एक राजा होता. तो फारच चिकित्सक होता. त्याला थोडी जरी शंका आली तरी तो ती शंका लगेच विचारी व शंकेचे निरसन झाल्याशिवाय तो स्वस्थ बसायचा नाही. त्यामुळे त्या राजाबरोबर गप्पा वा चर्चा करायला सहसा कोणीही तयार होत नसत. त्या राजाचे जे राजगुरू होते, त्यांना मात्र राजाची या स्वभावाची पूर्ण कल्पना होती. राजाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी अनेकदा तेच पुढाकार घेत असत. एकदा राजा धर्मगुरूबरोबर चर्चा करीत असताना परमेश्वराचा विषय निघाला. ईश्वर कसा सर्वत्र असतो व तो संकटकाळी आपल्या भक्ताला कसा प्रत्यक्ष येऊन वाचवितो हे धर्मगुरूंनी अनेक उदाहरणांसह राजाला पटवून सांगितले. त्यावर राजाने संकटसमयी परमेश्वर आपल्या भक्ताला कसे वाचवितो? तो नेमके काय करतो? याबद्दल निरनिराळ्या शंका व्यक्त केल्या. त्याच्या सर्वच शंकांना धर्मगुरुंना उत्तर देता आले
नाही म्हणून ते राजगुरुकडे गेले. राजाचे शंकानिरसन करण्यासाठी राजगुरूंनी प्रत्यक्ष कृतीच करायचा निर्णय घेतला. त्या राजाला एक नातू होता. तो फारच सुंदर व हुशार होता. त्यामुळे राजाचा फार आवडता होता. दुसऱ्या दिवशी राजगुरू राजाला घेऊन उपवनात फिरायला गेले. आजूबाजूला पहाऱ्याचे सैनिक होतेच. तेथे राजाला तलावाच्या ठिकाणी पाठमोरा बसलेला आपला नातू दिसला. म्हणून राजा घाईघाईने
तलावाकडे निघाला. तेवढ्यात त्याला त्याचा नातू तलावात पडल्याचे दिसले. नातवाला पोहता येत नाही, हे राजाला माहीत होते, त्यामुळे त्याने स्वतः पळत जाऊन तलावात उडी टाकली व आपल्या नातवाला बाहेर काढले. वास्तविक तो नातवासारखा दिसणारा मेणाचा पुतळा होता. परंतु राजाने त्याला खरा नातू समजून त्याला वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली होती. नंतर सर्व प्रकार समजल्यानंतर राजगुरू राजाला म्हणाले, परमेश्वर आपल्या भक्ताला म्हणजे आपल्या आवडत्या माणसाला संकटातून कसे वाचवितो याचे कोडे तुम्हाला पडले होते ना?
त्याचे उत्तर देण्यासाठी आम्हाला हे सर्व नाटक करावे लागले. उपवनात आजूबाजूला एवढे शिपाई असताना तुम्ही एकाही शिपायाला आदेश न देता नातवाला वाचविण्यासाठी तलावात स्वत: उडी मारली. यावरून परमेश्वर आपल्या भक्ताचे कसे रक्षण करतो हे तुम्हाला कळलेच असेल. राजाचे समाधान झाले व पुढे त्याच्या शंकेखोर स्वभावाला आळाही बसला.
Leave a Reply