशी खेळू पाहू लागले..हे देणं वेंगुर्लेकरांच्या घराचं..!!
चांदोबातल्या कथा असायच्या मोठ्या विलक्षण, मोहवणाऱ्या. या कथा मनावर काहीतरी सकारात्मक परिणाम करणाऱ्या असायच्या. त्यात संस्कार असायचा आणि काहीतरी संदेशही असायचा. रामायण, महाभारत, विक्रम-वेताळ, राजा-राणी-राजकुमार/री-दुष्ट जागुगार आणि आपल्यासारखंच एखाद्या आटपाट नगरीत राहाणाऱ्या कुटूंबाच्या कथा प्रत्येक महीन्याच्या चांदोबात असायच्या. चांदोबातल्या कथांचं आणखी एक आकर्षण मला होतं आणि ते म्हणजे प्रत्येक कथेला दिलेलं एखाद-दुसरं चित्र. चित्र हातीच काढलेली परंतू रंगीत आणि एवढी प्रमाणबद्ध असायची की ज्याचं नांव ते..! तसंच त्या चित्रातले सर्व तपशील पण हे एक वैशिष्टय असायचं. या चित्रात कथेतले अगदी बारीक सारीक तपशील सामावलेले असायचे. म्हणजे, “अगदी दूरून एका घराआड लपून तो राजकन्येकडे पाहात होता”, असं कथेत वाक्य असलं, की त्या ४ इंच बाय ३ इंचांच्या चित्रात तो राजकन्येकडे पाहाणारा माणूस कथेत वर्णन केलेल्या त्याच्या पेहेरावासकट आणि कथेत वर्णन केलेल्या हावभावासहीत हुबेहूब शोधता यायचा, इतकं त्या कथेशी तंतोतंत जुळणारं चित्र चांदोबातल्या त्या कथेला असायचं. कथेतलं वर्णन त्याच कथेच्या सुरुवातीला वा शेवटी वा मधेच दिलेल्या चित्रात शोधायचं पुढे पुढे वेडच लागलं आणि हिच सवय पुढे मोठेपण पुस्तक वाचतानाही कायम राहीली, ती अगदी या क्षणापर्यंत..!
मोठेपण वाचनात आलेल्या किंवा आता वाचनात येणाऱ्या पुस्तकांत चित्र नसतात, परंतू पुस्तकांत नसलेली ती चित्र पुस्तकातल्या विषयानुसार माझ्या कल्पनेने पुस्तक वाचता वाचता डोळ्यासमोर उभी करायची ताकद मला दिली, ती चांदोबाने..पुस्तक वाचता वाचताच पुस्तकातलं शब्दांनी उभं केलं नाट्य डोळ्यासमोर उभ राहायला लागलं आणि असं झाल्यानं तो विषय समजायलाही मदत होते, हे आता लक्षात येऊ लागलं..पुस्तकाच्या पांढऱ्या कागदावरील काळ्या शब्दांशी डोळे तादात्म्य पावलेले असतानाच्या वेळीच नजरेसमोर पुस्तकातलं नाट्य विलक्षण रंगात रंगून, जिवंत होऊन एक खेळ खेळत उभं राहातं. मग ते पुस्तक कोणत्याही विषयावरचं असो, मन त्याच्याशी अगदी एकरुप झालेलं असतं. मग ते पुस्तक पुस्तक न राहाता एक चालता-बोलता रंगमंच होतो आणि मी ते नाट्य विंगेतून पाहाणारं त्या नाटकातलंच एक मूक पात्र. पौराणिक कथा असो वा ऐतिहासीक किंवा मग एखादा सामाजिक विषय असो, विषय हलका-फुलका असो वा संशोधनाच्या अंगाने जाणीरा एखादा जड विषय असो, नजरेसमोर चित्र उभं राहाण्याची प्रक्रीया माझ्यासाठी सारखीच असते. फक्त डोळ्यासमोरची कल्पनेतली पात्र, माझ्यासहीत, विषयानुरूप वेश आणि भाषा बदलत असतात हाच काय तो फरक.
चांदोबातून ओळखीच्या झालेल्या रामायण, महाभारत, शिवलिलामृत, वेताळ पंचविशीतील कथा पुढे थोड्याशा मोठ्या वयात संपूर्ण वाचून काढल्या, त्या याच पद्धतीेने. कळत फार नव्हतंच, परंतू त्यातलं नाट्य मात्र मोहवत होतं. “अर्जूना, उचललते गांडीव, चढव बाण आणि खेच प्रत्यंचा” हे वाक्य कृष्णाने अर्जूनाला माझ्या साक्षीने सांगीतलेलं किंवा ‘विक्रमाच्या डोक्याची झालेली शंभर शकलं’ मी माझ्या नजरेनं अनुभवलेली आहेत, आजही अनुभवून पाहातो आहे. ही ‘चांदोबा’ची कृपा. या कथांतील नाट्य माझ्या कल्पनेनुसार माझ्या डोळ्यांसमोर घडताना मी मला वाटेल त्या क्षणी पाहू शकतो. आणि म्हणून कदाचित आज टिव्हीवर चालणाऱ्या कोणत्याही पौराणिक किंवा ऐतिहासिक किंवा कोणत्याही पोशाखी मालिका मी चुकूनही पाहात नाही. त्या चांगल्या किंवा वाईट असतात म्हणून किंवा मला आवडत नाहीत म्हणून नव्हे, तर माझ्या कल्पनेत उमटलेल्या त्या जिवंत आणि रसरशीत नाट्याला धक्का बसेल म्हणून..हे चुक की बरोबर, चांगलं की वाईट किंवा योग्य की अयोग्य याचा फार विचार मी करत नाही..!
‘लोकसत्ते’मुळे लागलेली वाचनाच्या गोडीला ‘चांदोबा’ने खतपाणी घातलं. वाचावं कसं, ते मला चांदोबाने शिकवलं. चांदोबाने माझं भावविश्व समृद्ध केलं. पुढे चांदोबा कायमस्वरुपी कुठे वाचायला मिळेल याचा शोध घेताना मला चांदोबाची समवयस्क अशी आणखी काही पुस्तकं सापडली आणि मग भावविश्व अधिक समृद्ध होत गेलं, त्याची कथा पुढील भागात..
नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply