‘याहू’ स्टार शमशेरराज ऊर्फ शम्मी कपूर यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला.
शम्मी कपूर यांनी स्वत:ला कधी चिरतरुण म्हणवून घेतले नाही; पण जीवनावर उदंड प्रेम करणार्यास या आनंदी कलाकाराकडे ऊर्जेचा अखंड स्रोत होता. त्यांची जीवनाबद्दलची आसक्ती ही आयुष्याचा आनंद घेण्याची होती. त्यांनी आपले आयुष्य मनसोक्त उपभोगले. शम्मी कपूर यांनी ज्यांना गंभीर, शोकात्मक भूमिका म्हणता येतील, तशा फारशा भूमिका केल्याच नाहीत. एक मस्त कलंदर, काहीसा खुशालचेंडू तरुण अशी त्यांची प्रतिमा होती. पण प्रेक्षकांना जसे गंभीर भूमिका करणारे अभिनेते हवे असतात, तसेच जीवनावर ओसंडून प्रेम करणारे, आनंदी, मन प्रसन्न करणारे अभिनेतेही हवे असतात. जे आपल्याला आयुष्यात करणे शक्य नाही, ते पडद्यावरील अभिनेत्याच्या माध्यमातून उपभोगून घेण्याची ही सामान्य माणसाची गरज शम्मी कपूर यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.
धसमुसळा,रांगडा प्रणय,नायिकांना थकविणारी भन्नाट नृत्यशैली ही मा.शम्मी कपूर यांची खासियत होती. ‘तुमसा नही देखा’ या चित्रपटाने त्यांना यशाची खरी चव चाखायला मिळाली, तरी तोपर्यंतचे त्यांचे चित्रपट साफ कोसळले होते. इतके की चित्रपटसृष्टीला रामराम ठोकून चहाच्या मळ्याचे व्यवस्थापक म्हणून काम करण्याची त्यांनी तयारी चालविली होती. तेव्हा ‘तुमसा नही देखा’ लोकप्रिय झाला.
हिंदी नायकाला लागणारे देखणेपण त्यांच्याकडे होते, पण नायकाची बांधेसूद व कमावलेली देहयष्टी नव्हती. त्यांनी जी वैविध्यपूर्ण नृत्ये केली आहेत, तशी सध्या नृत्याचे पध्दतशीर शिक्षण घेतलेल्या अभिनेत्यांनाही करणे जमणार नाही. त्यातही पडद्यावरील त्यांची बरीचशी नृत्ये ही त्यांची स्वत:ची होती. त्याकाळी स्वतंत्र नृत्यदिग्दर्शक नेमण्याची पध्दत नव्हती. त्यामुळे अभिनेत्याला स्वत:लाच गाण्याच्या भावार्थानुसार नृत्य करावे लागे.ते लक्षात घेतले, तर शम्मी कपूर यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावी लागेल. बॉलीवूडला लाभलेले ‘ग्लॅमर’ हे केवळ सुंदर अभिनेत्रींमुळे लाभलेले नाही. ते शम्मी कपूरसारख्या स्टायलिश नटांमुळेही मिळाले आहे. ही स्टाईल त्यांच्या कपड्यांमुळे आणि वापरलेल्या टोप्या-स्कार्फमुळे जशी निर्माण झाली, तशीच त्यांच्या वागण्या-बोलण्याची विशिष्ट ढब, नाच करतानाची बेभान अदा यासारख्या गोष्टींमुळे शम्मी कपूर यांनी आपले एक स्थान निर्माण केले होते.
त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले त्याच्या आधीच वडीलबंधू राज कपूर यांनी उत्तम निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता अशा विविध क्षेत्रांत आपले स्थान उंचावले होते. तसेच नाट्यक्षेत्रातील बुजुर्ग अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे पुत्र हीसुध्दा त्यांची ओळख होतीच. ‘जंगली’, ‘काश्मीर की कली’, ‘ऍन इव्हनिंग इन पॅरीस’, ‘तीसरी मंझील’, ‘ब्रह्मचारी’ यासारख्या चित्रपटांनी त्यांना बॉलीवूडमध्ये अढळस्थान मिळवून दिले.
नव्या अभिनेत्रींना पदार्पणाची संधी देण्याबद्दल त्यांचे स्थानही महत्त्वाचे आहे. जगात नवीन काय घडत आहे, याबद्दल त्यांना उत्सुकता होती. संगणक आणि इंटरनेटशी दोस्ती करणाऱ्या भारतातील अगदी प्रारंभीच्या व्यक्तींपैकी शम्मी कपूर हे एक होते. आज अमिताभ बच्चन यांच्या ‘ब्लॉग’ व ‘ट्विटर’वरील संदेशांबद्दल कौतुकाने बोलले जाते. पण भारतात इंटरनेटची फारशी माहिती नसताना, त्याचे तंत्र शम्मी कपूर यांनी आत्मसात केले होते. ‘याहू!’ कंपनीने आपले भारतातील कार्यालय सुरू केले तेव्हा शम्मी कपूर हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. ‘याहू!’शी शम्मी कपूर यांचे असलेले रुपेरी नाते हे जसे त्यास कारण होते, तसेच त्यांचे इंटरनेटचे प्रेम आणि त्याबद्दलची माहिती हेही त्याचे कारण होते. ‘याहू!’ ही त्यांच्या मालकीची वेबसाइट आहे का, अशी विचारणा अनेकदा लोक त्यांना करीत. स्वत:ची वेबसाइट निर्माण करणारे ते पहिले भारतीय अभिनेते होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल ‘तुमसा नही होगा’ असे म्हणता येईल.
शम्मी कपूर यांचे १४ ऑगस्ट २०११ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply