‘धिंड,‘नाटक’,‘मिटिंग’ यासारख्या ग्रामीण कथांच्या रसिकांपर्यंत पोहोचलेल्या शंकर पाटील यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे झाला.
शंकर बाबाजी पाटील यां चे शिक्षण तारदाळ (ता. हातकणंगले) व गडहिंग्लज येथे व कोल्हापूर येथे बी. ए. बी. टी. पर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या शाळांतून अध्यापन केले. त्यानंतर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्यांची नियुक्ती झाली. सुरुवातीस आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर कार्यक्रम सहाय्यक अधिकारी काम केत असताना शंकर पाटील यांनी १९५९ मध्ये एशिया फौंडेशनच्या शिष्यवृत्तीतून ग्रामीण जीवनाचा अभ्यास केला व टारफुला ही कादंबरी लिहिली.
“टारफुला’ या कादंबरीत कोल्हापूरच्या ग्रामीण भागाचे चित्र उभे करणारी तीन पिढ्यांची कहाणी लिहिली. “कथा अकलेच्या कांद्याची’ हे वगनाट्य इतके लोकप्रिय झाले की त्याचे दोन हजार प्रयोग झाले. त्याशिवाय गल्ली ते दिल्ली, लवंगी मिरची कोल्हापूरची इ. त्यांची वगनाट्ये लोकप्रिय ठरली. ग्रामीण तमाशा त्यांनी शहरी लोकांपुढे वगनाट्यातून आणला व त्याला प्रतिष्ठाही मिळाली. प्रामुख्याने ग्रामीण कथाकार व चित्रपट कथाकार म्हणून लौकिक मिळवलेल्या शंकर पाटील यांचा १९६० ते ७० हा कथालेखनाचा बहाराचा काळ होता.
ग. प्र. प्रधानांसह आठवी ते दहावीसाठी साहित्य सरिता या वाचनमालेचे संपादन करणारे शंकर पाटील महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती मंडळावर मराठी विषयाचे विशेष अधिकारी होते. ‘वळीव’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ‘भेटीगाठी’,‘धिंड’,‘बावरी शेंग’,‘खुळय़ाची चावडी’,‘फक्कड गोष्टी’,‘खेळखंडोबा’,‘आभाळ’ असे सरस कथासंग्रह देणा-या पाटील यांना अनेक कथासंग्रहांना व चित्रपट कथांना राज्य शासनाचे पुरस्कार लाभले. “वावटळ’ ही पटकथा लिहून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. युगे युगे मी वाट पाहिली, गणगौळण, भोळीभाबडी, चोरीचा मामला इ चित्रपटांच्या उत्कृष्ट पटकथा-संवादलेखनाबद्दल त्यांना शासकीय पुरस्कार लाभले.
याशिवाय पिंजरा, केला इशारा जाता जाता, एक गाव बारा भानगडी, डोंगरची मैना, छंद प्रीतीचा, पाहुणी, लक्ष्मी इ. चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवाद त्यांनी लिहिले.शंकर पाटील यांनी ५९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले होते. शंकर पाटील यांचे ३० जुलै १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
शंकर पाटील यांचे कथा कथन
Leave a Reply