शरद पवारांनी सांगितलेला पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत जेव्हा निवडून आले होते त्या वेळेचा किस्सा.
१९६८ साली पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत निवडून आले होते, शरदरावजी पवार त्यावेळेस विधानसभा सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते, गदिमा त्यावेळी साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शरद पवारांना बोलावून घेतले,त्यावेळी गदिमा तेथे उपस्थित होते, नाईकांनी पवारांना सांगितले, “सावळाराम नगरपालिकेत निवडून आले आहेत, त्यांना नगराध्यक्ष करायचे आहे पण आपले येथे बहुमत नाहीये, दोन मते कमी पडत आहेत, काहीही कर पण त्यांना निवडून आण”. बहुदा मा.गदिमांनी आपल्या मित्राला हे पद मिळावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली असणार किंवा पी.सावळाराम यांनी गदिमांचा राजकारणी नेत्यांमधला दरारा पाहून तसे सुचवले असेल.
शरद पवार तेथे दोन दिवस जाऊन राहीले (शरद पवार म्हणतात …. “मते कमी पडली की याला हाताशी धरा अशी माझी ख्याती त्यावेळेपासूनच होती!”), त्यांच्यापरीने जे राजकारणी डावपेच खेळावे लागतात ते सर्व खेळून त्यांनी शेवटी ‘पी.सावळाराम’ यांना ठाण्याच्या नगराध्यक्षपदी निवडू आणले. मा.शरद पवारांनी ‘पी.सावळाराम’ यांना गाडीत घातले व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घेऊन गेले, तेथे मुख्यमंत्र्यांबरोबर मा.गदिमाही उपस्थित होते, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की पी.सावळाराम निवडून आले, नगराध्यक्ष झाले. गदिमा ते ऐकत होते,ते जागचे उठले व शरद पवारांजवळ गेले,त्यांच्या पाठीवर एक जोरात थाप मारली व म्हणाले…
“बहाद्दरा काय काम केलस!,येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!…..”
त्यावेळी ठाणे हे मेंटल हॉस्पीटल साठी प्रसिद्ध होते, कोणी वेड्यासारखे वागत असेल तर लोक त्यावेळी गंमत करताना “याला ठाण्याला पाठवा रे” असे नित्यनियमाने म्हणत असत, त्याचा रेफरंन्स व ‘येडेमच्छींद्र’ हे पी.सावळाराम यांचे गाव व सावळाराम पाटील हे नाव याचे गदिमांनी ‘येडयाचा पाटील’ केले. “बहाद्दरा काय काम केलस!, येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!…..” , तेथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची हसून पुरेवाट लागली असेल!.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply