आयताकृती फडके वाडा … आयताच्या एका बाजूला झाकलेली विहीर , पंप रूम आणि चाफ्याचं मोठं झाड .. उरलेल्या तीनही बाजूंना एक मजली चाळीसदृश घरं … अगदी बाजूबाजूला लागून … दोन्ही कोपऱ्यात लाकडी जीना …. मध्यभागी सगळं अंगण … अंगणात काही उगाच वाढलेली तर काही मुद्दाम लावलेली झाडं …. विशेषतः… लक्ष वेधून घेणारं तगरीचं झाड… … विहिरीसमोरच्या बाजूला पहिल्या मजल्यावर मध्यभागी असणाऱ्या तीन घरात राहणारी देशपांडे , जोशी आणि मणेरीकर हे त्या फडके वाड्याचे २४ x ७ कार्यरत असणारे CCTV . … आख्खा वाडा त्यांच्या खिडकीतून एका नजरेत दिसायचा …. असे हे वर्षानुवर्ष एकोप्याने राहणारे समस्त भाडेकरू….
……… हां ss …आता कधी कधी क्षुल्लक गोष्टींवरून “शीतयुद्ध” व्हायची !! … घराची हद्द पुढे ओढत कॉमन बाल्कनीची आणि तीच पुढे कपडे वाळत घालायच्या दोरीपर्यंत …. त्यामुळे तुमच्या चपला आमच्या दारात किंवा तुमचा टॉवेल माझ्या चड्डीवर का वाळत घातला वगैरे असं “अतिक्रमण” वारंवार …. ज्येष्ठ नागरिक दुपारी मेंढीकोट खेळताना थोड्याफार “शाब्दिक चकमकी” ….अंगणात क्रिकेट खेळताना उडालेला रबरी चेंडू जेव्हा खिडकीत वाचत बसलेल्या लेले आजोबांचं “कपाळ” शेकवायाचा तेव्हा सुरीने त्याचे दोन तुकडे करून लेले आजोबा त्या चेंडूला “मोक्ष” मिळवून द्यायचे असे क्वचित होणारे “हिंसक” प्रकार …. वाळवण घातलेल्या चिकवड्या , कुरडया पूर्ण वाळायच्या आधी वाड्यातली मुलंच अर्धी फस्त करायची तेव्हा महिला वर्गाकडून होणारं “ध्वनी प्रदूषण” असे तुरळक प्रकार सोडले तर सगळे अगदी मिळून मिसळून राहायचे … सगळी माणसं एरव्ही कशीही असोत पण एक “शेजारी” म्हणून चांगलेच होते … आणि त्यातल्या त्यात “पम्या आणि त्याचे शेजारी” याचं घट्ट नातं होतं ….
पम्या…….लहानपणापासूनच चुणचुणीत , हुशार , धडपड्या , मोठी स्वप्न पाहणारा…… एक महत्वाकांक्षी मुलगा ….. त्याचे वडील लहानपणीच जग सोडून गेले होते … त्यामुळे गरजेपोटी आईला नोकरी करणं भागच होतं …. पम्या बरेचदा आपल्या घरापेक्षा शेजारीच जास्त असायचा … शेजारच्यांचाही तो तितकाच लाडका …. दोघांचाही एकमेकांवर प्रचंड जीव ……. पम्या पुढे खूप शिकला …..चंपक ,चांदोबा ….. मग stardust…. ते इन्जिनीयरिंग , MBAची मोठाली पुस्तकं हा सारा प्रवास प्रशंसनीय होता ….आणि या सगळ्यात त्या वाड्याचं आणि विशेषतः त्या शेजाऱ्यांचं मोठं योगदान …… खरं तर त्या शेजाऱ्यांच घर यांच्यापेक्षा छोटं आणि माणसंही जास्त …. पण कधीही तक्रार नाही . “घराचं क्षेत्रफळ आणि तिथे राहणाऱ्यांचं मन याचं बहुधा व्यस्त प्रमाण” असावं ….” घर जितकं छोटं , मन तितकंच मोठं” ….. दोन्ही घरांपैकी कोणाकडेही अगदी साध्या लोणच्यापासून ते सणासुदीच्या श्रीखंड -बासुंदी पर्यंत कुठलाही नवीन पदार्थ केला की आपसूकच वाटीभर देण्यासाठी पावलं शेजारी वळायचीच आणि या उलट कधी मिरच्या किंवा साखर संपली की हक्कानी त्याच शेजारी-एकमेकांकडे मागण्यात सुद्धा कसली भीडभाड नसायची ….कधी काही चांगलं किंवा वाईट , काहीही घडलं तरी आधी शेजारी शेअर व्हायचं …. आजारपण असो वा मंगलकार्य कुठल्याही मदतीसाठी शेजारी अर्ध्या रात्री सुद्धा एका पायावर तयार … “आपला परिवार कितीही मोठा असला तरी चांगल्या शेजाऱ्यांशिवाय अपूर्णच असतो”..
झाकण्यासारखं कोणाकडेच काही नव्हतं… त्यामुळे सकाळी उघडलेले सगळ्या घरांचे दरवाजे रात्री झोपतानाच बंद व्हायचे …. कोणाकडे साधा ग्लास जरी फुटला , कोणाचं लग्न ठरलं , कोणी परीक्षा पास झालं , कोणाशी कोणाचं लफडं , की अगदी कोणाला मुळव्याध जरी झाली तरी इतक्या “आतल्या” गोटातल्या बातम्या सुद्धा लगेच सगळ्या वाड्याला कळायच्या …. “कमी तिथे आम्ही” म्हणत तीन CCTV आलटून पालटून इमाने इतबारे काम करायचे ……वर्षामागून वर्ष लोटत होती …. मोठ्या पगाराची नोकरी लागल्याची चांगली बातमी घेऊन पम्या वाड्यात शिरला आणि त्या बातमीचा प्रवास ठरल्याप्रमाणे आधी “पाजारी”, मग “शेजारी” आणि मग सरतेशेवटी स्वतःच्या घरी…. पुढे पम्यानी लग्न केलं ……. संसार सुरु झाला ….. कालांतरानी आईचंही निधन झालं ….. पण पम्या ची घोडदौड सुरूच होती ……. पम्याचा आता “प्रमोद साहेब” झाला होता ….. एका उच्चभ्रू complex मध्ये घर घेतलं …. छोटे २-३ flat एकत्र करून मोठ्ठं घर ….. वाड्यानी दिलेल्या दोन अगदी जवळच्या गोष्टी म्हणजे “पम्या हे टोपणनाव” आणि “लाडका शेजार”…. या दोन्ही गोष्टी वाड्यातच सोडून प्रमोद साहेब नवीन वास्तुत राहायला आले …… नाही म्हणायला एक शेजारी होते तिकडे….. वाड्यातले अंगवळणी पडलेले संस्कार असल्याने नवीन शेजाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करण्याचा आपसूकच प्रयत्न त्याने केला ……… … पण हे शेजारी “कॉर्पोरेट” संस्कृती मधले.. अध्यात ना मध्यात……त्यामुळे फारसं यश आलं नाही …. तिथे वाड्यात “उगाच नाक खुपसणारे” तर इथे “उगाच नाक मुरडणारे” ….. ..तरीही एकदा बाहेर पडता पडता प्रमोदनी शेजाऱ्यांना गाठलंच … थोड्या गप्पा चालू केल्या ….. पण “जेव्हढ्यास तेव्हढं” उत्तर …… थोड्या अजून चौकश्या चालू केल्या तर वहिनींच्या चेहऱ्यावरचे भाव बघून ट्रकच्या मागे लिहिलं असतं ना तसा “ तू १३ देख “ वाला फील आला……. तरीही थोड्या थोड्या दिवसांनी मिशन सुरूच ठेवलं ….. एकदा घरी जरा वेगळी भाजी केली म्हणून पम्याची बायको शेजारी घेऊन गेली….. तर आम्ही सध्या Oily खात नाही असं म्हणत परत पाठवली …… आणि उलट काही दिवसांनी स्वतःच्या घरी Birthday पार्टी साठी बोलावून Status कसं maintain करायचं याचा दाखलाच दिला . त्यातले सामोसे आणि वेफर्स Oily सदरात मोडत नाहीत हे सुद्धा तेव्हा समजलं …….. आता मात्र प्रमोद हळूहळू त्याच Culture मध्ये रुळायला लागला …… “शेजार” हा शब्द त्याच्या शब्दकोशातून निसटू लागला होता …… “खरंच … लग्नाच्या वेळेस चांगलं स्थळ मिळणं आणि राहत्या ठिकाणी चांगला शेजार मिळणं या दोन्हीसाठी भाग्य लागतं” …..
तशा “औपचारिक”जगण्याची सवय झाली होती त्याला ….. मुलगा ही मोठा होत होता ……. आताशा status प्रमाणे प्रमोद सुद्धा पार्टी साठी इतरांना बोलावू लागला होता ……….एकीकडे यशाची एकेक शिखरं काबीज करत होता … अगदी जाणून बुजून नाही आणि जुल्माचा राम राम म्हणूनही नाही …….पण काळाप्रमाणे बदललेल्या सगळ्या राहणीमानाचा आणि संदर्भांचा परिणाम म्हणून आपसूकच वाडा , शेजार या सगळ्यापासून पम्या खूप दूर आला होता .. तरी मनाच्या एका कोपऱ्यात “शेजार” दडला होताच …त्यामुळे कधी कधी एकांतात अस्वस्थ वाटायचं ….सुरवातीला “कळतंय पण वळत नाही” असं व्हायचं …… नंतर नंतर सगळं विस्मृतीत गेलं आणि ते कळणंही बंद झालं …. काळ पुढे सरकत होता ….. प्रमोद साहेबांची वयाची पन्नाशी उलटून गेली होती …. मुलगाही शिक्षणासाठी परदेशात … सगळं लाईफ एकदम सेट !! ..
अशाच एका रात्री प्रमोद घरी एकटा होता… अजिबात झोप येत नव्हती….. पुष्पक मधल्या कमल हसन ची stage एकदम …. पम्याची बायको कोणाच्यातरी मंगळागौरीसाठी माहेरी गेली होती पण जागरण मात्र याचं होत होतं . मनात अनेक विचार फुगड्या घालत होते …. घुसमट होत होती ….. स्वतःचाच सगळा जीवनपट डोळ्यासमोर येत होता.. वाडा , तिथले दिवस आणि त्याच्या उत्कर्षात महत्वाचा वाटा असणारं त्याचं “शेजार” ….. सगळं सगळं तरळत होतं ….. अलिशान घर खायला उठलं होतं ….. “स्वामी तिन्ही Flat चा .. शेजाऱ्यांविना भिकारी” अशी गत … . डोकं सुन्न…. सूर्य कधी उजाडतोय असं झालं होतं ….. जरा फटफटल्यावर सुजलेले लाल डोळे चोळत तडक गाडी काढली आणि वाडा गाठला …..त्या वेळचे बहुतांशी सर्वच ज्येष्ठ नागरिक एव्हाना “वरच्या” वर्गात गेले होते आणि त्यांचे वारसदार देखील इतरत्र पांगले होते ….मालकांच्या कोर्ट कचेरीच्या वादात अडकलेला फडके वाडा आता “पडका वाडा” झाला होता … विहीर बुजलेली , तगर कोमेजलेली अन “चाफा बोलेना” झाला…. पालिकेनी “धोकादायक” चा बोर्डही लावला होता … जुन्या आठवणी सोडल्यास बाकी कसलंच अस्तित्व नव्हतं तिथे …… याच्या डोळ्यासमोर मात्र तो निष्प्रभ वाडा अचानक जिवंत झाला … सिनेमात कशी अचानक time frame बदलते तसं ….. त्याला समोर २५-३० वर्षांपूर्वीची लगबग असणारी सकाळ दिसत होती .. त्याचे डोळे पाणावले…. याच संधीचा फायदा घेत प्रमोदचं एक मन पम्याचं शरीर घेऊन उसळी मारत त्यांच्या घराच्या बाल्कनीत पोचलं…. या “पन्नाशीच्या प्रमोदला” समोर , घराच्या बाल्कनीच्या कठड्यावर हात ठेवून आपल्याकडे बघत हसणारा “विशीतला पम्या” दिसू लागला ….. आणि त्या दोघांमध्ये उभी ठाकली होती सरलेल्या काळाची एक अदृश्य “दिवार” …. पम्याचं ते “समाधानी” हसू पाहून प्रमोदच्या “बच्चन” मनाला कंठ फुटलाच ……” तू का असा हसतोस रे ??… मेरे पास मकान है, गाडी है, बँक बँलन्स है … तुम्हारे पास क्या है ???”…… आणि समोर उभ्या पम्याच्या “शशी” मनातून हळूच तृप्त आवाज आला “”मेरे पास “शेजार” है “ !!!!
©️ क्षितिज दाते , ठाणे
Leave a Reply