मी शब्दांच्या प्रेमात पडलो त्याची कथा.. (भाग तीन)
‘किशोर, अमृत..’
‘लोकसत्ते’मुळे लागलेली वाचनाच्या गोडीला ‘चांदोबा’ने खतपाणी घातलं. वाचावं कसं, ते मला चांदोबाने शिकवलं. चांदोबाने माझं भावविश्व समृद्ध केलं. पुढे चांदोबा कायमस्वरुपी कुठे वाचायला मिळेल याचा शोध घेताना मला चांदोबाची समवयस्क अशी आणखी काही पुस्तकं सापडली आणि मग भावविश्व अधिक समृद्ध होत गेलं, त्याच्या पुढे..
आमच्याकडे पुस्तकं-मासिकं विकत घेतली जात नसत. परिस्थिती हे महत्वाचं कारणं. त्यासाठी शेजाऱ्यांची घर धुंडाळावी लागत, तेंव्हा कुठे एखादं पुस्तक हाती लागत असे. असेच एक शेजारी होते. दत्तू बोरकर त्यांचं नांव. पेशाने टॅक्सी ड्रायव्हर. आडव्या बांध्याचा आणि मध्यम उंचीचा टिपिकल गोंयकार. आम्ही आत्या म्हणत असलेली त्यांची पत्नी कुसूम. बोरकरांना विसंगत अशी देखणी, उंच आणि गोरीपान. कपाळावर कायम मोठं कुंकू. आणि कायम कोंकणीत अनुनासिक आणि मोठ्यानं बोलणं आणि तेवढंच मनमोकळं हसणं बोलणं. मला तर माझ्या त्या वयात ती नेहेमीच एखाद्या देवीसारखी वाटायची. याउलट बोरकर शांत, कुणाशीही फार बोलणं नाही. मला कायम ते टॅक्सी चालकाच्या, बहुतेक पांढऱा असावा अशी शंका येणाऱ्या, गणवेशातच पाहिलेले आठवतात. ते रात्री घरी येताना नवटांक घेऊन येतात, असं आजुबाजूच्या लोकांचं म्हणणं असायचं. शेजाऱ्यांचा हा वहीम बहुदा त्यांच्या गोवेकर असण्यामुळे असावा. आम्हाला त्यातलं फार काही कळत नसे तेंव्हा. पण हा माणूस मनाने उमदा. या नवरा-बायकोंचा पुस्तकांशी अजिबात संबंध नव्हता. म्हणजे नसावा.
या बोरकर दांपत्याला प्रदीप, रेखा, मंगल, संदीप आणि संतोष अशी पाचं मुलं. यातला प्रदीप माझ्यापेक्षा मोठा. तो फारसा घरात नसायचा. आता हा प्रदीप मुंबईच्या ‘रिलायन्स एनर्जी’ या कंपनीत बडा अधिकारी आणि कामगारांचा पुढारीही आहे. रेखाही माझ्यापेक्षा मोठी. गोरीपान, उंच आणि देखणीही. माझ्याच वयाच्या मंगलशी फार जवळीक नव्हती, तर संदीप आणि संतोष माझ्यापेक्षा लहान आणि त्यामुळे ते ही दूरदूरच. दोन नंबरच्या या रेखाला वाचनाची अतोनात आवड. म्हणून कदाचित ती माझ्यापेक्षा वयाने मोठी असुनही तिच्याशी माझं मैत्र जुळलं होतं. मागच्या भागातल्या वेंगुर्लेकरांच्या मेघासारखं.
बोरकरांविषयी थोडं विस्तारांने लिहिलं, कारण मला पुस्तकांचा खाजिना या घरात गवसला. मी खऱ्या अर्थाने शब्दांच्या पालखीचा भोई झालो तो इथेच. उभ्या-आडव्या विस्तारलेल्या सात माणसांचं कुटुंब दिडशे चोरसफुटांच्या, कौलारू चाळीतल्या घरात राहात असल्यामुळे घर कायम अस्ताव्यस्त. त्यातच बरीचशी पुस्तकं, मासिकंही असायची. म्हणजे ती ताजी असायची असं नाही, पण असायची. पुस्तकातं तारीख-महिनावारचं ताजेपण हे नंतरच्या कळत्या वयात समजलं. तेंव्हा जे मिळेल ते ताजंच वाटायचं. बोरकरांच्या घरातच मला वर्षा-वर्षाचे चांदोबाचे एकत्र बाईंडिंग केलेले गठ्ठे सापडले होते आणि ते मी आधाशासारखे वाचुनही काढले होते.
बोरकरांकडेच माझी ओळख मराठीत अद्भुत गोष्टी सांगणाऱ्या गोष्टींच्या २४ पानी पुस्तकांशी झाली. दोन किंवा तीन रंगातलं मुखपृष्ठ, आतल्या राजा, राणी, राजकुमार, राजकुमारी, राक्षस, जादुची गुहा, त्यातील चेटकीण, तीला मिळालेला शाप इत्यादींच्या रोमांचकारी गोष्टी या पुस्तकांत असायच्या. यातील राक्षसाचा प्राण हटकून कुठेतरी दूरच्या गुहेत असलेल्या पिंजऱ्यातल्या पोपटांत किंवा असाच कुठेतरी ठेवलेला असायचा. तो पोपट किंवा त्याचा प्राण असलेला जे काही नष्ट होत नाही, तो पर्यंत त्या राक्षसाचा नायनाट होत नसे. प्राण दुसरीकडे ठेवायची कल्पना मला तेंव्हा बेहद आवडायची, अजुनही आवडते. हल्ली बहुतेक ‘राक्षसां’चा प्राण स्विस बॅंकेत किंवा एखाद्या बड्या बांधकाम प्रकल्पात असतो असंही लक्षात येतं ही २४ पानी पुस्तकं त्या काळातल्या माझ्या वयाच्या मुला-मुलींना भुरळ घालत असे. सर्व जादुई दुनियाच होती ती सारी. ह्या पुस्तकातं प्रकाशन, नक्की आठवत नाही, गिरगांवातले कोणीतरी रेळे किंवा रोडे गुरुजी करत. ही पुस्तकं गिरगांवातून प्रकाशित व्हायची आणि त्यांची किंमत २५ किंवा ५० नये पैसे असे हे मात्र नक्की आठवतं.
इथेच मला पुढं ‘किशोर’ गवसला आणि वेड लावता झाला. २४ पानांची करमणूक आणि लोकसत्ता चांदोबामुळे मनाची घडवणूक नकळत सुरु असतानाच, बोरकरांच्या त्या अस्तावस्त घरात मला चांदोबाचं अधिक शहाणं भावंड म्हणता येईल असा ‘किशोर’ हाताशी लागला. माझ्या वयातही एव्हाना थोडीशी वाढ झालेली होती आणि सहाजिकच वाचनाची भुकही वाढली होती. ‘चांदोबा’ची स्वप्नमय दुनीयेची जादू कायम असतानाच, ‘किशोर’ने माझ्या खांद्यावर मित्रासारखा हळूच हात टाकून, मला आजुबाजूला दिसू शकणाऱ्या माझ्याच जगातल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. ‘किशोर’मधल्या कथा माझ्याच वयाच्या मुलांच्या असायच्या. कथेतल्या मुलांचं वय साधारण माझ्याइतकंच असल्याने त्या कथा मनाला भावायच्याही.. चांदोबापेक्षा किशोरचं आकारासहीत असलेलं हे वेगळं जग मला आवडत होतं.
पण का कोण जाणे, मी ‘किशोर’मधे ‘चांदोबा’सारखा फारसा रमलो नाही. त्या वयात मित्रापेक्षा ‘मामा’ जास्त ओळखीचा असतो म्हणून असं झालं असावं का? काय माहित, पण किशोर मला फार काळ नाही रुचला हे मात्र खरं. चादोबाएवढा मला तो उपलब्ध होत नव्हता, हे एक कारण असू शकेल. आणखी एक कारण असू शकेल, ते म्हणजे बोरकरांच्याच घरात हातात त्याच दरम्यान अवचित हातात आलेली ‘अमृत’ किंवा ‘कुमार’ या ‘रिडर्स डायजेस्ट’च्या आकाराची पुस्तकं. ‘रिडर्स डायजेस्ट’ची ओळख मला एका डाॅक्टरांच्या दवाखान्यात किंवा वेंगुर्लेकरांच्या घरात झाली होती, त्यामुळे त्याचा आकार माहित होता. तेंव्हा हे मासिक, तेंव्हाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांइतकंच दुर्मिळ होतं. ‘कुमार’ नीट्स नाही आठवत पण ‘अमृत’ बऱ्यापैकी आठवतं. त्यातली माहिती काहीशी वेगळी, रुढ गोष्टींच्या पलिकडे नेणारी आणि कुतूहल वाढवणारी असायची. केवळ उपदेशपर माहिती त्यात नसून, जगातली आश्चर्य, कोडी इत्यादीवर भर असायचा. ते सारं गुढ वाटायचं त्या काळात. ‘अमृत’ने तेंव्हा माझ्या जाणिवा विस्तारायला मदत केली असावी, असं मला आता वाटतं..
मला नक्की आठवत नाही, ‘नवशक्ती’ की ‘अमृत’, पण बहुदा अमृतमधेच ‘मुद्रा राक्षसाचा विनोद’ किंवा ‘उपसंपादकाच्या डुलक्या’ नांवाचं एक सदर असायचं. या सदराचं तर मी पारायण करायचो. शब्दांशी असंही खेळता येतं, एखादा काना-मात्रा किंवा उकार-वेलांटी किंवा दोन शब्दांतली स्पेस इकडे-तिकडे झाल्यास अर्थाचा अनर्थ किंवा गंभीर वाक्य कसं पार विनोदी होऊन जातं, हे वाचून मजा यायची. असे विनोद तेव्हाच्या छपाईच्या तंत्रामुळे व्हायचे. २४ पानी पुस्तकातल्या राक्षसापेक्षा हा राक्षस मला अधिक भावला.
आताच्या पिढीला हे कदाचित कधीच समजणार नाही, पण तेंव्हा छपाईचा मजकूर हाताने जुळवायला लागायचा. आतासारख सगळं काही सोपं नव्हतं. कंम्प्युटर शब्दाचाही जन्म झाला नव्हता. प्रत्येक अक्षराचे ठसे किंवा छाप असायचे. त्यांना खिळे म्हणत. ते खिळेही बारीक ते मोठे अश्या आकारात असतं. हे शिशाचे असतं. लिहिलेला सरळ मजकूर छापांवर उलट वाचायचा, तो प्लेटवर लावायचा आणि मगच तो छापल्यावर सरळ दिसायचा. खिळे जुळवणारे फार ज्ञानी नसले तरी पटाईत असायचे. यांना कंपोझर म्हणत.
आता तुमच्या मनात येईल, की तेंव्हा १२-२३ वर्षांचा असलेल्या मला, हे सर्व कसं काय बुवा समजलं म्हणून. पण शंका रास्त आहे. मला हे तेंव्हाच समजलं, कारण माझ्या शेजारीच, परंतू थोडी लांब असलेली प्रिन्टींग प्रेस. ही प्रेस चालवणारे होते श्री. जगदीश देसाई. या प्रेसमधे हॅन्ड बिलं, लग्न पत्रिका इत्यादी छापलं जायचं. त्या अजस्त्र मशिन्सवर खिळ्यांच्या सहाय्याने बनवलेली प्लेट, कोऱ्या कागदावर सुबक अक्षर उमटवायची, ते पाहाणं फार आनंदाचं होतं. प्रेसवर गेलो, की एखाद्या जमवलेल्या प्लेटवर देसायांची नजर चुकवून तळहात दाबायचा आणि मग हातावर उमटलेली ती अक्षारांची सुबक नक्षी डोळे भरून पाहायची, हे आनंदाचं काम होतं. हा प्रयोग मी घरी येऊन खोडरबरावर माझं नांव ब्लेडने उलटं कोरून, त्या छापावर शाई लावून, त्याचा छाप कागदावर मारून करायचो. जमायचं नाही नीट, पण त्यातून भारी केलंय किंवा जमतंय असं मात्र निश्चितच वाटायचं..
विषयांतर झालं थोडसं, पण ते गरजेचं होतं. या खिळ्यांना ‘मुद्रा’ म्हणत असावेत, असं तेंव्हा अंदाजानं कळलं होतं. वर म्हटल्याप्रमाणे या मुद्रा लावायचा चुकल्यामुळे मुद्रा राक्षसाचा विनोद घडत असे. उदा. “मी मंत्री साहेबांकडे गेलो तेंव्हा ते गाढ व शांतपणे झोपले होते” हे वाक्य ‘गाढ व शांत’ यातील ‘व’च्या खिळ्याची जागा चुकल्यामुळे “मी मंत्री साहेबांकडे गेलो तेंव्हा ते गाढव शांतपणे झोपले होते’ असं अनर्थकारी व्हायचं. अशी अनेक वाक्य ‘अमृत’च्या मासिकात दिलेली असायची. असाच काॅलम पुढे ‘नवशक्ती’ दैनिकातही वाचायला मिळाला होता, ते ही आठवतं..
‘अमृत’वरच्या या लेखात प्रत्यक्ष अमृतपेक्षा बोरकर कुटूंब, ‘मुद्राराक्षसा’वरच जास्त लिहिलेलं तुमच्या लक्षात आलं असेल. कारण ते गरजेचं होतं आणि त्याचा माझ्यावर प्रभावही पडल्याचं आता जाणवतं. बोरकरांमुळे मला ‘अमृत’ प्राप्त झालं आणि त्या ‘अमृत’मंथनातून निघालेल्या मुद्राराक्षसाने मला जे तेंव्हा झपाटलं, ते अगदी या क्षणापर्यंत. वयाच्या १३-२४व्या वर्षी मानगुटीवर बसलेला हा राक्षस, अद्याप उतरायला तयार नाही. मी ही त्याला उतरवायचा प्रयत्न कधी केला नाही. अनेकजण ‘पैसा’ या अर्थाने ‘मुद्रा’ या शब्दाचा अर्थ घेतात, मला मात्र ‘मुद्रा’ म्हटलं की हटकून अक्षरं आणि त्या अक्षरांचा वावर असलेलं पुस्तकच आठवतं, हा त्या ‘मुद्रां’चा माझ्यावर असलेला प्रभाव.
किशोरचं आता डिजिटायझेशन झाल्याचं कळलं, पण ते वाचणारी पिढी उरलेली नाही याची खंतही वाटते. अमृत आहे किंवा नाही किंवा असल्यास त्याचं स्वरुप बदललंय का हे कळत नाही..
लोकसत्ता, चांदोबाने मला वाचनाची चव दाखवली, तर थोड्याश्वा वाढलेल्या वयात मिळालेल्या ‘अमृत’ने मला वाचन चवीने कसं करायचं ते शिकवलं. शब्दांचे खेळ कसे करता येतात, शब्दांसोबत कसं बागडता येतं, केवळ क्रम किंतित बदलला, की तीच अक्षरं कसा दुसऱ्या टोकाचा अर्थ ध्वनित करतात, याची पहिली ओळख ‘अमृत’मधल्या त्या ‘मुद्राराक्षसा’ने करून दिली, त्याची गंम्मत पुढल्या भागात..
— ©️ नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply