मुलगा.
वंशाचा दिवा, कुलदिपक, संपत्तीचा वारस..काय काय नांवाने याला पुकारलं जात.
भारतात कुठेही गेलात तरी ‘मुलगा’ हा शब्द अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला आपल्याला आढळेल ( केरळ व महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हे सन्माननीय अपवाद! इथे मुलग्यांची क्रेझ नाही)
महाराष्ट्रापुरते बोलायचं झालं तर ‘मुलगा’ हा शब्द अगदी अस्सल मराठी मातीतला वाटतो. पण मित्रांनो, अस्सल मराठमोळा वाटणारा हा शब्द मुळचा मराठी नाही हे आपल्याला माहित आहे का?
तर, अगदी आपला घरातला वाटणारा हा ‘मुलगा’ मुळ तेलगु आहे. मुलगा या शब्दासाठी तेलगुत ‘बुरगुंडा’ हा शब्द आहे व त्याचा शॉर्टकट ‘बुरगें’ असा होतो व हा तेलगु ‘बुरगे’च आपल्या मराठी ‘मुलगा’चा जन्मदाता आहे.
हजारो वर्षांपासून मराठीचा संबंध कन्नड, तमीळ, तेलगु इ. सारख्या दाक्षिणात्य भाषांबरोबर आहे. आपण ज्या ‘मराठी’ भाषेचा अभिमान बाळगतो त्या आपल्या मराठीत निम्म्याच्या जवळपास शब्द दक्षिणेतील भाषा, अरबी, फारसी, तुर्की व काही प्रमाणात पोर्तुगीज या भाषांतील आहेत.
असो, तर तेलगुतून हा ‘बुरगे’ मराठीत येताना ‘बुलगे’ असा झाला – ( ‘र’ चा उच्चार ‘ल’ असाही केला जातो. आठवा लहान मुलांचे बोबडे बोल. ‘काय करतोस’ हे वाक्य लहान बाळाशी बोलताना आपण देखील नकळत ‘काय कलतोश शोन्या’ असे बोलतो) – व कालांतराने ‘बुलगे’ हा शब्द अपभ्रंशीत होत ‘मुलगे’ ‘मुलगा’ असा स्थिर झाला असावा..
‘मुलगा’ या शब्दाला एक दुसराही आयाम आहे. जसे एवढ्याश्या ‘मुळा’पासून मोठा वृक्ष तयार होतो तसाच ‘मुलगा’ हा वंशवृक्षाची वाढ करणारं ‘मुळं’च असतो व या अर्थानेही तो त्या वंशाचा ‘मुळ’गा असतो.
मुलासाठी ‘चिरंजीव’ हा शब्द एकतर लग्नाच्या पत्रिकेत किंवा हेटाळणीच्या सुरात बोलताना बाप आपल्या मुलाविषयी वापरतो. हा शब्द मुलासाठीच का वापरला जातो?
कारण आपल्या संस्कृतीत मुलगा हा वंशाचे नांव पुढे चालवतं असतो म्हणजेच तो वंश पुढे नेत ‘चिरंजीव’ करत असतो म्हणून मुलगा ‘चिरंजीव’!!
इंग्रजीतील Son या मुलगादर्शक शब्दाची उत्पत्ती विचार करण्यासारखी आहे. हा शब्द संस्कृत ‘सुनु’ या ‘मुलगा’ याच अर्थाच्या शब्दापासून तयार झाला असावा असे माझे मत आहे. गंमत म्हणजे बहुतेक सर्वच युरोपीय भाषांमध्ये उच्चारांत आणि स्पेलिंगमध्ये थोडाफार फरक असला तरी मुलगा या अर्थाच्या शब्दात ‘स’ आणि ‘न’ ही अक्षरं मुख्य असलेली दिसतात. ‘सन’ म्हणजे इंग्रजीत सुर्य आणि इंग्रजी घरात मुलगा जन्माला येणे म्हणजे सुर्य उगवल्यासारखेच असावे व म्हणूनही मुलाला Son म्हणत असावेत कदाचित!
जाता जाता –
संस्कृत मध्ये किंवा टि.व्ही. वरच्या ऐतिहासिक किंवा पौराणिक मालिकांमध्ये मुलाला उद्देशून ‘पुत्र’ हा शब्द सर्रास वापरला जातो. पण ‘पुत्र’ या शब्दाचा मुळ अर्थ ‘आत्मज’ अथवा मुलगा किंवा मुलगी असे कोणतेही ‘अपत्य’ असा आहे. हिंदी पिक्चर मध्ये एखादा उत्तरेकडचा वा पंजाबी बाप आपल्या मुलाला आणि मुलीलाही ‘पुत्तर’ असा हाक मारताना ऐकलेला व पाहिलेला आठवतोय का आता?
हिंदीमधील बेटा, लडका हे शब्द कुठून आले, त्यांचे मुळ कोणत्या भाषेत आहे याचा माझा शोध सुरू आहे. यासंबंधात आपल्यालाही काही माहित असल्यास किंवा काही माहिती सापडल्यास मला जरूर कळवावे.
-गणेश साळुंखे
9321811091
नमस्कार.
माहितीपूर्ण लेख.
ही आणखी थोडी माहिती :
१. पूर्वी ‘तुला बुरगुंडा होऊं दे’ असा आशिर्वाद देत असत. त्याच अर्थ माहीत होता, पण तो शब्द तेलगु आहे, हें नवीन कळलें. धन्यवाद.
२. ‘लोकभारती बृहद् प्रामाणिक हिन्दी कोश’ सांगतो की, ‘बेटा’ हा शब्द ‘बटु’ पासून निघालेला आहे.
३. तोच कोश सांगतो की, ‘लड़का’ हा शब्द ‘लाड़’ या शब्दपासून निर्माण झालेला आहे.
४. ‘पुत्र’ यावरून मला एक हिंदी पद्य आठवलें :
‘पूत सपूत तो क्यों धन संचै ?
पूत कपूत तो क्यों धन संचै ?’
पुत्र जर सुपुत्र असला तर धनसंचय करायची काय जरूर ? ( कारण, तो त्या धनावर अवलंबून रहाणार नाहीं ; तो स्वत:च कमवेल) . आणि, पुत्र हा कुपुत्र असला तर धनसंचय करायची काय आवश्यकता ? ( कारण, तें संचित धन तो ‘उडवूनच’ टाकणार, waste करणार. )
सस्नेह,
सुभाष स. नाईक