ज्येष्ठ संगीत समीक्षिका, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार व ‘उंबरठा’ या चित्रपटाच्या कथालेखिका शांता हरी निसळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९२८ रोजी पुणे येथे झाला.
शांता निसळ या ज्येष्ठ संगीत समीक्षिका, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध होत्या. शांता हरी निसळ या पूर्वाश्रमीच्या शांता व्यंकटेश जोशी. अगदी लहानपणापासून त्यांचा स्वभाव धडपडा, बंडखोर होता. त्यांनी आपल्या विद्यार्थिदशेत त्यांनी ‘चले जाव’ चळवळीतही भाग घेतला होता. बंडखोर स्वभाव आणि देशप्रेमामुळे विद्यार्थीदशेत असताना त्यांनी १९४२च्या लढ्यात सहभाग घेतला होता. उच्च शिक्षणात स्त्रियांचा टक्का अगदी नगण्य असतानाच्या काळात त्यांनी एमए, डीटी केले. एवढेच नव्हे; तर ‘संगीत’ विषयात ‘पीएचडी’ही केली. पुण्याच्या हुजूरपागा प्रशालेत त्या शिक्षिका म्हणून काम करीत असत. त्या विद्यार्थिनीप्रिय शिक्षिका होत्या, कथा, कादंबरी, नाटक आणि संगीत समीक्षा या प्रकारांत त्यांनी लेखन मुशाफिरी केली. बदलत्या सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब ज्या मोजक्या स्त्री-वादी कादंबऱ्यांमध्ये उमटले, त्यामध्ये त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचा समावेश होता.
‘हिचे नाव शांता नाही, तर अशांती ठेवायला हवे होते,’ असे त्यांच्या वडिलांना सांगितले जात असे. याचा उल्लेख निसळ यांनी त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये केला आहे. ‘वडिलांनी सतत दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी उभी राहू शकले,’ अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली आहे.
महिलांचे अस्तित्त्व, महत्त्व आणि सामर्थ्य प्रकट करणारी शैली हे त्यांच्या लेखनशैलीचे गुणविशेष म्हणता येतील. ‘विसंवाद’ ही त्यांची कादंबरी लोकप्रिय ठरली. तुरुंगातील स्त्री-कैद्यांचे जीवन चितारणारी ‘विमुक्त’ किंवा राजकारण आणि हिंदू एकत्र कुटुंब पद्धतीवर भाष्य करणारी ‘आवर्त’ या त्यांच्या कादंबऱ्या विशेषत्वाने गाजल्या. ‘सूरभि’ हा त्यांचा कथासंग्रहही प्रसिद्ध आहे. ‘आहुती आणि एकलव्य’ हा दोन एकांकिकांचा संग्रह प्रसिद्ध आहे. ‘मृत्यू माघारी गेला’ याद्वारे त्यांनी महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंगांवर आधारित प्रसंगनाट्ये लिहिली. ‘सवाई गंधर्व महोत्सवा’चे संगीत समीक्षण त्यांनी अनेक वर्षे अतिशय सातत्याने केले. महिलांच्या विजिगिषु वृत्तीवर त्यांनी कथालेखन केलं.त्यांच्या ‘बेघर’ या कादंबरीवर ‘उंबरठा’ हा प्रसिद्ध सिनेमा बनला आणि गाजला. याच कादंबरीवर वसंत कानेटकर यांनी ‘पंखाला ओढ पावलाची’ हे नाटक लिहिले. शांता निसळ यांचे ‘विसंवाद’ ही कादंबरी, ‘सूरभि’ कथासंग्रह आणि ‘सौभाग्यकांक्षिणी’ हे नाटक अशी त्यांची साहित्य संपदा आहे. शांता हरी निसळ यांचे ७ मे २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply