शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेश असावा कि नाही याच्या वादामुळे माझ कुतूहल चाळवल गेलं आणि मुळात अशी बंदी का लादली गेली असावी याचा विचार मन करू लागलं..माझ्या मनाने माझ्या ज्येतिषशास्त्राच्या अभ्यासाशी लावलेली संगती आपल्यासमोर ठेवतो..या विषयातील तज्ञ मार्गदर्शन करतीलच.
ज्योतिषात शनीला अत्यंत महत्व दिल गेलं आहे. शनी हा पहिल्या प्रतिचा अशुभ ग्रह मानला गेलेला आहे. मृत्यूचा कारक आहे. मोठमोठे क्राॅनिक पद्धतीचे आजार शनीच्या अधिपत्याखाली येतात.आणि स्त्री तर साक्षात जीवनदात्री आहे..पालन-पोषणाची कारक आहे..जीवन जीच्या गर्भातून सुरू होतं अशी स्त्री आपल्या अपत्याच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, तर जीवन व्यर्थ आहे व शेवटी मरायचंच आहे हे तत्व सांगणाऱ्या, मरणाचा अधिपती असलेल्या शनीचं सौख्य स्त्रीबरोबर कसं काय जमावं असा विचार तर प्रथाकरत्यांनी केला नसावा?
दुसरं म्हणजे, आपल्या हिन्दू धर्मात स्त्रिला अन्नपूर्णा मानलं गेलं आहे..शरीरातील सर्व प्रकारचे पाचक रस ज्या चंद्राच्या अधिपत्त्याखाली येतात, असा चंद्र स्त्रिच्या देहा-मनावर राज्य करतो. तर शनी हा उष्टं-खरकटं जीथं टाकलं जातं अश्या उकिरड्याचा कारक आहे..स्त्री पोषण करणारी तर शनी शोषण करणारा. असं विरूद्ध तत्वं एकत्र तशी नांदतील असाही विचार शास्त्रकर्त्यनी केला असणं शक्य आहे.
नवग्रहांतील शनी हा सर्वात धिम्या गतीचा ग्रह आहे. शनी एक रास पार करायला अडीच वर्षं घेतो तर दोन-सवा दोन दिवसात एक रास पार पाडणारा स्त्रीरुपी चंद्र सर्वात जलदगती मानला गेला आहे..अशा परिस्थितीत शनी आणि स्त्री एकत्र चालणं असंभव आहे असही प्राचीन ऋषी-मुनींना वाटलं असणं शक्य आहे.
स्त्री भावनाप्रधान आहे, हळवी, चंचल आहे तर शनी महाराज कर्तव्य कठोर आहेत..कोणतीही भावना, प्रेम त्यांना पाझर फोडू शकत नाही. अशी दोघं एकत्र येऊ नयेत यासाठीतर शनी मंदीरात स्त्रीला प्रवेशबंदी नसेल?
शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना असलेल्या प्रवेशबंदीच्या मुळाशी नक्की कोणती कारणे आहेत या विषयी मलाही माहिती नाही पण मी माझ्या वकुबाने वरील प्रमाणे संगती लावायचा प्रयत्न केला आहे. या विषयातील तज्ञानी यावर मार्गदर्शन करावे ही अपेक्षा आहे.
जाता जाता –
स्त्रियांना प्रवेशबंदी असलेलं शनी मंदीर हे काही एकमेंव ठिकाण नव्हे. कार्तिकेय मंदीरातही स्त्रियांना प्रवेश बंदी असते. इतकंच कशाला, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदीरातील गाभाऱ्यातही आता आता पर्यंत स्त्रियांना प्रवेशबंदी होती.
आपल्या हिन्दूस्थानची प्रकृती ‘मोक्षा’कडे जाणारी आहे. जीवनातं ‘निरासक्त’ राहून आपलं अंतिम ध्येय ‘त्याग’ हेच असावं असा आपला धर्म अगदी जन्मापासून आपल्या मनावर बिंबवत असतो आणि स्त्री ही माणसाला उपभोगी बनवते, आसक्त करते, तीला मोक्षाच्या मार्गातली धोंड समजली गेली व म्हणून स्त्रिला प्राचीन काळापासून सर्वच धर्मकार्यापासून लांब ठेवलं गेलं असावं..
खरंतर स्त्रिवरच कशाला तर कोणावरही अशी प्रवेशबंदी लागणं अनैसर्गिक, अमानवी आहे. कोणत्या देवळात कोणी जानं अथवा जाऊ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न व अधिकार आहे, त्यावर इतरांना आक्षेप घेण्याचा अधिकार नाही..पुराण काळात काय झालं वा पुराणात काय लिहिलंय या पेक्षा आधुनिक काळात काय चाललंय याचं भान सर्वांनी ठेवायला हवं..स्त्रियांना शनी मंदीर प्रवेशाचा हक्क मिळायलाच हवा..!!
विषय मोठा आणि गहन आहे..थोडक्यात आणि सोप्पा करून लिहिण्याचा प्रयत्न केलाय. या संदर्भात आपल्यास काही शंका असल्यास माझ्या कुवतीनुसार निरसन करण्यास मला आवडेल.
— गणेश साळुंखे
9321811091
Leave a Reply