झिरमिळ्यांची पगडी घालून शास्त्रीबुवा आणखीच उंच वाटत.
पावणे सहा फुट उंच, साठीनंतरही प्रकृती ठणठणीत असणारे, लांब, काळ्या बटणांचा पांढरा डगला घालणारे, कपाळावर गंध लावणारे, काळा चष्मा घातलेले, शास्त्रीबुवा नेहमी धीर गंभीर वाटत.
त्यांचे खरे आडनाव काय होते, ते तिथे कोणालाच ठाऊक नव्हते.
लोक त्यांना शास्त्रीबुवा म्हणूनच ओळखत.
त्यांचे शिक्षण कुठे झाले होते, शास्त्री हे त्यांचे नाव होते की पदवी होती.
हे कांही कुणाला माहीत नव्हते.
वाड्यांतील एका छोट्या खोलीत ते रहात पण नेहमी ते ह्याच वेशांत लोकांना दिसत.
शास्त्रीबुवांच्या दरवाजावर “इथे जन्मकुंडली, हस्तरेषा, चेहरा, यांवरून भविष्य सांगितले जाईल.”
घरावर अशी छोटी पाटी असली तरी मोठ्या रस्त्यावर एका छानशा दुकानांत शास्त्रीबुवांच ‘ॲाफीस’ होतं.
तिथे ते दहा ते एक व चार ते सात बसत.
त्यांची ‘प्रॅक्टीस’ चांगली चालली होती.
कांही डाॅक्टरांपेक्षाही चांगली असं म्हणायला हवं.
कारण कायम लोक बाहेरच्या बाजूला बसलेले दिसत.
त्यांच्या ‘कन्सल्टिंग रूममधे’ नंबर आल्यावरच प्रवेश मिळे.
त्यांची फी ही निश्चित नसे.
तुमचे काम काय व कसे आहे ह्यावर तें अवलंबून असे.
शास्त्रीबुवा एकटेच रहात असत.
संसार पाठीशी लावून घेतला नव्हता, असं नाही म्हणतां येणार.
कारण त्यांची पत्नी कांही वर्षांपूर्वी वारली.
लोक म्हणत की ती लवकर जाणार, हे शास्त्रीबुवांना आधीच माहित होतं.
त्यांनी तसं भाकीतच वर्तवलं होतं.
खरं काय तें परमेश्वराला माहित.
माणसाला तर प्रत्येक माणूस कधीतरी जाणार, हे नक्कीच माहित असतं.
कधी तें मात्र निश्चित नसतं.
शास्त्रीबुवांची पत्नी अशक्त होती.
ती स्वतःच त्यांना म्हणत असे की मी गेल्यावर तुमचं कसं होणार.
“ती आधी जाणार’ हे ‘भविष्य’ शास्त्री बुवांनी सांगण्याची गरज नव्हती”, असं कांही खवचट लोक म्हणत असत.
कांही असो.
शास्त्रीबुवांची चलती होती.
रोज पंधरा वीस जणांच्या आयुष्यांत पुढे काय घडणार, त्याबद्दल तें सांगत.
कांहींचा कुंडली पहाण्यावर विश्वास असे.
शास्त्रीबुवाही त्याला प्रथम पसंती देत.
कुंडली नसेल तर ते कुंडली बनवून देत.
त्यांना तुमची जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ हवं असे.
ह्या बाबी माहित नसतील तर ते हस्तरेषांवरून भविष्य सांगत.
एखाद्याच्या हातावर कमी रेषा असत किंवा हाताला घट्टे पडलेले असत.
अशांचे किंवा ज्यांना हवे असेल त्यांचे भविष्य ते त्याचे मुखकमल पाहूनच सांगत.
ह्यामुळेच त्यांच्याकडे गर्दी असे.
शास्त्रीबुवांची फी त्या माणसाच्या गरजेनुसार व त्याच्या खिशाचा अंदाज घेऊन घेतली जात असे.
वाड्यातले लोक म्हणत, “शास्त्रीबुवांनी बऱ्यापैकी ‘माया’ जमवली असावी.”
ज्यांचा ज्योतीष वगैरे गोष्टींवर भरवसा होता, अशा लोकांत शास्त्रीबुवांच्या भविष्यकथनाविषयी अनेक कथा सांगितल्या जात.
एका गृहस्थांना त्यांनी नोकरी करू नकोस, कांही धंदा कर त्यात तुला नक्की यश मिळेल असं सांगितलं होतं व त्याने त्याप्रमाणे आलेल्या चांगल्या नोकऱ्या लाथाडून धंदा केला होता व कांही वर्षांतच तो लखपती झाला होता.
तेव्हां श्रीमंताला लखपती म्हणत, आतांसारखं करोडपती नाही.
त्यांनी पत्रिका जुळवल्यामुळे कोणा कोणाचे विवाह यशस्वी झाले होते.
कुणाला त्यांनी भविष्य वर्तवल्याप्रमाणे कन्या झाली होती तर कोणी परदेशीही गेले होते.
त्यामुळे शास्त्रीबुवांकडची गर्दी हटत नव्हती.
एखाद दुसऱ्याचं भविष्य बरोबर नव्हतं आलं पण अशी माणसे स्वत:ला दोष देत गप्प बसत असत.
एखादा आलाच परत तर त्याचे समाधान कसे करायचे हें त्यांना चांगले ठाऊक होते.
वर्तमानपत्रांत राशिभविष्य लिहिणारे जसे “बदली-बढतीची शक्यता आहे,” असा अंदाज वर्तवतात, तसेंच शास्त्रीबुवा भविष्य सांगतांना “अमक्या अमक्या गोष्टींचा योग आहे” असें म्हणत.
आता तो योग तुमच्या वाट्याला येतो की नाही ते तुम्ही पडताळून पहा.
एके दिवशी संध्याकाळी सहा वाजता दोन तरूण, नामू आणि दामू त्यांच्या ॲाफीसात आले व बाहेरच्या बाकावर बसले.
त्यावेळी तिथे फारशी गर्दी नव्हती.
तरीही एक जोडपं व दोन मध्यमवयीन गृहस्थ असे तिघे बसले होते.
नामू आणि दामूचा नंबर आला तोपर्यंत आणखी एक गृहस्थ आत येऊन बसले.
नामू आणि दामू आत गेले.
नामू मोठा होता, तो शास्त्रीबुवांना प्रश्न विचारू लागला.
तो म्हणाला, “शास्त्रीबुवा, मी नामू आणि हा दामू, आम्ही दोघे एक धंदा सुरू करत आहोत.
आम्हाला आमच्या धंद्यात यश मिळेल कां ?”
शास्त्रीबुवांनी विचारले, “तुमची पत्रिका नसावी बहुतेक !”
तो म्हणाला, “नाही पण तुम्ही हात किंवा चेहरा पाहूनही सांगता ना !”
शास्त्रीबुवांनी हो म्हटले व त्याने हात पुढे केला.
दामूचं इथे लक्ष नव्हतंच.
तो त्या जागेची बारकाईने पहाणी करत होता.
शास्त्रीबुवा आपले पैसे कुठे ठेवत असावेत, ह्याचा तो शोध घेत होता.
शास्त्रीबुवांचा उर्जितावस्थेतला धंदा पाहून त्यांना खात्री होती की शास्त्रीबुवांनी बरीच माया जमा केली असावी.
शास्त्रीबुवांना त्या तरूणाचा हात पाहून कांही बरे विचार मनांत आले नाहीत.
तरीही त्यांनी सांगितले, “धंद्यात तुम्हाला यश येऊ शकेल पण जोखीम फार आहे.
तुम्हाला सावध रहावं लागेल.”
तो म्हणाला, “आम्ही जरूर सर्व खबरदारी घेऊन धंदा करू.
बरं ! आजच आम्ही एक मोठा व्यवहार करणार आहोत, त्यांत यश येईल कां ?”
शास्त्रीबुवांनी कांही आंकडेमोड केली व म्हणाले, “आज तितका चांगला दिवस नाही.”
तो मोठ्याने हंसला आणि म्हणाला, “रात्र चांगली असेल ना !”
त्याने शास्त्रीबुवांना त्यांनी सांगितली त्याहून जास्तच फी दिली.
ते गेल्यावर शास्त्रीबुवांनी पुढच्या गृहस्थाला आत बोलावलं.
ते नेहमीप्रमाणे काम करू लागले पण त्यांना चैन पडेना.
राहून राहून त्या दोघांबद्दलचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले.
भविष्य जाणून घेणे हा त्यांचा खरा उद्देश नसावा असे त्यांना वाटू लागले.
सात वाजतां त्यांनी आपले ॲाफीस बंद केले व ते नित्यनियमाप्रमाणे तात्याच्या खानावळीत जेवायला आले.
जेवण वगैरे झाल्यावर घरी आले.
त्यांनी आपला वेश बदलला.
धोतर, कुरता घालून ते आरामखुर्चीत वाचत बसले.
वाचतां वाचतां त्यांना डुलकी लागली.
दारावर थाप ऐकून ते दचकून जागे झाले.
त्यांनी घड्याळ पाहिले तर रात्रीचे बारा वाजायला आले होते.
ह्यावेळी कोण आलं असावं, असा ते विचार करत असतांना बाहेरून आवाज आला, “वाड्यात आग लागलीय, लवकर बाहेर या.”
शास्त्रीबुवा क्षणभर विचलित झाले व त्यांनी दार उघडले.
तोंच बाहेरच्या माणसाने हात त्यांच्या तोंडावर दाबला व त्यांना जोरात आत ढकलले.
मागोमाग नामू-दामू हातांत मोठे चाकू घेऊन आत आले.
त्यांना पाहून शास्त्रीबुवांनी त्यांचा उद्देश ओळखला.
नामूने चाकू त्यांच्या पोटाला टेकत म्हटले, “काय, आमचे आजचे काम यशस्वी होणार की नाही ?”
शास्त्रीबुवा म्हणाले, “नाही होणार.”
दामू म्हणाला, “ए थेरड्या, मुकाट्याने चाव्या दे इकडे आणि सांग तू तुझा माल कुठे ठेवलायस तें.”
शास्त्रीबुवा म्हणाले, “माझ्याकडे कांही नाही. तुम्ही उगाच वेळ वाया घालवू नका.”
नामू म्हणाला, “ठीक आहे. तुम्ही बोलायला तयार नाही ना ! मग बांधून टाक रे यांच मुस्काट.”
शास्त्रीबुवा तसे भित्रे नव्हते पण त्यांना लढायला अवसर मिळालाच नाही.
त्या दोघांनी त्यांचे हात पाय बांधले, तोंड बंद केले व जमिनीवरच टाकले.
मग ते दोघे खोलीत शास्त्रीबुवांच्या संपत्तीचा शोध घेऊ लागले.
त्या काळी बॅंका, लाॅकर, सामान्यापर्यंत पोहोचले नव्हते.
बहुतेक लोक घरांतच दागदागिने, सोनं, चांदी, नाणी, इ. मधे संपत्ती घरांतच साठवत.
कपाटांत कांही मिळाले नाही.
त्यांनी कपाटाची काळजीपूर्वक तपासणी केली पण त्यांना चोरकप्पा आढळला नाही.
शास्त्रीबुवांच्या मठीचा काना कोपरा त्यानी तासभर शोधला.
जमीन ठोकून, कांही ठिकाणी उकरून पाहिली.
त्यांना कुठेच कांही मिळालं नाही.
तेव्हा ते नामू-दामू संतापले.
त्यांनी आपला मोर्चा परत शास्त्रीबुवांकडे वळवला.
त्यांना बोलतं करण्यासाठी बेदम मारहाण केली, बिडीचे चटके दिले पण शास्त्रीबुवांनी कांहीही सांगितले नाही.
दामूने त्यांचा गळाच आवळला.
मार खाऊन आधीच दमलेल्या शास्त्रीबुवांचा गळा दाबतांच ते बेशुध्द झाले.
नामूने दामूला आवरले, “अरे, बापरे, हा म्हातारा मेला की काय ? चल, आता इथून दूर पळून गेलं पाहिजे. टाक त्याला खाली.”
त्या दोघांनी त्यांचे मुटकुळे एका कोपऱ्यात फेकून दिले.
ते जगोत की मरोत, त्यांना चिंता नव्हती.
त्यांना वाईट वाटत होते, ते याचे की हा थेरडा संध्याकाळी म्हणाला, “आज आपल्याला यश येणार नाही”, तें खरे ठरले.
त्यांनी तिथून पळ काढला.
दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्यातला एक सात आठ वर्षाचा मुलगा शास्त्रीबुवांच्या खोलीजवळून जात होता.
नेहमी बंद असणारे दार थोडेसे उघडे आहे, असे त्याला दिसले.
त्याने दाराच्या त्या फटीतून आत पाहिले.
आरामखुर्चीत शास्त्रीबुवा दिसले नाहीत.
त्याने दार थोडे अधिक ढकलले व पाहिले.
सर्व अस्ताव्यस्त सामान त्याला दिसले.
कोपऱ्यातले शास्त्रीबुवा दिसले नाहीत.
त्याने आपल्या घरी धावत जाऊन बाबांना ही खबर दिली.
थोड्याच वेळांत शास्त्रीबुवांच्या दाराशी गर्दी जमली.
जो तो तर्क करू लागला.
वाड्यातील एक कर्तबगार आणि वाड्यावर वचक ठेवून असलेले देशमुख काका आंत गेले.
त्यांनी जवळ जाऊन शास्त्रीबुवांची हालत पाहिली.
शास्त्रीबुवांचा जीव गेलेला नाही हे लक्षांत येताच त्यांनी त्यांचे हात पाय सोडवायला सुरूवात केली व पोलिसांना आणि डाॅक्टरला लवकर बोलवायला सांगितले.
तोपर्यंत कुणीही आत येऊ नका म्हणून सर्वांना दम भरला.
यथावकाश पोलिस आले.
त्यांनी पंचनामा केला.
चोरीच्या उद्देशाने घरफोडी व जीवघेणा हल्ला केल्याच्या गुन्ह्यांची नोंद केली.
डाॅक्टरांनी शास्त्रीबुवांना तपासले व तात्काळ इस्पितळात हलवायची व्यवस्था केली.
पोलिसांनी खोलीला टाळे लावले व खोली सील करून टाकली.
बातमी हळूहळू सर्वत्र पसरली.
लोकांमध्ये चर्चा होती ती हीच की चोरट्यांच्या हाती किती संपत्ती लागली असावी ?
सर्वांचा अंदाज “घसघशीत” असा होता.
शास्त्रीबुवांचा भविष्याचा धंदा जोरांत चालत होता.
त्या काळच्या मानाने त्यांची रोजची कमाई सामान्य माणसाहून बरीच जास्त होती.
त्यामुळे बऱ्याच जणांना त्यांचा हेवा वाटे.
आता सर्वांच कुतुहल जागृत झालं होतं.
शास्त्रीबुवांची किती संपत्ती चोरांनी लुटली असावी त्याचे तर्क लोक बांधू लागले.
शास्त्रीबुवा अजून शुध्दीवर आलेच नव्हते.
डाॅक्टरांचे प्रयत्न चालू होते.
संध्याकाळच्या पेपरांतही हेडलाईन होती, “भविष्य सांगून जमवला गल्ला, चोरांनी मारला त्यावर डल्ला.”
खाली पूर्ण बातमी दिली होती.
पोलिसांनी एव्हाना बोटांच्या ठशावरून तिथे दोन चोर होते व त्यापैकी एक पूर्वी तुरूंगात राहून आलेला होता व तपास त्या दिशेने चालू असून चोरांना लवकरच अटक करू, असें वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितल्याचे बातमींत म्हटले होते.
बातमीदारानेही शास्त्रीबुवांच्या कमाईबद्दचे अंदाज केले जात असल्याचा उल्लेख करून, ते आपली संपत्ती कुठे ठेवत असावेत, चोरांच्या हाती काय लागले असावे ह्याबद्दलचे लिहिले होते.
इकडे इस्पितळात शास्त्रीबुवा अजून दुसऱ्या दिवशीही मृत्यूशी झुंज देत होते.
त्यांच्या बाजूला खानावळवाला तात्या बसलेला होता.
शास्त्रीबुवा इस्पितळात आल्यापासून तात्या त्यांच्या बरोबरच होता.
त्यांची खरी चिंता करणारा तोच एक होता.
पोलिसांनी त्या नामू-दामूला दुसऱ्याच दिवशी अटक केली होती.
पोलिस इन्स्पेक्टर त्या दोघांना घेऊनच इस्पितळांत आले होते.
त्यांना वाटलं होतं की शास्त्रीबुवा आता शुध्दीवर आले असतील तर त्या दोघांना ओळखतील.
त्या पाठोपाठ बातमीदार व कांही वाडीतले लोकही तिथे आले होते.
डाॅक्टर म्हणत होते, “शास्त्रीबुवांची प्रकृती आता सुधारतेय, केव्हांही ते शुध्दीवर येतील. इथे गर्दी मात्र करू नका.”
असं म्हणून सर्वांना बाहेर काढायचा प्रयत्न करत होते.
आपल्या मित्राला निर्घृणपणे मारहाण करणाऱ्या त्या दोन चोरांना पाहून, तात्या जोशीचे पित्त खवळले.
तो त्यांच्या अंगावर धांवून गेला व पोलिसांच्या समोरच त्याने दोघांना थोबाडले.
तो ओरडला, “अरे, ह्या देवमाणसाच्या अंगाला हात लावायची तुमची हिंम्मतच कशी झाली ?
हा कांही नुसता पोटभरू स्वार्थी ज्योतिषी नाही रे !
तो अनेकांचा पोशिंदा आहे.”
चोरांनी माना खाली घातल्या होत्या तर इतर सर्व चकीत होऊन तात्याचं बोलणं उत्सुकतेने ऐकत होते.
तात्या त्यांच्याकडे पहात म्हणाला, “आणि तुम्हांला माहित करून घ्यायचय ना की शास्त्रीबुवा आपली संपत्ती कुठे ठेवत होते ?
मग ऐका तर !
रोज परत घरी जातांना ते जेवायला माझ्याकडे येतात, तेव्हां आपली सर्व कमाई माझ्या स्वाधीन करतात.
काय हवं असे त्यांना ?
फक्त भाडे, रोजचं जेवण आणि वर्षाकांठी कपड्यांची जोडी. बस्स.
त्यांच्या गरजा एवढ्याच.
बाकी सर्व पैसा ते माझ्यातर्फे एक अनाथाश्रम चालवायला देत असत.
सव्वाशे-दीडशे पोरं त्यांच्या कमाईवर जगताहेत, समजलांत !
असा हा माझा मित्र जर बरा झाला नाही ना तर तर ह्या चोरांना शंभरदा फाशी देऊनही समाधान होणार नाही माझं !”
हळूहळू पूर्ण शुध्दीवर येत असलेल्या शास्त्रीबुवांचे कान प्रिय मित्र तात्याचे शब्द टीपत होते.
अरविंद खानोलकर. ©️
वि.सू. – या कथेतील पात्रे, प्रसंग, घटना, इ. सर्व काल्पनिक आहे.
कुठे साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-अरविंद खानोलकर.
Leave a Reply