शाश्वत जगी काय आहे
श्वास नाहीचं तो नक्की
तरी गालबोट लावले जाते
माणुसकी धर्मास!!
अर्थ–
याने माझा विश्वासघात केला, याने मला फसवलं, ही व्यक्ती विश्वास ठेवण्या लायक नाही, अशा अनेक वाक्यांना आपल्या आयुष्यात केव्हां ना केव्हां स्थान मिळतेच. जगण्याचे रहाटगाडगे बदलत नाही म्हणून इतरांना दोष देणारे, वेळेला मदतीला आलं नाही म्हणून कोणावर बोट ठेवणारे, अपेक्षाभंग कोणाकडून झाला तर त्याला मनात शिव्या घालणारे स्वतः किती विश्वासास खरे उतरतात हे त्या व्यक्तीने आरशा समोर उभे राहून पाहणे गरजेचे असते.
आत्ताचा क्षण पुढे नसणारे, आज आहोत, उद्या असू की नाही याची खात्री कोण देतो? देवळातील देव देतो की आरशातला चेहरा देतो? याचे उत्तर नाही असेच आहे. या जगात शाश्वत काय आहे? तर तो मृत्यू. श्वास कधी थांबेल याची माहिती कोणास मिळते?
आपण मात्र जगत रहातो, झगडत रहातो, आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या खरेपणावर बोलण्यात मात्र अर्ध आयुष्य घालवतो पण खरे जगतो कधी? यापुढे खरे जगू याची शाश्वती जर स्वतःची स्वतःला देता आली तर त्यासारखी आनंद देणारी दुसरी गोष्ट या जगात कोणतीही नसेल.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply