हल्ली कालगणनेत लंडन शहराजवळची ग्रीनीच ही प्रमाणवेळ मानली आहे. पण त्यापूर्वी शेकडो वर्षे उज्जैनीला हा मान मिळत होता.
ऋग्वेद ही जगातील सर्वांत प्राचीन रचना आहे. त्यात खगोलशास्त्राचे अनेक उल्लेख आहेत.
इ.स.पूर्वी 400 वर्षांपासून उज्जैनीची वेळ प्रमाणवेळ असल्याचा उल्लेख भारतीय ग्रंथात आहे. ‘सूर्यसिद्धान्त’ हा खगोलशास्त्रावरील आद्यग्रंथ उज्जैनीमध्ये लिहिला गेला. त्यात कर्करेषा व मुख्य माध्यान्हरेषा यात उज्जैन शहर वसले असल्यामुळे कालगणनेत या शहराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
भारतीय पंचागशास्त्राप्रमाणे सूर्य हा कालगणनेचा मूलाधार आहे. माणसाच्या श्वास-निःश्वासाची नोंद कालगणनेत घेतली जाते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ घटी, पल, विपल अशा लहान भागांत विभागला आहे. दिवस, आठवडा, महिने, ऋतू वर्षे, वर्षांचे युग, युगांचे महायुग हा भारतीय कालगणनेचा क्रम आहे.
चोवीस तासांच्या कालखंडाचे 360 अंश 21,600 कला आहेत. ही सामान्य निरोगी माणसाच्या श्वासोच्छ्वासांची अंदाजे संख्या आहे. अशी आपल्या पंचांगात ही नोंद आहे.
— दत्तात्रय गोपाळ खरे
मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिका या मासिकाच्या मार्च 2003 च्या अंकातून साभार..
Leave a Reply