मंदिर हे समाज मंदिर कसं होऊ शकतं, बहुदिशांनी समाजासाठी अनेक उपक्रम करताना व्यवस्थापन कसं पारदर्शक ठेवता येतं,’ याचा वस्तुपाठ म्हणजे शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान. हा आदर्श निर्माण झाला तो भाऊंचं कुशल नेतृत्व आणि त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्यामुळे. शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानाने उभे केलेले 42 सेवाप्रकल्प आणि त्यांची कार्यपद्धती पाहावी. हे केवळ धार्मिक संस्थान नाही, तर मानवतेचं मंदिर आहे
2010मध्ये महाराजांच्या समाधीला आणि संस्था स्थापनेला शंभर वर्षं पूर्ण झाली. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ही महाराजांची भक्तांना शिकवण. या शिकवणीनुसार आजही वर्षाचे 365 दिवस शेगावात अन्नदान होतं. रोज हजारो भाविक आणि जवळपासच्या खेड्यातले गरीब लोक याचा लाभ घेतात. सर्वांना जेवण एकच. महाराजांनी भक्तांमध्ये कधी गरीब-श्रीमंत असा भेद केला नाही. त्यांच्या भक्तांनीही ही परंपरा जपली आहे.
आयुर्वेद या भारतीय उपचार पद्धतीचा रुग्णांना लाभ व्हावा या हेतूने शेगावात 1963 साली धर्मार्थ आयुर्वेदिक दवाखान्याची स्थापना झाली. हे वैद्यकीय सेवेतलं पहिलं पाऊल. त्यानंतर धर्मार्थ ऍलोपॅथी दवाखाना, धर्मार्थ होमिओपॅथी दवाखाना, फिजिओथेरपी विभाग, अपंग पुनर्वसन केंद्र, नेत्र शस्त्रक्रिया शिबिरं, जिथे सरकारी रुग्णालयं नाहीत किंवा प्राथमिक स्वास्थ्य केंद्रासारखीही सुविधा नाही अशा ठिकाणी फिरती रुग्णालयं, आदिवासी विभागाकरिता फिरती रुग्णालयं, दारिद्र्यरेषेखालील गरिबांसाठी ग्रामीण आरोग्य सेवा योजना अशा विविध दिशांनी वैद्यकीय सेवा विभाग काम करू लागला. आतापर्यंत लाखो लोकांना या सगळ्या उपक्रमांचा फायदा झाला आहे.
वारकरी संप्रदायाची शिकवण देणारी वारकरी शिक्षण संस्था हा शेगावातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम. 1964 साली ही शिक्षण संस्था स्थापन झाली, इथे कीर्तन, भजन, प्रवचन, भारुड यांच्या शिक्षणाबरोबरच श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, श्रीमद्भागवत, संतगाथा आदी ग्रंथांचं अध्ययन करतात.
संत श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाची आज विदर्भातल्याच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयात गणना होते.
एकातून दुसरं काम समोर येत गेलं आणि त्या कामाला न्याय देणारी व्यक्ती भाऊंना सापडत गेली. मतिमंद विद्यालयाची सुरुवातही अशी झाली.अक्षरश: चारच दिवसांत शेगावात निवासी मतिमंद विद्यालय सुरू झालं. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर 3 सुवर्णपदकांसह अनेक बक्षिसं या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवली आहेत.
शेगावचा आनंद सागर प्रकल्प म्हणजे धर्म आणि विज्ञान यांचा अनोखा संगम असलेला प्रकल्प. केवळ शेगावसाठी नव्हे, तर संपूर्ण विदर्भाचा मानबिंदू ठरावं असं हे थक्क करणारं, अनेक विक्रम करणारं काम.
या संस्थानचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे ‘सेवाधारी’ ही अतिशय स्तुत्य अशी संकल्पना. आज संस्थानाच्या सर्व उपक्रमात या सेवाधाऱ्यांचा अमूल्य सहभाग आहे. 3 दिवस, 7 दिवस, 15 दिवस आणि 1 महिना असे कालावधी ठरलेले आहेत. या कालावधीत ज्याला जसा वेळ असेल तसा तो सेवेसाठी येतो. 25 सेवाधाऱ्यांचा एक गट आणि प्रत्येक गटाचा एक प्रमुख अशी व्यवस्था आहे. दोन वेळचं भोजन म्हणजे महाराजांचा प्रसाद, निवासाची सोय, सेवाधाऱ्याचा पोशाख आणि घरी जाताना प्रसादाचा नारळ दिला जातो. ही सेवा पूर्णपणे ऐच्छिक आहे. तरीही आज अकरा हजार सेवाधारी वेगवेगळ्या विभागात सेवा देत आहेत.
‘अशी माणसं आहेत, म्हणून समाज तग धरून आहे
— संतोष द पाटील
Leave a Reply