अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये सौ. इंदिरा दास यांनी लिहिलेली ही कविता
नतमस्तक तुझ्या चरणी हे प्रभू मी सदा
बरसणार कारे सुखाचा यंदा ।।
भिजले कारे काळी माती
होतील कारे तडे हद्दपार
उगवतील कारे टपोरे मोती
बनेल शिवार हिरवे गार
नको गुरांचे हाल अन् खेळ जिवाशी औंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा…।। १ ।।
देशील कारे आनंद आमुच्याही वाटी
भरशील कारे पैशानी झोळी मोठी
नको तो अवकाळी पाऊस
नको तो गारपिटाचा मारा
नको कर्जबाजार अन् फाशीचा फंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा…।।२।।
पेरीन मी बियाणे पांघरुन काळी माती
वाढतील रोपे शेतामंदी करतील दाटी वाटी
करीन मी मशागत अन् कापणी मळणी
भरीन माझे घरकुल धानियांच्या कणग्यांनी
नको करु देवा चुराडा सपनाचा अन् नशिबाचा सौदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा…।।३।।
देवानी दिल रे परी दैवानी नेलं
सौदा कराया मंदीमंदी आला दलालं
झाला दलालं शिरीमंत, मी मात्र कंगाल
फेडू कसे कर्ज आता, झालो मी हवालदिल
देवा नको हा नशिबाचा सौदा अन् दलालीचा धंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा…॥४॥
– सौ. इंदिरा दास मैत्री गार्डन, ठाणे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
Leave a Reply