यस्यास्ति वित्तं, स नर: कुलीन:
स पंडित: स श्रुतवान् गुणज्ञ:॥
स एव वक्ता, स च दर्शनीय:
सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ते॥
हा संस्कृतमधला एकमेव श्लोक गोमुला पाठ होता.
ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे सर्व आहे. म्हणून तो सतत खूप पैसे कसे कमवावे ह्याच विचारांत असे.
तो अप्रामाणिक नव्हता पण त्याचा निश्चय होता की कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैशांचा प्रश्न एकदाच सोडवला पाहिजे.
वर्षांपूर्वी शेअरमार्केट रोज वर वर जात होतं. त्याला बुल रन म्हणतात असंही पेपरांत वाचत होतो. तेव्हांची ही गोष्ट आहे.
शेअरमार्केट वर कसं जातं आणि खाली कसं येतं, हे मला कधीच समजलेलं नाही. लिफ्ट खाली वर जातं तसं कांही तरी असावं इतपतच आमची माहिती. पण इतर लोकांच बोलणं ऐकून शेअरमार्केट सध्या वर जातंय हे ऐकलं होतं.
एक दिवस गोमु माझ्याकडे बहुदा धांवतच (बुल-रनचा परिणाम -दुसरं काय ?) आला होता.
आल्या आल्या त्याने मला विचारले, “तुझ्या बँक अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत ?”
मी थोडे सावध उत्तर दिले, “फारसे नाहीत.”
“काय यार पक्या ! तीन चार वर्षे नोकरी करतोयस. कांही चैन करत नाहीस आणि तुझ्या अकाउंटला फारसे पैसे नाहीत?”
मी चैन करू शकत नव्हतो आणि गोमु नेहमीप्रमाणे मला चैन पडू देत नव्हता.
खरं तर गोमुने ह्या बाबतीत माझी हजेरी घेणं म्हणजे एखाद्या खाष्ट सासूने सूनेला प्रेमाने न वागवल्याबद्दल शेजारणीला जाब विचारण्यासारखे होते.
पण मी उलट बोललो नाही.
प्रथम त्याच्या डोक्यांत कोणता विचार आला होता, ते मला जाणून घ्यायचं होतं.
गोमु म्हणाला, “अरे, सोन्यासारखी संधी चालून आली आहे. आपले पैसे किमान पांच पट करण्याची.”
“पांच पट ? तू कुठल्यातरी चिटफंडाची जाहिरात वाचून आलेला दिसतोयस.”
मी त्याच्या उत्साहाला आवर घालायला म्हणालो.
गोमु म्हणाला, “नाही रे बाबा ! हे शेअरमार्केटमधून आपल्याला मिळू शकतात. वाॅरेन बफेट शेअरमध्ये गुंतवणूक करून अब्जाधीश झाला, हे ऐकलयसं ना ? “
“बफेटच काय, इतर अनेक अब्जाधीशांच्या कथा वाचल्यात.
सिंदबादची वाचलीय, अलिबाबाची पण वाचलीय आणि अल्लाउद्दीनच्या दिव्याची सुध्दा. काय फायदा ?
आपलं नशीब असं की अगदी अलिबाबाच्या गुहेत अल्लादिनचा दिवा घेऊन गेलो तरी आपल्याला दगडच मिळणार.”
मी नशीबाला दोष देऊन सुटका करायचा प्रयत्न केला.
“पक्या, असं कां म्हणतोस ?” गोमुने मला फटकारले.
“शेअरमार्केटमध्ये आपल्याला काय माहिती आहे ? आणि गुंतवणूक करायला पैसे कुठे आहेत ?” मी अनुत्सुक.
“मलाही त्यांतल कांही समजत नाही रे ! उलट आश्चर्य वाटतं की एक माणूस ज्या किंमतीला शेअर विकून टाकत असतो तोच शेअर त्याच किंमतीला दुसरा कां घेतो ?”
त्यावर मी त्याला म्हणालो, “मग आता तुला कुणी गुरू भेटला की काय ?”
“अरे हा गुरू अगदी इनसायडर आहे म्हण ना ! आपला सुरेश मेहता आहे ना ! तोच सेक्टर नऊचा. त्याचा कुणी अहमदाबादचा नातेवाईक त्याच्याकडे आलेला आहे. नवीनभाई नांव आहे त्याचं.”
गोमुने खुलासा केला.
“तो काय करतो ?” माझा प्रश्न.
“तो बिझनेस करतो. म्हणजे इथे नाही. अहमदाबादला. इथे तो कांही कामासाठी आलाय. महिना दोन महिने आहे. आपलं काम महिन्यांत होऊन जाईल. साला पांचपट पैसे. माझ्याकडे १०० रूपये पण नाहीत. मी कुठे पैसे मिळतात कां पहातो. तुला सांगतो, पक्या तू पण पैसे तयार ठेव.”
गोमुने मला प्रेमळ सल्ला दिला.
“अरे गोमु, माझ्या माहितीप्रमाणे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला कसलं तरी अकाउंट लागतं ना ? आपल्यातल्या कुणाचं नाही.”
मी ऐकीव माहितीवर बोललो.
“इथेच तर नवीनभाई आपल्या कामी येईल ना” इति गोमु.
त्याने शेअर बाजारांत उडी घ्यायचे ठरवलेच होते.
मग गोमुने मला सर्व प्लॕन समजावून सांगितला. नवीनभाईने शेअरमार्केटमध्ये लाखो रूपये कमावले होते. तो त्यांतला एक्स्पर्ट होता. त्याचे ट्रेडींग खाते होते. आमच्यापैकी प्रत्येकाने दहा हजार रूपये नवीनभाईकडे द्यायचे. नवीनभाई ते सर्व एकत्र करुन त्याचे शेअर्स त्याच्या ट्रेडींग खात्यांत घेणार. शेअर्सची किंमत पांच पट झाली की तो शेअर्स विकून टाकेल आणि आपल्याला सर्वांना पांच पट पैसे मिळतील.
हे सगळं तो केवळ मैत्रीखातर करायला तयार होता.
आम्ही सहाजणांनी पैसे जमवून ६०,००० रूपये दिले तर आम्हाला तीन लाख रूपये मिळणार होते.
अर्थात ब्रोकरेज वगैरे द्यायला लागलं असतं.
पण ते मामुलीच असतं.
मला सांगितलेला प्लॕन गोमुने आमच्या सहा मित्रांच्या गृपला समजावून सांगितला.
सर्वांनाच दहा हजार रूपये तसे भारी होते.
पण दहाचे पन्नास फक्त शेअरमार्केटलाच होऊ शकतात, हे प्रत्येकाने ऐकलं होतं.
शेअर बाजारांत आणि रेसकोर्सवर गरीबांतले गरीब (कर्ज काढूनही) नवकोट नारायण होतात, हे ऐकून होतो.
तरीही मक्याने शंका काढलीच, “काय रे गोमु, शेअर्सचे भाव आम्ही कधीच बघत नाही. पण पांच पट किंमत व्हायला किती तरी वर्षे लागत असतील ना ?”
त्यावर प्रभ्या म्हणाला “हो, आपले पैसे वर्ष, दोन वर्ष अडकून पडले तर मग काय फायदा !”
गोमु म्हणाला, “तसं कांही बिलकुल होणार नाही. तो मुळी जुन्या शेअर्समध्ये आपले पैसे गुंतवणारच नाही. तो अगदी नव्याने येऊ घातलेल्या कंपनीत आपले पैसे गुंतवणार आहे. फ्रेश प्राॕजेक्ट. अशा कंपनीच्या शेअरची किंमत भराभर वाढत जाते. विशेषतः त्या कंपनीला सरकारी कामे मिळणार हे नक्की असलं की हमखास.
नवीनभाईकडे आंतल्या गोटांतली माहिती आहे.
ही कंपनी काढणारे मालक दुसरेच असले तरी त्यामागे खरे एक मंत्री आहेत.
कांहीतरी सरकारी ऑर्डर्स तिला नक्की मिळतील. कंपनीचा शेअर सुरूवातीला दहाचा दहालाच मिळणार आहे. एकदा कां सरकारी ऑर्डर्स मिळायला लागल्या की तो पन्नासवर तर नक्की जाणार. पुढेही वाढतच राहिल.
पण नवीनभाई म्हणतो, “तुमच्यासारख्यानी जास्त जोखीम घेऊ नये. पांच टाईम भाव वधारला की पैसे काढून घ्या. मग तुम्हाला पाहिजे तर तो ट्रेडींग अकाउंट काढून देईल आणि मग तुम्ही तुमची काय गुंतवणूक करायची तर करा.” कंपनीचा प्रमोटर नवीनभाईचा लांबचा मेहुणा लागतो, हेही गोमुला त्याने सांगितलं होतं.
गोमु म्हणाला, “म्हणूनच तर मी तो इनसायडरसारखाच आहे असं म्हणालो. अर्थात् इनसायडर म्हणजे काय, हे त्यानेच मला सांगितले.”
आम्हां सहा जणांमध्ये खूप चर्चा झाली. सर्वांना दहाचे पन्नास झाले तर हवेच होते. पण शेअर मार्केटची धड माहिती एकालाही नव्हती. ‘बुल’वर स्वार व्हायची हिंमत नव्हती. बाकी सगळ्या प्रकारची रिस्क आम्ही घ्यायला तयार होतो. पण पैशाची रिस्क न घ्यायचा गुण अनुवंशिक होता.
मक्या म्हणाला, “आपण पैसे त्याच्याकडे देणार. तो आपल्याला रिसीटही देणार नाही. काय खात्री आहे की आपले पैसे तरी परत मिळतील ?”
गोमु म्हणाला, “हाच तर कळीचा मुद्दा आहे. मी ही त्याला तेच विचारलं.
तो प्रथम म्हणाला की तुमचा विश्वास नसेल तर राहू दे.
पण मग म्हणाला की आपल्यासाठी तो एक करू शकतो, तो आपल्याला पांच पट पैशांचा तीन महिन्यानंतरच्या तारखेचा क्रॉसड् चेक देऊन ठेवू शकतो. मग तर त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही ?”
आमची सगळ्यांची बँकेत खाती होती. मात्र चेकबुक वापरण्याइतकी जमा कुणाच्याच खात्यांत नव्हती. तरीही पोस्ट डेटेड क्राॕसड चेक म्हणजे पेमेंटची खात्री असते एवढी माहिती होती.
असा चेक मिळणार म्हटल्यावर सगळे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या नवरदेवासारखे पटापट तयार झाले.
पण प्रभ्याला अजून शंका होतीच.
प्रभ्या म्हणाला, “हे सर्व ठीक वाटतय तरी मला असं वाटतं की आपण सुरेशला आधी विचारायला हवं.”
कांही उतावळ्या नवऱ्यांनाही “आधी भटजीना विचारा म्हणायची संवयच असते, त्यांतलाच आमचा प्रभाकर.
गोमुने त्याला चोख उत्तर दिले, म्हणाला, “प्रभ्या, बावळटा, हा विचार मला नसेल कां सुचला ? मी नवीनभाईलाच विचारलं की सुरेश किती गुंतवणूक करणार आहे ?
तर तो म्हणाला, ‘सुरेश दोन लाख रूपये गुंतवणार आहे पण मी हे तुम्हा सर्वांना सांगितले, हे त्याला कळलं तर तो माझ्यावर रागावेल. तुम्हालाही फायदा होत असलेला त्याला पहावणार नाही. तुम्ही त्याच्याशी बोललात तर मला तुमचे पैसे घेतां नाही येणार. तो तुमचा दोस्त म्हणवतो पण दोस्ती खरी नाही त्याची.’ आता तुम्हीच सांगा सुरेशला कांही बोलायचं की नाही. सुरेश कधी आपल्याला कांही सांगतो ?”
गोमुने दिलेल्या ह्या माहितीवर पुन्हा चर्चा झाली. सर्वांचे एकमत झालं की सुरेशला ह्यांतलं कांही सांगायला नको. आपण पैसे द्यायचे आणि पांचपट किंमतीचे पोस्ट डेटेड चेक घ्यायचे. एकदम सरळ व्यवहार आहे. सर्वांनी एकमताने गोमुला नवीनभाईला पैसे देऊन चेक घ्यायला भेटीची वेळ ठरवायला सांगितले.
चार दिवसांनी आम्ही सर्व एका कॕफेमध्ये भेटलो. नवीनभाई तीशी-पस्तीशीचा हंसतमुख तरूण होता. त्याच्या मराठीवर थोडी गुजरातीची छाप होती. त्याला पाहून आम्ही ह्याचा संशय घेऊन त्याच्याकडे पोस्ट डेटेड चेक मागितलेत ही चूक करतोय असं वाटलं. माणूस विश्वासू दिसत होता. गोमु सोडून आम्ही पांच जणांनी बारा बारा हजार रूपये कॕश मोजून नवीनभाईकडे दिली. आमचे दहा हजार आणि गोमुचे म्हणून दोन दोन हजार. आमचे उधार घेतलेले दोन दोन हजार गोमु तीन लाख मिळताचं आम्हाला परत देणार होता. म्हणजे आमच्या बारा हजारचे पन्नास हजार होणार होते तर गोमु शुन्याचे पन्नास हजार करणार होता.
नवीनभाईने चेकबुक काढून साठ साठ हजार रूपयाचे पांच चेक फर्डी सही करून, तीन महिन्यानंतरची तारीख आणि आमचे नांव टाकून दिले. आपण हुशारीने व्यवहार केला या जाणीवेने आम्हां मराठी जनांचा उर भरून आला होता.
नवीनभाईने आम्हांला कल्पना दिली होती की साबरमती हर्बल लीमिटेड नांवाच्या नव्या औषधी कंपनीची स्टॉक एक्स्चेंजवर लौकरच नोंद होणार होती. ती झाली की तिचे शेअर्स विक्रीसाठी बाजारांत येणार होते. त्याचे प्रमोटरशी नाते असल्यामुळे त्याला शेअर्स थेट प्रमोटर्सच्या कोट्यांतून मिळणार होते. किंमत वाढून परत शेअर्स विकायला दीड दोन महिने लागले असते. सर्व औषधी कंपन्या सध्या खूप नफा कमावताहेत आणि ह्या कंपनीच्या ‘मुलांची ताकद वाढवणाऱ्या पावडरचे डब्बे’ मंत्र्याच्या वशिल्यामुळे सर्व सरकारी आणि म्युनिसीपल शाळांसाठी घेतले जाणार आहेत. मार्केटमध्ये हा शेअर आला की तो आम्हांला कळवणार होता. मग आम्ही रोज त्या शेअरचा भाव पेपरमध्ये पाहू शकलो असतो.
मध्यंतरात नवीनभाईने दिलेला त्याच्या सहीचा क्राॅसड चेक मी म्हाताऱ्या बायका जसे आपले किडूक मिडूक जपून खास ट्रंकेत ठेवतात तसा ठेवला होता.
पाच सहा दिवसांनी सुरेश मेहता मला शोधत आला. गोमु माझ्याबरोबरच होता. सुरेशला कसा चुकवतां येईल ह्याचा मी विचार करत होतो. त्याला न सांगता त्याच्या पाहुण्याशी व्यवहार केला होता, त्यामुळे किंचित अपराधीपण वाटत होतं.
पण सुरेश सरळ आमच्याकडेच आला.
त्याने गोमुला विचारलं, “काय गोमु, नवीनभाई दिसला कां कुठे ?”
गोमुला उत्तर सुचेना.
मी म्हणालो, “नाही. आज नाही भेटला.”
सुरेश म्हणाला, “मग कधी भेटला होता ?”
ह्यावर काय बोलावे, हे मला सुचेना.
पण गोमु एव्हाना सांवरला होता.
तो म्हणाला, “हो, भेटलो होतो मागच्या शनिवारी. तू कां चौकशी करतोयस?”
“आणि किती पैसे दिलेत त्याला ?” सुरेशने विचारले.
मी विचार केला की सुरेशला आता तरी खरं सांगावं.
मी म्हणालो, “आम्ही सहा जणांनी मिळून साठ हजार रूपये दिले त्याच्याकडे साबरमती हर्बलचे शेअर्स घ्यायला.”
सुरेश म्हणाला, “अरे, तुम्ही सुशिक्षित आहांत. पेपर वाचतां की नाही ? अशी नवी कंपनी येणार असती तर आधी पेपरांत नसती कां माहिती आली ? असे कसे पैसे दिलेत त्याला ? निदान मला तरी विचारायचं होतं. एवढे वर्ष मला ओळखतां आणि माझ्यावर भरवसा नाही तुमचा? आता बसा बोंबलत. नवीनभाई गेला पळून.”
गोमु आणि मी दोघेही एकाच वेळी ओरडलो, “काय ? नवीनभाई पळाला?”
छत्रपती शिवाजी संभाजी राजांसकट आग्र्याहून निसटले ही बातमी ऐकून मिर्झा राजे जयसिंग ही हबकले नसतील एवढे आम्ही हबकलो.
सुरेश पुढे म्हणाला, “नवीनभाई, माझ्या नात्यातला नव्हता की मित्र नव्हता. एका नातेवाईकाची ओळख सांगून इथे सरकारी आॕफीसमध्ये महत्त्वाचं काम आहे असं सांगून त्याने माझ्याकडे फक्त रहायला जागा मागितली. ती मी दयेपोटी दिली.
जेवणखाणं बाहेर करत असे. परवा मी त्या नातेवाईकाला फोन केला आणि नवीनभाईबद्दल विचारलं. तर तो म्हणाला की नवीनभाईने खोटे चेक्स दिले म्हणून त्याच्याबद्दल तक्रारी आल्यामुळे पोलिसांत त्याच्यावर तिथे कांही केसेस आहेत पण तो बेपत्ता आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. मग मी आणि माझ्या भावाने शनिवारी रात्री त्याला पकडला आणि त्याच्याकडून सर्व खरं ते वदवून घेतलं. माझ्या दोन शेजाऱ्यांकडूनही त्याने असेच पैसे घेतले होते. साला, तुम्ही लोक दहा रूपयाचा चहा पाजताना दहादां विचार करता आणि दहा दहा हजार रूपये द्यायला सहज तयार झालांत ? गोमु, तू त्याच्या गोड गोड बोलण्याला फसलास ? हे घ्या तुमचे साठ हजार रूपये. मी त्याच्याकडून काढून घेतलेले. पोलिस कम्प्लेंट देणार होतो. पण तुमचे पैसे अडकून पडले असते.
ते खोटे चेक माझ्याकडे परत द्या आणि अजून नवीनभाईला भेटायची इच्छा असेल तर आता गुजरात पोलिसांच्या लॉकअपमध्ये भेटा त्याला जाऊन.”
आमच्या हातात पैसे होते पण आमचे चेहरे फोटो काढण्यालायक झाले होते.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply