‘मारवाडी’ या शब्दाचं ‘चिकूशी’ घनिष्ट मेतकूट असल्याचं आपण लहानपणापासून ऐकत आलोय. प्रत्यक्षात आपला संबंध घोलवडच्या खाण्याच्या चिकूशीच जास्तं येत असल्याने, राजस्थानातील मारवाड्याशी त्याचा काय संबंध, असा प्रश्न कधीना-कधी आपल्याला पडतोच.
‘मारवाड्या’चा अविभाज्य भाग असलेल्या ‘चिकू’चा आपण समजतो तसा खाण्याच्या चिकू नामक फळाशी काहीही संबंध नाही हे थोऽऽडा विचार केला तर लक्षात येतं. मारवाड्याचा संबंध कंजूसपणाशी येतो हा आपला अनुभव आणि चिकूचं फळ तर भरभरून देणारं असतं हा ही आपलाच अनुभव..! चिकूत एकमेवं बी आणि बाकीचा सर्व गाभाच. एकंदर ‘खाण्यासाठी भरपूर देणे’, ते ही सालीसहीत, हा चिकूचा स्वभाव मारवाड्याच्या ‘काहीच न देणे’ अश्या स्वभावाशी एकदम विपरीत, मग चिकूने एकदम मारवाड्याशी लंगोटी यारी का बरं केली असावी?
तर, आपण खातो त्या चिकूचा मारवाड्याशी लग्नं केलेल्या चिकूशी दुरूनही संबंध नाही. मारवाड्यातला चिकू हा ‘चिकट’ या शब्दाचा अपभ्रंश असावा..पैशाला चिकटून बसतो तो ‘चिकटू’ व पुढे ‘चिकू’ झाला असावा असं अनुमान काढता येते.
या ‘चिकू’ शब्दाचा जन्म कानडी ‘चिक’ या शब्दामुळे झाला असंही शब्दकोशात दिलेलं आढळतं. कानडी ‘चिक्’चा अर्थ ‘लहान’ असा होतो. लहान मुलांसारखा पैशाला चिकटून बसतो तो मारवाडी असाही अर्थं काढता येतो पण तो तितकासा पटत नाही. कानडी चिकशी साधर्म्य असणारा एक मराठी शब्द आहे, ‘चिक्कार’..!! पण याचा अर्थ नेमका उलट, म्हणजे ‘भरपूर, मोठा’ असा होतो. याचाच अर्थ ‘चिकू मारवाडीत’ला ‘चिकू’ हा शब्द ‘चिकट’ या शब्दापासून तयार झाला असं म्हणता येते.
मारवाड्यानं कधी चिकूचा व्यापार केला असेल असं मला वाटत नाही..मारवाडी व मारवाडी जैन समाजाचा आर्थिक उत्कर्ष खुप अलिकडचा आहे. त्याच्याहीपेक्षा व्यापारात पूर्वापार गुजराती समाज अग्रेसर होता व आहे.
मारवाड्यांचा मुख्य उद्योग व्याजाने पैसे देणे हाच होता व आजही आहे. लोक दागिने तारण ठेऊन पैसे घेत व त्यातून त्यांच्या सोन्या-चांदीच्या पेढ्या निर्माण झाल्या. आजही मारवाड्यांच्या पेढ्यांवर पैसे कर्जाऊ देण्याचा उद्योग दागिने विकण्यापेक्षा मोठा आहे. मारवाडी समाजाचा कल कायदा पाळण्यापेक्षा कायद्यातून पळवाटा काढून धंदा करण्याकडे जास्तं आहे..गुजरातीही त्यांचाच भाईबंद पण थोडा तरी कायदा पाळणारा आहे.
आता दान-धर्माबाबत..!
मारवाडी-गुजराती समाज घाणीतील पैसाही धुवून घेतील. चमडी देतील पण दमडी सोडणार नाहीत. पण आश्चर्य म्हणजे हाच समाज दानधर्मात अग्रेसर असल्याचं सहजपणे दिसून येईल. धर्मशाळा, देवळं, मोठमोठाली धर्मादाय हॉस्पिटल्स, शिक्षणसंस्था याच समाजाच्या नांवावर असल्याचे दिसेल. बनारसमधील विधवांच्या आश्रमांचे आश्रयदाते जास्तं करून हेच लोक आहेत. रेल्वे स्टेशनवरील बाकांवरची नांवं जरी वाचली तर कोठारी किंवा पोरवाल दिसेल.
मारवाडी-गुजरात्यांनी ज्याठिकाणी स्थलांतर केलं, त्याठिकाणी समाजालाही काहीतरी भरीव करण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल. तुम्ही कधी मुंबईतील काही स्मशानं पाहिलीत ? एकदम फाईव्ह स्टार आणि फुकट हो..! ही गुजराती-मारवाडी समाजाची देण..!! पै-पैसाठी मरणारा गुज्जु-मारवाडी अशावेळी पैशांकडे अजिबात बघत नाही. मंदिरावर तर उधळपट्टी वाटावी येवढा खर्च करतो, हे अनाकलनीय आहे.
या समाजाचं स्थलांतर, विषेशत: गुजराती, आजचं नाहीय..खुप पिढ्यांचा इतिहास आहे त्याला..ते जिथे गेले, तिथला वेश आणि भाषा त्यांनी आपलीशी केली. ते त्या समाजात मिसळून गेले, त्या समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला..म्हणून जगभर सर्वदूर हे पसरूनही त्यांच्याविषयी त्या ठिकाणी असंतोष नाही..
ते चिकू नसून भयंकर हिशोबी असतात असं म्हणणं जास्त योग्य होईल.
– गणेश साळुंखे
Leave a Reply