इतिहासाने ज्यांना दीर्घकाळ उपेक्षीत ठेवलं ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छावा संभाजी महाराजांना ‘तह’ कधीच मान्य नव्हता. ७०च्या दशकात त्या संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत सुंदररित्या वठवून त्या अनभिषिक्त राजाला न्याय देण्याचा काम ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्यातून केले ते म्हणजे मराठी रंगभूमीवरचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर. घाणेकरांना सुद्धा तडजोड, लाचारी मान्य नव्हतीच. म्हणून ज्या नाटकाने त्यांना मराठी व्यावसायिक रंगभूमीवर एक वेगळी प्रतिष्ठा आणि ओळख निर्माण करून दिली ते प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या अवघ्या १०० प्रयोगांच्या ‘घोडदौडी’नंतर घाणेकरांनी ते नाटक सोडून दिले. कारण त्यांना खाजगी सुपाऱ्या पटत नसे आणि त्यामुळे दि गोवा हिंदू असोसिएशन्सशी मतभेद झाल्यामुले डॉक्टरांनी ‘रायगड’ला राम राम ठोकले.असे कलंदर व्यक्तिमत्व आणि बेधडक स्वभाव असलेले नट क्वचितच पाहायला मिळतात.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉक्टरांची अतुलनीय योगदान आहे. वृत्तीने जरी मुंबईमधले नावाजलेले डेंटिस्ट असले तरी अभिनयाचे खुळ अंगी बाळगणारे, जवळपास ६ वर्षे मराठी रंगभूमीवर प्रॉम्प्टरचे आणि अधून-मधून नाटकात मिळालेल्या छोट्या-मोठ्या पात्रांना साकारत ‘अभिनय भूक’ भागावणारे, नंतरच्या काळात अवघ्या महाराष्ट्राने ज्यांना ‘संभाजी’ म्हणून डोक्यावर घेतले, ज्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला ‘हाऊसफुल्ल गर्दी’च्या संजीवनी मिळवून दिले असे एक विलक्षण नट म्हणजे डॉ. घाणेकर.
मराठी रंगभूमी म्हणजे त्याकाळातील जगातील एकमेव रंगभूमी जिथे दिवसाला तीन प्रयोग व्हायचे तेही आठवड्याचे सातही दिवस. अश्या काळात मराठी प्रेक्षकाला पहाटे थांबून तिकीट काढण्यासाठी तिकीटबारीवर खेचून आणणारा एकमेव विलक्षण नटसार्वभौम म्हणजे डॉक्टर.
आपल्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी जीव तोडून अगदी जीवाची बाजी लावून अभिनय करायचा एवढेच ते जाणायाचे. ‘रायगड’च्या अद्भुत यशानंतर डॉक्टरांना चित्रपट माध्यमाचे द्वार खुले झाले. त्यानंतर त्यांनी ‘मराठा तितुका मेळावा’, ‘पाहू रे किती वाट’, ‘दादी माँ’ सारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातही काम केले.
बालगंधर्व नंतर लोकप्रियता लाभलेले हे एकमेव नट. सिगारेट ओढण्याचा स्टाईल पासून प्रेयसींच्या विषयात सदैव बहुचर्चित राहणारे, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आणि ‘गरंबीचा बापू’ या दोन्ही नाटकांना १०० प्रयोगानंतर सोडून दिले आणि तेव्हापासून ते ‘शंभरी काश्या’ म्हणून नाट्यक्षेत्रात ओळखले जाऊ लागले.
मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा शिट्टी वाजली ती काशिनाथसाठी, मराठी रंगभूमीवर काशिनाथ कधी ‘लाल्या’ बनून झळकले तर कधी ‘संभाजी’ बनून अवतरले तर कधी ‘बापू’ बनून प्रेक्षकांचे मन जिंकले. स्वतःच्या नावाच्या आदी ‘आणि’ लावायची प्रथा पहिल्यांदा सुरु केले ते घाणेकरांनीच.
त्यांचे एक एक डायलॉग्स प्रेक्षकांना इतकी भुरळ घालत कि ते अक्षरशः तोंडपाठ करायचे आणि आपल्या दैनंदिन जीवनात वारंवार वापरायचेसुद्धा ते ‘एकदम कडक’ असो किंवा ‘उसमे क्या है?’ असो.
८ नोव्हेंबर रोजी या नटाच्या अभिनय जीवनावर आधारित अभिजित देशपांडे दिद्गर्शित ‘आणि काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे ६०-७० च्या दशकाच्या चित्रपट आणि रंगभूमीच्या सुवर्णकाळाच एक दालनच आहे. हा चित्रपट सुलोचनादेवी, भालजी पेंढारकर, डॉ. श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, मास्टर दत्ताराम, प्रा. वसंत कानेटकर असे अनेक दिग्गजांच्या जीवनाचे अनेक पैलू प्रेक्षकांसमोर सादर करतो.
या चित्रपटात घाणेकरांची भूमिका सुबोध भावे, सुलोचना देवींची भूमिका सोनाली कुलकर्णी, डॉ. लागूंची भूमिका सुमित राघवन तर कांचन घाणेकर यांची भूमीका वैदेही परशुरामी यांनी जीव ओतून त्यांचे पात्र साकारले आहेत.
लेखन- प्रा.कमलाकर रुगे
सोलापूर
Leave a Reply