शामल शामल संध्याकाळी,
पुन्हा सगळे गुंतवीत धागे,
प्रीत जडे कशी अनुरागी,
जसे घडले तेव्हा मागे, –!!!
एकमेका अनुरक्त होता,
जीव थोडाथोडा होई,
प्रीत जुळता रेशमी ती,
परत एकदा भेटू दोघे,–!!!
पापण्यांची थरथर अगदी,
तारुण्य किती अलवार, सावल्यांच्या साक्षीने तो,
मिलाफही सुकुमार, –!!!
हात गुंफता हातामध्ये,
मजेची ती सफर करू,
प्रेम प्रीती कोमलांगी,
हळूच कशी उरी धरू,–!!!
कानाशी बोल रूणझुणे,
परस्परा गुपित सांगत,
अस्तित्व तेथील तळ्याचे,
वाटे धीरगंभीर – प्रशांत,–!!!
सूर्य बुडतां बुडतां ,
प्रेमधून वारा वाजवी,
साक्षीने वृक्षांच्या त्या,
देवघेव आणाभाकांची,-!
हळुवार स्पर्श होता तुझा,
रोमांच उठले अंगावरी,
मग तू जवळी घेता,
धकधक उगी वाढे उरी,–!!!
मोहाचे क्षण कितीक,
येती सारखे सारखे,
असुनी कोवळ्या वयातही
स्वर्गसुख तेच भासे ,–!!!
ओढ तुझी जीवघेणी,
अंधारल्या त्या प्रकाशी,
खेळ सुरु होई तेव्हा,
चांदण्यांचा वर अवकाशी,–!!!
चंद्रमा किती द्वाड तो,
मेघात लपे सारखा,
चांदणी होई कासावीस,
बघूनच हाले नेमका, –!!!
आभाळीच्या चंद्राला,
पाहून तू म्हणशी,
आणखी एक चंद्र,
आज आहे मजपाशी,–!!!
आज आठवू ती संध्या,
पुन्हा सगळे गुंतवून धागे,
प्रीत जडेल पुन्हा अनुरागी,
जसे घडले नव्हते मागे,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply