आयुर्वेद हि शास्त्रीय उपचार पद्धती आहे हे सर्व जगाला ज्ञात आहे, उपचारात नैसर्गिक नियमांनी वाढलेल्या वनस्पतींचा वापर करून घातक परिणाम टाळले जातात. आयुर्वेदात अनेक महत्वपूर्ण वनस्पतींचा वापर केला जातो, ह्या वनस्पती आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कितीतरी वनस्पती लोकांना माहीतच नाहीत यामुळे नष्ट केल्या जातात, शेतकऱ्यांना माहित नसल्याने औषधी शेतीचाही प्रयत्न केला जात नाही. अशाच हजारो महत्वपूर्ण वनस्पतींपैकी एक म्हणजे शतावरी होय.
प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात उल्लेख आढळतो, ‘सुश्रुत ऋषींनी’ शतावरी विषयी खालील पंक्ती लिहून ठेवल्यात-
” वातपित्तहरी वृण्या स्वादुतिक्ता शतावरी |
महती चैव हृदधा च मेध्याग्निबलवर्धिनी ||”
तसेच धन्वंतरी निघंटुकार यांनी खालील पंक्ती लिहून ठेवलेल्या आहेत-
” शतावरी हिमतिक्ता रसे स्वादु क्षयास्रजित |
वात पित्तहरी वृष्यारासायान्वारा स्मृता ||”
शतावरीचे शास्त्रीय नाव – Asparagus recemosus Wilid
मराठी नाव – शतावरी
हिंदी नाव – शतावर
संस्कृत नाव – शतावरी, नारायणी, इंद्रीवरी, शतपदी, शतविर्या, बहुसुता, शतमुली
इंग्रजी नाव – Aspargus अशी विविध नवे आहेत.
रासायनिक घटक – शातावारीत उच्चतम प्रोटीन, युरोनिक एसिड व हेमी सेल्युलोज, तसेच शतावरीन I ते IV असते. चार सेपोनिन्स असतात. शतावरीत I हे सार्सपोजीनीन नावाचे ग्लुकोसाईड आहे ज्यात तीन ग्लुकोज व एक रेनमोस साखरेचे अणु असतात. तर शतावरीन IV मध्ये दोन ग्लुकोज व एक रेनमोस साखरेचे अणु असतात.
गुणधर्म /उपयोग :- शीत, तिक्त, बुद्धिवर्धक, अग्निवर्धक, शुक्र दुर्बलता दूर करणारी, अशक्तपणा दूर करणारी, अनेक स्त्रीविकारांमध्ये उपयोगी, ऐनिमिया, संधिवात, अर्धांगवायू, लचक, मुरड तसेच हृदयाला बल देणारी व संकाचन क्षमता वाढविणारी, तसेच स्त्रीयांमध्ये गर्भाशय उत्तेजना थांबवून गर्भाशयाची गती संतुलित करणारी. निद्रानाश, रातआंधळेपणा, स्वरभंग, डोकेदुखी तसेच विषघ्न आहे.
अशा प्रकारचे विविध गुणधर्म असणाऱ्या शतावरीची शेती केल्यास अधिक फायद्याची ठरू शकते, शतावरीच्या वाळलेल्या मुळ्या ३०० ते ४०० रुपये प्रती किलो दराने विकल्या जातात. वार्षिक सरासरी पर्जन्य २५० ते ३०० से.मी.पडतो, तसेच १० ते ५० डिग्री सेल्सियस तापमान आहे त्या ठिकाणीही सहजपणे उत्पादन घेता येते. शेतकऱ्यांना वरदान ठरू शकणाऱ्या ह्या औषधी वनस्पतीच्या शेतीला सुरुवात होणे आवश्यक आहे.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply