
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल ‘ अमलीवन ‘ म्हणून प्रसिद्ध होते .माहूर हे प्राचीन किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता, दत्तात्रेय, अनसूयामाता या तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा माहूरचा हा डोंगरकिल्ला गौंड या आदिवासी राज्याचा एकेकाळी सत्तेचे केंद होता. या परिसराला सुमारे ६ मैल तटबंदी आहे, किल्ल्यावर हत्तीदरवाजा, ब्रह्माकुंड, कारंजी, हौद यांचे अवशेष त्याचे गत वैभवाची साक्ष देत उभे आहेत, १४२७ मध्ये आदिवासी गोंडराजाचा पराभव करून अहमदशहाने माहूरगड जिंकून घेतला . तेव्हा येथील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, पुढे किल्लेदार जयसिंग ठाकूर याने रेणुकादेवीचा सभामंडप बांधला .
या सभामंडपवजा मंदिरात प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे पुढे देवीची बैठक असुन देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे या बैठकीवर ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा रेणुकादेवीचा तांदळा आहे.
या ठिकाणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत.
भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची नगरी होती. त्या नगरीत इश्वाकू राज्याचा पुत्र रेणू राजा राज्य करीत होता रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी. शंकर-पार्वतीला प्रसन्न करून कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून रेणुका प्रगटली. यथावकाश भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले व ती तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. ते भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले. त्यांचे सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू हि होती, रेणुकेला वसू, विश्वासू, बृहद्भानू, बृहत्कन्न आणि परशुराम ही मुले झाली.
रेणुका एकदा नदीवर गेली असता स्त्रियांसह मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला पाहून तीचे मनात कामूक भाव येतात ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व पुत्रांना तिची हत्या करण्यास सांगतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.
पाचवा पुत्र परशुरामास आज्ञा करतात,पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी प्रसन्न होतात. पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात. त्यांना क्रोधाचा पश्चाताप होतो व ते रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात. व आपला क्रोध त्यागतात. पुढे राजा सहस्त्रार्जुन जमदग्नी आश्रमात येतो. त्याला तेथे असणार्या कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; .पण जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात. तेव्हा राजा आश्रमावर हल्ला करतो. सर्वांची हत्या करून रेणुकेला जखमी करून कामधेनूला घेऊन जातो नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर पोहचला . तिथे असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले .या पाण्याने स्नान घालून व तेथेच दत्तात्रेयांचे पौरोहित्या खाली परशुरामाने जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. त्यानंतर परशुरामाला रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ‘ तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल .फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले. त्या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ठिकाणाला मातापूर नाव मिळाले पुढे त्याचे माहूर झाले.
या परिसरात महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. खालील बाजूस परशुराम मंदिर, गणपती मंदिर, पांडवतीर्थ , औदुबर झरा, अमृतकुंड, बोधतीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ , ऋणमोचनतीर्थ ही स्थळे आहेत.
— निखिल आघाडे
Leave a Reply