शेतीमातीचे प्रश्न नवे नाहीत. ते आदीम काळापासून आलेले आहेत. जो दुसऱ्याला जगवितो त्याच्या स्वतःच्या जगण्याचे काय ? या प्रश्नाने अश्वस्थ झालेले आणि स्वतः घेतलेले अनुभव आविष्कृत होण्याची तडफ कवितेतून मांडणारे डॉ.प्रभाकर शेळके हे ‘करपलं रान सारं’ या कवितासंग्रहातून व्यक्त होतात. मिरगाचा खेळ,दु:ख सांदीत ठेऊन, निबर मनाने, बया काटेरी उनगा, बेंदाड अंगावर येणार , चिभडं पिकांचा हुडहूड होम अशी शब्दरचना ग्रामनात्याची साक्ष देतात. धान्य पिकविले जाते. ते विकले जाते. शेतकऱ्यांची पदोपदी पिळवणूक होते.हे सांगताना ते म्हणतात.
करपलं रान सारं,झाला डागीनचा वाडा
गाव वेशीला टांगला,ह्यो ग जन्माचा ख्वोडा
गावचं गावपण हरवत चाललय. शहराच्या ओढीनं माणसं जास्त व्यावहारिक बनत आहेत.गाव, गावचा मळा, माणसाचा लळा ओसाड होतो की काय ?अशी अनामिक भिती कवीला सतावते आहे. ‘गेला गावकुस’ या कवितेत ते खंत व्यक्त करतात.
गेला गावकुस गेला लपंडाव
व्यसनाचे पेव आता गावांमध्ये
अध्यात्माची वाटचाल पुर्वीइतकी निर्मळ आता राहिलेली नाही. देवाच्या वाटेवर भक्तीमार्गाचा वास असतो तरी अपघातात मरण येते. तोंडामध्ये ईश्वराच्या नामोच्चार असतो मग असे का घडावे? देवाच्या नावाने धर्मभोळेपणा जपला तर जात नाही ना? हे विचारण्याचे धाडस कवीने दाखविले आहे.
असं दिंडीचं मरण
उभ्या जन्माची जिभाळी
सवसांज आहेवाची
कशी रडते आभाळी
‘करपलं रानं सारं ‘ हा कवितासंग्रह वाचताना काही प्रश्न उभे केले आहेत. तर काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.ते म्हणतात काळ्या आईच्या प्राक्तनातून माझ्या भूमियांच्या वेदनेचे कढ मला नेहमीच अस्वस्थ करत आले. खरेतर अस्वस्थताच लेखनाची उर्जा असायला हवी. आजची गावखेड्याची अवस्था पाहून कवी गलबलतो. कुणब्यांची दु:खसल कुणबावा असल्याशिवाय मांडता येत नाही. अनुभवाची शिदोरी पाठीशी लागतेच.
कुणबी कर्जात बुडाला
सालदार घेई झोके
मोंढ्यामंदी टपलेले
त्यांच्या मालावर बोके
साध्या शब्दात समर्पक आशय कवीने मांडला आहे. जालना हा मराठवाड्यातील जिल्हा. तेथील बोलीभाषेचा शब्दपरिपोष कवितासंग्रहात जाणवतो.तो स्वाभाविक आहे.करपलं रान सारं मध्ये पाच श्रृंगारिक लावण्यादेखिल आहेत. हायकू हा काव्यप्रकार कवितासंग्रहात आला आहे. बेकारीचे चटके उद्धृत केलेले आहेत. ही प्रचंड मोठी समस्या आहे. खेड्यातील तरूण युवक शहरांकडे धावत आहे. पोटाचे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. या बाबतीत हा संग्रह नाविन्याचा शोध घेत आहे.एकूण बासष्ट कवितांचा समावेश यात आहे. सरदार जाधव यांनी केलेले मुखपृष्ठ बोलके आहे. कुंडलिक अतकरे यांनी देखणा कविता संग्रह बनविला आहे.फक्त एकाच विषयावरील कवितांचा समावेश होणे शक्य झाले असते तर वेगळी झालर प्राप्त झाली असती. सर्वच कविता गेय आहेत. नादनिर्मितीमुळे हृदयापर्यंत भिडतात.
करपलं रान सारं (कवितासंग्रह)
डॉ. प्रभाकर शेळके
कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद
पृष्ठे;७१ मुल्य ; ७०₹
विठ्ठल जाधव
शिरूरकासार,बीड
सं.९४२१४४२९९५
Leave a Reply