शान निराळी अंबाड्याची
फुलवेणीही त्यावरी साजे
रूप पाहुनी सजलेले ग
चंद्र नभीचा पाहून लाजे !!
कचपाशाची अदा निराळी
केशभूषा मम रोजच दावी
केश मोकळे, कधी तिपेडी
कधी घट्ट अंबाडा सजवी
घनगर्द मम केश मोकळे
जाळी मध्ये घट्ट बांधुनी
सुरेखशा त्या अंबाड्यावर
ल्यावी सुंदर मी फुलवेणी !!
रोजच वाटे कच शृंगारा
हात सख्याचा मम लागावा
फुलवेणी माळून तयाने
केशी मम या गंध भरावा !!
विसरून सारे देहभान मी
अधीन त्याच्या पुरते व्हावे
गंध वेणीचा रंग प्रीतीचा
एकरूप मग होऊन जावे !!
— काव्यरचना ©✍?
प्रमोद मनोहर जोशी जळगाव 9422775554, 8830117926
कविता कॉपी राईट अंतर्गत आहे
Leave a Reply