एका चोराने देवळातली घंटा चोरली व तो जंगलातल्या बाजूने पळून गेला. जंगलातून जाताना चोराला वाघाने ठार केले. चोराने चोरून नेलेली घंटा जंगलातच पडून राहिली. पुढे ती घंटा एका माकडाला सापडली. माकड आपले दररोज दिवसा रात्री जोरजोराने ती घंटा वाजवी. जंगलाजवळच्या गावात त्या घंटेचा आवाज ऐकू येई. गावातील लोकांना वाटे रात्री, अपरात्री घंटा कोण वाजविते?
असेच काही दिवस गेले. एकदा एका गावकऱ्याची चरायला गेलेली गाय परत आलीच नाही. पुढे एकदा जंगलाच्या तोंडाशी माणसाचे कपडे व वहाणा दिसल्या. लोक आपसात बोलू लागले, “जवळच्या जंगलात राक्षस रहात असावा. तो दिवसारात्री घंटा वाजवीत असावा.” लोक अगदी घाबरून गेले. जंगलाच्या बाजूने कोणीही जायला तयार होईना. राजाला ही बातमी कळली. त्याने राज्यात दवंडी पिटली, ‘जो कोणी राक्षसाला ठार करील, व त्याच्या जवळची घंटा घेऊन येईल, त्याला मी दहा हजार रुपये बक्षीस देईन. दवंडी पिटवूनही राक्षसाला ठार करण्यास कोणी पुढे येईना. शेवटी एक शेतकरी पुढे आला व म्हणाला, “ महाराज, मला आज्ञा द्या, मी त्या राक्षसाला ठार मारतो व त्याच्या जवळची घंटा घेऊन येतो.”
दुसरे दिवशी तो धीट शेतकरी जंगलात जायला निघाला. जंगलात शिरतो न शिरतो तोच त्याला घंटेचा आवाज ऐकू आला. शेतकरी इकडे तिकडे पाहू लागला; तोच त्याला झाडावर एक माकड घंटा वाजवीत असलेले दिसले. आता ही घंटा कशी मिळवावी, या विचारात तो असता, त्याला एक युक्ती सुचली. तो जंगलातून परत आला. बाजारात गेला. त्याने पेरू, द्राक्ष, केळी, आंबे इत्यादी फळे विकत घेतली व ती टोपलीत भरली.
दुसरे दिवशी तो शेतकरी ती फळांनी भरलेली टोपली घेऊन जंगलाकडे निघाला. इतक्यात त्याला ‘घण् घण्’ असा घंटेचा आवाज ऐकू आला. माकड एका झाडाच्या फांदीवर बसून घंटा वाजवीत असलेले दिसले. शेतकरी हळूच त्या झाडाखाली गेला आणि त्याने ती फळांनी भरलेली टोपली त्या झाडाखाली ठेवली व आपण दुसऱ्या झाडाआड जाऊन बसला. थोड्या वेळाने त्या माकडाचे लक्ष त्या फळांनी भरलेल्या टोपलीकडे गेले. टोपलीतील फळे पाहून माकडाच्या तोंडाला पाणी सुटले. ते झाडावरून झरझर खाली उतरले. त्याने हातातली घंटा फेकून दिली व ते टोपलीतील फळे खाण्यांत गुंग झाले. हे पाहून तो शेतकरी झाडाआडून पुढे आला. त्याने ती घंटा उचलली व आपल्या गावाकडे निघाला.
शेतकरी राजाकडे आला. त्याने ती घंटा आपल्या महाराजांना दाखविली व म्हणाला, “ महाराज, राक्षसाला ठार मारून त्याच्या जवळची घंटा आणली आहे.” महाराजांनी शेतकऱ्याला शाबासकी दिली व दहा हजार रुपये बक्षीस दिले.
[ ‘बालसुधा’, पुस्तक २ रे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. ७-१०]
Leave a Reply