नवीन लेखन...

प्रभावी वक्ते व उत्तम लेखक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर

रायगड जिल्ह्यात रोहे या गावी मामा क्षीरसागर यांचा जन्म झाला. शंकर धोंडो क्षीरसागर हे त्यांचे पूर्ण नाव. कालांतराने मामा जेव्हा दर्यापुरला आले, तेव्हा प्रा.मनूताई नातू यांनी त्यांना प्रथम ‘मामा’ हे नाव पाडले आणि मग नंतर सर्वच त्यांना मामाच म्हणू लागले. मामांचे प्राथमिक शिक्षण रोह्यालाच झाले. नंतर ते १९२६ मध्ये पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दाखल झाले आणि १९१९ मध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त करुन मॅट्रिक झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. लो. टिळकांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या तरुण मनावर विलक्षण प्रभाव पडला होता. १९१४ मध्ये मंडालेच्या तुरुंगातून लोकमान्य सुटून आले आणि पुनश्च ‘हरिः ॐ’ म्हणून स्वराज्याचे यज्ञकुंड त्यांनी पेटविले. त्याच वेळी तरुण मामांनी देशसेवेचे कंकण हाती बांधले.

१ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्यांचे प्राणोत्क्रमण झाले. आपल्या प्राणप्रिय नेत्याची पेटलेली चिता पहाताच, शंकर धोंडो क्षीरसागर यांनी देशसेवेसाठी आजन्म ब्रह्मचारी राहून फकिरीचे व्रत स्वीकारण्याची प्रतिज्ञा केली आणि त्याचक्षणी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मामांनी त्या महाविद्यालयाला आणि घराला ‘राम राम’ ठोकला तो कायमचाच !

१९२१ च्या सुमारास म.गांधींजीचे असहकार आंदोलन सुरु झाले आणि त्यात स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते सामील झाले. १९२६ मध्ये मामा मसुराश्रमात दाखल झाले आणि विविध उपक्रम सुरु केले. समर्थ रामदासांच्या ‘दासबोध’ ग्रंथाच्या एक लक्ष प्रती, १२० सूर्य नमस्कार व १३ पारायणे या अटीवर विनामूल्य वाटण्याचा आश्रमाचा संकल्प होता. मामा त्याचे प्रमुख कार्यकर्ते होते. मामांनी ‘दासबोध’ या मासिकाचे पाचवर्षापर्यंत संपादन केले होते.

सुमारे ४०० वर्षांपूर्वी गोव्यातील सक्तीने ख्रिश्चन केलेल्या हजारो गावकऱ्यांचे शुद्धीकरण केले. या शुद्धीकरण आंदोलनात मामांचा सिंहाचा सहभाग होता. या घटनेचे सांगोपांग विवेचन करणारा ‘गोमंतक शुद्धीचा इतिहास’ हा ४०० पानांचा स्वतंत्र विस्तृत ग्रंथ मामांनी लिहिला. विशेष म्हणजे या ग्रंथाला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुंदर प्रस्तावना लाभली.

या आणि अशा सर्व कार्यांमधील त्यांच्या शांत वृत्तीमुळे तेथे मामांना सर्व ‘शांतमूर्ती’ म्हणत असत. म. गांधींच्या १९३२ च्या चळवळीत सरकारी वट हुकुमाने मसुराश्रम जप्त करण्यात आला. अर्थात् मामांच्या तेथील कार्याला पूर्णविराम मिळाला.
त्या नंतर मामांनी १९३३ मध्ये महाराष्ट्र व बृहनमहाराष्ट्र विभागात गीताधर्माच्या प्रचारासाठी दौरा सुरु केला. शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी हिंदूधर्म शिक्षकांचे व बालोपासनेचे वर्ग अनेक ठिकाणी चालविले, उदा. बोरीवली (जिल्हा ठाणे)१९३३, चांदीर रेल्वे(जिल्हा-अमरावती) १९३५, चाळीसगांव मे १९३६, देवांस, डिसेंबर १९३६, तळोदे (जिल्हा धुळे) मे, १९३७ संगमनेर, नोव्हेंबर १९३७, अकोला १९३८, हैद्राबाद-१९४०.

तरुण पिढीशी सतत संपर्क राखून त्यांचे जीवन सुसंस्कारित करण्याच्या दृष्टिने एखादे विद्यालय स्थापन करावे अशी मामांना प्रेरणा झाली आणि त्यानुसार योजना बनवून बाबा रेडीकरांसह ते १९३८ मध्ये विदर्भातील दर्यापूर येथे आले. सुरवातीला मामांनी बाबांसह रस्त्यावरुन खणखणीत आवाजात मनाचे श्लोदक म्हणत भिक्षा स्वीकारावी आणि बालकांमध्ये जागृती करावी. जोडीला सूर्यनमस्कार व्यायाम आणि गुरुकुलाच्या रुपाने विद्यार्थ्यांना अभ्यासात मार्गदर्शन करावे.अशा उपक्रमांनी पार्श्वभूमी तयार झाल्यावर तेथील प्रतिष्ठीत मान्यवर अण्णासाहेब पुरंदरे, अण्णासाहेब धर्माधिकारी, भाऊसाहेब खरे, आदींच्या सहकार्याने १५ जून १९३९ रोजी रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रबोधन विद्यालयाची’ स्थापना झाली.
‘सामाजिक प्रबोधन’हे मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून, उत्तम नागरिक घडविण्यासाठी मामांनी शाळेत विविध उपक्रम राबविले. ध्येयनिष्ठ शिक्षक मिळविले आणि मॅट्रिक परीक्षेत विद्यार्थ्यांचा उत्तम निकाल लागण्यात मामांना यश मिळाले. विद्यार्थी संख्या वाढू लागली. जागा अपुरी पडू लागली आणि मग विद्यालयाचे विस्तीर्ण जागेत स्थलांतर झाले. चिंतामणराव देशमुखांपासून तर पू. विनोबांपर्यंत अशा थोर व्यक्तींचे शाळेला मार्गदर्शन लाभत गेले.

मामांची दूरदृष्टी विलक्षण होती. विद्यार्थ्यांना लोकशाहीची कल्पना यावी म्हणून विद्यार्थी मंत्रीमंडळाची योजना करुन दर महिन्यात विद्यार्थी संसद भरवीत असत. विद्यार्थी निवासी संमलने भरवीत असत. तसेच ‘स्वयंशासित शाळा’ या उपक्रमाचा प्रयोग दर्यापुरात मामांनी प्रथमच केला व शाळा नावारुपास आली.

दर्यापुरातील समाज सुधारणेच्या दृष्टीने मामांनी बाबांसह हरिजन वस्तीत जाऊन तेथील सर्व परिसर स्वच्छ केले. आणि आरोग्याचे महत्त्व पटविले. रात्री साक्षरतेचा उपक्रम राबविला, महिलोन्नती व बाल संस्कार या दृष्टीनी मामांनी ‘प्रबोधन गीता मंडळाचा’ स्थापना केली ती आजही मोठ्या स्वरुपात कार्यरत आहे.

१९४६ मध्ये कोरगांवकर ट्रस्टची स्थापना झाली आणि शंकरराव देवांनी, मामांना बाबा रेडीकरांसह कोल्हापुरला बोलावून घेतले व त्या ग्रामसेवा श्रमाची जबाबदारी मामांवर सोपवली. आर्थिक अडचणीपायी १९५३ मध्ये तो सेवाश्रमही बंद पडला. तरीही त्या कोरगांवकर ट्रस्टतर्फे ‘भातृसेवक संघाची’ वार्षिक संमेलने भरतच होती. आणि कार्यवाह या नात्याने मामा अखेरपर्यंत ते कार्य करीतच होते. सत्तेच्या राजकारणात मामांना कधीच रस नव्हता. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असलेल्या ‘सर्वोदय समाजात’ ते सामील झाले. इतकेच नव्हे, तर १९५५ मध्ये ‘गोमंतक’ मुक्ती लढ्यात मामा सक्रिय सहभागी झाले. १९६०-६१ पर्यंत शंकरराव देव यांच्या बरोबर केरळच्या भूदान यात्रेत सहभागी झाले. तसेच आसाममध्येही १५ दिवस राहिले, आणि १९६४ मध्ये मामांनी पू. विनोबाजींच्या पदयात्रेचे व्यवस्थापक राहून कार्य केले.
१९६६ मध्ये प्रबोधन विद्यालयाला २५ वर्षे पूर्ण झाली होती. एक उत्कृष्ट शाळा म्हणून प्रबोधन विद्यालयाचा नाव लौकिकही झाला होता. कोरगावकर ट्रस्टच्या पुणे येथील संमेलनात १९६६ मध्ये बाबा आमटे यांनी ‘युवक प्रगती सहयोग’ ही अभिनव कल्पना मांडली. आणि मामांनी ती लगेच उचलून धरली. त्याचे पहिले श्रमशिबीर आनंदवन वरोडा येथे घेण्यात आले आणि १९७४ पर्यंत मामांचा त्यात सहभाग असे.

१९६७ च्या सुमारास शिक्षकांच्या दुर्दशेने व्यथित झालेले तत्त्कालीन राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन पू. विनोबाजींना भेटले आणि ‘शिक्षण व शिक्षक’ या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हाचे बिहारचे शिक्षण मंत्री कर्पूरा ठाकूर यांनी त्या गोष्टीला मूर्त स्वरुप दिले. १९६८ मध्ये बिहारमध्ये कहोळ मुनींच्या कहोळ गावी आचार्यकुलाची स्थापना केली. आणि त्याच्या संयोजकत्वाची जबाबदारी पू. विनोबाजींनी मामांवर सोपविली.

आचार्यकुलाची संघरचना जीवनन्यायी आहे. आचार्य हा निर्भय, व निपक्ष असावा. तसेच तो विद्यार्थीनिष्ठ, ज्ञाननिष्ठ आणि समाजनिष्ठ असावा. त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थी परायण असावा. दोघे ज्ञान परायण असावेत आणि ज्ञान सेवा परायण असावे हे तर आचार्यकुलाचे बोधवाक्यच आहे. मानवधर्माचे उपासक. विदर्भातील दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय, कोल्हापूरचा ग्रामसेवाश्रम व कोरगावकर धर्मादाय संस्था, वरोड्याचे आनंदवन, माधानचे कस्तुरबाधाम, नागपूरचा मातृसेवासंघ, देवरुखचे मातृमंदिर इ. अनेक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. विचार, उच्चार, आचार, संचार व प्रचार करीत जो जीवनात निष्ठापूर्वक वागेल तोच खरा ‘आचार्य’ संज्ञेला प्राप्त होईल. अशा आचार्यांनी संघटना वाढवून आचार्य शक्ती वाढवली तर देशाचे चित्र निश्चि त बदलेल असा पू. विनोबाजींप्रमाणे मामांनाही विश्वास होता. महाराष्ट्र आचार्यकुलाची परिषद १९७२ मध्ये पवनारला भरली आणि १९७४ मध्ये अखिल भारतीय संमेलन भरविण्यात आले. मामा विद्वान असून प्रभावी वक्ते व उत्तम लेखक होते. तसेच उत्कृष्ट प्रवचनकार असून क्वचित कीर्तनही करत असत. ते ईश्वरनिष्ठ होते पण धार्मिक कर्मकांडात ते कधी अडकले नाहीत. प्रत्येकाच्या गुणदोषांसह ते त्याचा स्वीकार करुन त्यावर प्रेमाचा वर्षाव करीत असत.

शंकर धोंडो क्षीरसागर यांचे ६ एप्रिल १९८१ रोजी निधन झाले.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट/ दुर्गा कानगो

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..