मी या जगातून एक दिवस ठरवून लुप्त होईन
जंगलात एकाकी भटकण्यासाठी
तुझे जीवनगाणे गाण्यासाठी
त्या गाण्यात माझे तुझ्यावरचे छुपे प्रेम असेल,
त्यातील माझे मधुर शब्द
सतत प्रवास करतील तुझ्या दिशेने
मध्यरात्री तेजस्वी पूर्ण चंद्र
त्याचे सौंदर्य उधळीत असेल तेव्हा
मूक विस्मय नक्कीच उमटेल तुझ्या चेहेऱ्यावर
मग गुरुदेवा तुझ्या उपस्थितीत,
माझी कृतज्ञता हळू हळू प्रकट होवो .
मी स्वत: ला अर्पण करतो
पूर्णतः तुझ्या चरणांवर
नैसर्गिक संवेदनांशी जोडून घेतलेला
माझा श्वासोच्छश्वास
आकाशातील रात्रीच्या गूढ शांततेत
बासरीचा लयबद्ध सूर होऊन तुझ्या कानी येईल
या अज्ञात प्रवासाची सत्वर घोषणा कर !
चंद्राची सुवर्ण किरणे
गडद काळोखात सभोवती लपेटून घेऊन
प्रतीक्षेत असलेल्या जंगलात मी मग प्रवेश करेन
अनंत काळापासून या क्षणाच्या प्रतीक्षेत मी आहे
तुझ्या कृपेच्या झळाळीत माझ्या मर्यादा विरून जाऊ देत आणि
आकाशा पल्याडच्या असीमित आनंदाचा मला नवा अनुभव घेऊ दे
त्या अथांग वैश्विक अवकाशाचा
साधेपणा आणि विनम्रता स्तिमित करणारा आहे
सर्व प्रश्न मला तुझ्या चरणी विसर्जित करू देत .
माझा अहंकार, माझे दु: ख, माझ्या चिंता यांचा मला विसर पडो !
माझ्या सर्व आकांक्षा गळून जावोत
आणि
तुझ्या प्रेमळ सान्निध्यात माझे अस्तित्व परिमळो !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply