मी मुद्दाम वर शारू लिहिलंय, कारण ते स्वतःच्या नांवाचा शारू असा उच्चार करीत.
खऱ्या अर्थाने ” मॅनॅजमेन्ट गुरु ” म्हणता येईल अशा चार व्यक्ती व्यवस्थापन क्षेत्रात मला भेटल्या ज्या पूर्णतया उर्जावान, ज्ञानी, तपस्वी अशा आहेत- सर्वप्रथम भेटले शारू रांगणेकर, त्यानंतर शेजवलकर, नंतर व्ही. व्ही. देशपांडे आणि सर्वात शेवटी जी. नारायणा उर्फ गुरुजी ! पहिली तीन नांवे आता काळाच्या पडद्याआड गेलीत.
१९९० साली इचलकरंजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दिवसभराच्या सत्रासाठी शारू येणार होते. इस्लामपूरच्या आमच्या प्राचार्य जोगळेकर सरांनी आम्हां दोघा तिघांना आवर्जून पाठविले फक्त त्यांना ऐकायला. आधी थोडं प्रास्ताविक, नंतर स्वतःची एक कॅसेट, आणि त्यानंतर कॅसेटवर चर्चा-प्रश्नोत्तरे असा त्यांचा अभिनव प्रशिक्षण वर्ग होता. हे सगळं मला खूप आवडून गेलं. दिवसभरात अशी चार विविध सत्रे त्यांनी घेतली. मी आवर्जून त्यांना भेटलो- कार्ड घेतलं.
पुण्यात के एस बी त लागल्यावर मुद्दाम त्यांच्या सर्व कॅसेट्स घेतल्या. दर शुक्रवारी एक कॅसेट दाखवायची आणि उपस्थित २५-३० मॅनेजर्सनी त्यांवर साधक-बाधक चर्चा करायची. असा हा छोटासा साप्ताहिक प्रशिक्षण-तास सगळ्यांना आवडला.
मग मी माझ्या ट्रेनी इंजिनिअर्स समोर त्या कॅसेटची सेशन्स ठेवायला सुरुवात केली. त्याबरोबर आलेल्या स्क्रिप्ट्सची फोटोकॉपी काढून सगळ्यांना वाटायला लागलो.
पुण्याच्या बालाजी सोसायटीत डायरेक्टर असताना माझ्या एम बी ए मुलांच्या ओरिएंटेशन साठी त्यांना बोलावलं होतं. त्यावेळी ते थोडे थकले होते. कॅसेट सुरु करून खुर्चीवर स्वस्त बसायचे. पण तीक्ष्ण विनोद, अथांग ज्ञान, मुलांचे प्रश्न समजून घेण्याची हातोटी – इतरवेळी किंचित रुक्ष, मॅटर ऑफ फॅक्ट वृत्ती असलेले शारू सगळ्यांना आवडले.
मी त्यांना शेवटी भेटलो -रायपूरला ! २००८ साली आमच्या एम बी ए च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी त्यांना बोलावले होते. भल्या पहाटे साडे पाचची रायपूर फ्लाईट पकडून ते मुंबईहून आले. अधिकच थकलेले पण आवाज तोच करडा, तीक्ष्ण, टोकदार आणि श्रुड ! दिवसभर सत्र घेतल्यावर गेस्ट हाऊसला येऊन गाढ झोपले. रात्री थोडी फळे घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फ्लाईट पकडून मुंबईला रवाना !
त्यांचं सातत्य वाखाणण्याजोगं होतं. फोन केला की पटकन ओळखायचे. मग त्यांची सेक्रेटरी एक छापील फॉर्म फॅक्स करायची. त्यांत सगळं येणं -जाणं , प्रवासाची, मुक्कामाची इत्यंभूत माहिती मागितलेली असे. मानधन फिक्स- ५०००/- रु. दिवसाला. सोबत बॅगेत स्वतःची पुस्तके, कॅसेट्स आणायचे आणि सत्रानंतर चक्क विक्री करण्यासाठी आमच्या स्वाधीन करायचे.
आलेले पैसे काटेकोर हिशेबाने स्वतःजवळ ठेवायचे. कॉलेजसाठी काही विकत घ्या असं म्हणत बरोबर आणलेले बिल-बुक काढायचे आणि तिथल्या तिथे बिल तयार करून द्यायचे.
मानधन पाठवायला थोडा उशीर झाला की हमखास त्यांच्या सेक्रेटरीचा फोन यायचा.
नुसत्या त्यांच्या सहवासात, निरीक्षण करून माझ्यासारखे कितीतरी लोक व्यवस्थापन क्षेत्राची मुळाक्षरे शिकले.
धन्यवाद आणि अलविदा शारू !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply