जून महिन्यातील साधारणपणे दुसरा आठवडयाचा सोमवार म्हणजे शाळा सुरु होण्याचा दिवस.. म्हणजेच आजचा दिवस!! दोन वर्षांपूर्वी या दिवशी छोटी मुलं नवीन कपडे घालून शाळेचा श्रीगणेशा करायला जात होती. फुलबाग फुलत होती.
गेल्या व या वर्षी कोरोनामुळे लहान मुलं घराघरांत कोंडलेली आहेत. त्यांचं बालपण हिरावलं गेलंय. घराबाहेर न पडण्यामुळे खेळणं बंद, मित्रांसोबत प्रत्यक्ष बोलणं बंद. पूर्वी त्यांना मे महिन्यात व दिवाळीला सुट्टी असायची, ती कधी सुरु होते असं त्यांना वाटायचं. आता ही ‘भली मोठ्ठी सुट्टी’ नकोशी वाटू लागली आहे.
मी काही तसा बालवाडीत गेलो नव्हतो, एकदम पहिलीतच प्रवेश घेतला. शाळेत जाण्याची उत्सुकता होती, त्यामुळे रडणे वगैरे प्रकार झाले नाहीत.
हेच माझ्या मुलाच्या बाबतीत झालं नाही. त्याला बालवाडीत घातल्यानंतर त्यानं वर्गात बसायला जाण्याऐवजी रडायला सुरुवात केली. पोंक्षेबाईंनी त्याला ताब्यात घेऊन मला जायला सांगितले.
हळूहळू तो रुळला. रहायला सातारारोडला असल्यामुळे त्याला रिक्षा लावली. रोज सकाळी उठून, त्याला तयार करुन, रिक्षावाल्या काकांच्या ताब्यात द्यावं लागे.
राणी लक्ष्मीबाई मंडळ, वनिता समाजची प्राथमिक शाळा, पेरुगेट भावे हायस्कूल असा त्याचा रिक्षा प्रवास चालू होता. रिक्षावाले काका बदलत गेले, मात्र रिक्षा आणि शाळा हे समीकरण तसंच राहिले.
हा आढावा घेण्याचं कारण असं की, कोरोनाच्या महामारीमुळे आता जी मुलं बालवाडीपासून पुढे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेतील त्यांच्या व आपल्या पिढीच्या शिक्षण पद्धतीत फार मोठा फरक राहणार आहे.
ज्या लहान वयात मुलांच्या हातात स्मार्ट फोन देणं आरोग्याच्या दृष्टीने घातक असतं, त्याच वयात त्यांना या मोबाईलवर ऑनलाईन शिकावं लागतंय. त्या मोबाईलमध्ये फक्त शिक्षणाचं अॅप डाऊनलोड किंवा व्हिडिओ काॅलपुरतीच मर्यादा ठेवता येत नाही. ते साधन हे काडेपेटी सारखं आहे, त्यानं निरंजन पेटवता येतं आणि स्फोटक आगही लावता येते.
गेल्या आठवड्यात वर्तमानपत्रात एक बातमी वाचली, एका विद्यार्थिनीने हेडमास्तरांना पत्र लिहिलं की, ऑनलाईन शिकण्यासाठी आमच्या आई-वडिलांनी आम्हा तिघांसाठीही पैसे उभे करुन मोबाईल घेऊन दिले, मात्र सध्या कोरोनामुळे वडिलांना कामच नसल्याने मोबाईल रिचार्ज करायलाही पैसे नाहीत. त्या हेडमास्तरांनी पैसे जमवून त्यांचे मोबाईल रिचार्ज करुन दिले. अशा किती विद्यार्थ्यांना हेडमास्तर पुरे पडणार?
बालवाडीत मुलं एकमेकांत मिळून मिसळून राहतात. एकत्र डबा खातात. गाणी गातात. त्यांच्या अंगातील गुणांना शाळेत वाव मिळतो. अक्षरं, अंक काढायला शिकतात. आता हे सर्व ऑनलाईन कसं होऊ शकेल?
प्राथमिक शाळेत जी हाताने लिहिण्याची सवय लागते, ती या ऑनलाईनने नक्कीच राहणार नाही. लिहिणं आणि टाईप करणं यात जमीन आसमानचा फरक आहे. मजकूर लिहिताना तो मेंदूमध्ये देखील कोरला जातो. तसं टाईप करणं म्हणजे एक प्रकारची यांत्रिक क्रिया आहे.
सध्या काही कंपन्यांनी पाचवी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अॅप्सची निर्मिती केली आहे. त्यांची वर्गणी भरली की, वर्षभराचा अभ्यासक्रम डाऊनलोड होतो. त्यामुळे पालकांना रोजच्या रोज मुलांचा अभ्यास घेण्याची गरज नाही.
काही काळानंतर पुस्तकं वाचून अभ्यास करणं ही संकल्पना नामशेष होईल. जे काही वाचायचं ते ऑन स्क्रिनवरच! पुस्तकांच्या दुकानात प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाचे पेनड्राईव्ह विकत मिळतील. आता तर परीक्षाही ऑनलाईन दिली जाते. मात्र शास्त्र विषयातील आकृती काढणं, भूमितीची प्रमेयं सोडवणं हे ऑनलाईनवर शक्यच नाही.
पूर्वी परीक्षा देणं, हा ध्यास असायचा. तीन तासांचा पेपर सोडवताना वर्षभरातलं शिकविलेलं आठवावं लागायचं. विषय आवडता असेल तर उत्तरपत्रिकेला पुरवणी जोडावी लागायची.
सर्व पेपर उत्तम गेले तरी सत्तर ऐंशी च्या पुढे मार्क कधीही मिळायचे नाहीत. आता ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमुळे उत्तर बरोबर असेल तर पैकीच्या पैकी मार्क दिले जातात. तिथं विद्यार्थ्याच्या सुवाच्य अक्षरलेखनाचा विचार केला जात नाही. अक्षर खराब असले तरी मार्क हे पूर्णच दिले जातात.
काही वर्षांनी ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था निर्माण होतील. तिथे फक्त उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत विद्यार्थी प्रवेश घेतील. मध्यमवर्गीय व कमी उत्पन्न गटातील मुलांना शाळेतच जावे लागेल. ज्यांनी ऑनलाईन उच्च शिक्षण घेतलंय ते परदेशात जातील. बाकीचे साधी नोकरी किंवा व्यवसाय करतील. शिक्षण घेणं, हे सामान्यांना परवडण्यासारखे राहणार नाही.
आतापर्यंत ज्या विविध सांस्कृतिक कला जोपासल्या गेलेल्या होत्या, त्या तशा पुढे राहतील का, अशी शंका वाटते. कारण आतापर्यंत या कलांसाठी कार्यशाळा असायच्या, क्लासेस असायचे. हेच ऑनलाईन शिकायचं म्हटल्यावर, पाट्या टाकल्यासारखं होईल. सहा महिने ऑनलाईन शिकल्यावर, ऑनलाईनच प्रमाणपत्र मिळेल. पण प्रत्यक्षात ती कला आत्मसात केलेली असेल का?
आतापर्यंत आपल्या पिढीने जो खरेदीचा आनंद घेतला आहे, तो यापुढील पिढीला कदापिही मिळणार नाही. कारण आत्तापासूनच किराणा असो वा भाजीपाला असो, तो ऑनलाईन मागवला जातो. त्यांच्या विविध ऑफरसाठी आवश्यकतेपेक्षा अधिक खरेदी केली जाते. कपडे, होजिअरीसुद्धा ऑनलाईनवर खरेदी करणारे खूपजण आहेत.
ऑनलाईन खाद्य पदार्थ मागविणे ही तर फॅशन झालेली आहे. परिणामी काही वर्षांनंतर दुकानं कमी होतील व अशी सर्व प्रकारची आऊटलेट्स वाढतील.
या सर्व सुखकारक गोष्टींचा आत्मा एकच आहे, ते म्हणजे इंटरनेटचे नेटवर्क! ज्या दिवशी हे नेटवर्क बंद पडेल, त्या दिवशी माणसं वेडी होतील. शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेच. आपण मोबाईलची बॅटरी संपली तर पाॅवरबॅंकने मोबाईल चालू ठेवू शकतो, मात्र नेटवर्क नसेल, तर त्याला अजून तरी पर्याय नाहीये.
तेव्हा फक्त शाळेच्याच बाबतीत नव्हे तर इतरही बाबतीतही ऑनलाईनच्या किती आहारी जायचं हे ज्याचं त्यानं ठरविण्याची वेळ आलेली आहे.
‘शाळा सुटली, पाटी फुटली.आई मला भूक लागली’ हे आज शाळेच्या पहिल्या दिवशी इतिहासजमा झालंय, हेच खरं.
© सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
७-६-२१.
Leave a Reply