काल मनोहर पर्रीकर गेले. उभा देश हळहळला. ते ज्या पक्षाचे नेते होते, त्या पक्षाला पर्रीकरांचं जाणं म्हणजे ‘पक्षा’चं मोठं नुकसान झालं असं वाटणं अगदी सहाजिक आहे. ते ज्या पक्षांचे नव्हते, त्यांना ‘राजकारणा’चं मोठं नुकसान झाल्यासारखं वाटलं. त्याहीपेक्षा अचंबित करणारी गोष्ट म्हणजे, ज्यांचा राजकारणाशी फक्त निवडणुकांपुरताच संबंध येतो, अशा करोडो सामान्य लोकांना पर्रीकरांचं जाणं म्हणजे ‘देशा’चं नुकसान झालं असं वाटलं. सामान्यजणांचं ह हळहळणं ‘राजकीय’ नव्हतं, तर मनापासूनचं होतं, हे जाणवत होतं..! एक अटलजींचा अलिकडचाच अपवाद सोडला तर, सामान्य जनतेला असं वाटणं, ही सध्याच्या गढुळलेल्या वातावरणात काहीशी आश्चर्याचीच बाब..!!
तसं पाहायला गेलं तर, मनोहर पर्रीकर काही राष्ट्रीय राजकारणात फार सक्रीय नव्हते. केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी पार पाडलेली अल्पकाळाची जबाबदारी वगळता, त्यांची संपूर्ण कारकीर्द जास्तकरून गोव्यापुरतीच मर्यादीत होती. लोकसभेच्या अवघ्या दोन जागा असलेलं, गोवा देशातील सर्वाच लहान राज्य. असं असुनही या लहानश्या राज्यातलं एक व्यक्तिमत्व अखील भारतीय का होतं, त्यांच्या जाण्याने अख्खा देश का हळहळतो, असं काय वेगळेपण होतं या माणसात, याचा विचार करता, हाती लागतं ते एक कारण आणि ते म्हणजे त्यांचा साधेपणा आणि रोजच्या जगण्यातला सहजपणा. मला वाटतं, हा साधा-सहजपणाच या देशातील लोकांना जास्त भावला असावा आणि म्हणून ते देशाच्या राजकारणात नसूनही साऱ्या देशाचे झाले..! हे भाग्य देशाच्या राजकारणात तप्त सूर्याप्रमाणे तळपणाऱ्यांना लाभेल की नाही ते खात्रीलायकरित्या सांगता येत नाही..!
भारतीय जनमाणसाच्या मनाला साधेपणा प्रचंड भावतो. त्यातही उच्च पदावर आरुढ झालेल्या कोणाही व्यक्तिमत्वाचा वागण्या-बोलण्यातला साधेपणा, त्या व्यक्तीचा आपल्याशी संबंध येवो वा न येवो, अखिल भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या कोणत्याही माणसाच्या मनाचा ठाव घेतो. उच्च विचारसरणी असुनही साधी राहाणी असलेले गांधीजी म्हणूनच सर्व देशाचे झाले असावेत. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेकांच्या मनात किंतू-परंतु असले असतील, परंतु त्यांचं ‘नंगा फकीर’ असणं सर्वच जनतेला भावलं होतं. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर वर्षातल्या काही काळातले नेते जनतेला आपले वाटत, त्या मागचं कारणही बहुतेक हेच असावं. ते सर्वच नेते साधा झब्बा-लेंगा, शबनम बॅग, साधी चप्पल आणि सार्वजनीक वाहनांनी फिरणारे असत.
आपल्यालारखेच कपडे घालणारा, आपल्यासारखाच टपरीवर चहा कटींग चहा पिणारा, आपल्यालारखाच हसणारा-बोलणारा-वागणारा कुणीही नेता सामान्य जनतेला आपला वाटतो. पर्रीकरांचं वेगळेपण होतं ते इथेच..! साधा अर्ध्या बाह्याचा बुशकोट, साधीच पॅंट, एकवादी चप्पल आणि बुलंद भारत की बुलंद तसवीर असणाऱ्या ‘हमारा बजाज’ वरुन फिरणारे पर्रीकर जनतेला, सर्व जनतेशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध न येताही, तिचे स्वत:चे वाटले, ते त्यामुळेच असावेत..! विशेषत: रोज सकाळ-संध्याकाळ वेगवेगळ्या, महागड्या जाकीट-कोटात दिसणाऱ्या आणि रणगाड्यांसमान फाॅर्च्युनर गाड्यांतून, मटणाची चालती बोलती दुकानं वाटावीत अशा बाऊन्सर्ससच्या गराड्यात सदोतीत वावरणाऱ्या, वर स्वत:ला ‘सेवक’ आणि ‘फकीर’ म्हणवणाऱ्या नेत्यांच्या आणि किरकोळ कार्यकर्त्यांच्याही पार्श्वभुमीवर मनोहर जनतेला मनोहारी वाटले असावेत. काल ज्यांनी ज्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली, त्या सर्वांच्या बोलण्यात पर्रीकरांचा साधेपणा हा एकमेंव समान मुद्दा होता..!!
मी पूर्वी जेंव्हा ‘जन्मकुंडली’ पाहायचो, तेंव्हा अनेकजण माझ्याकडे कुंडली पाहायला यायचे. त्यातील अनेकजणांचा प्रश्न ‘मला राजयोग आहे का’ असा असायचा. त्यांना तसं कुणा ज्योतिषांने पूर्वी सांगितलेलं असायचं, असं त्यांचं म्हणणं असायचं. मी त्यांना ‘राजयोग’ म्हणजे त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे, असं विचारायचो. त्यावर त्यांचं उत्तर असायचं राजासारखं ऐश्वर्य..!
आपली गफलत होते ती इथेच. शब्द नीट लक्षात न घेतल्याने. ‘राजयोग’ या शब्दातला पहिला ‘राज’ हा शब्द सर्वांच्या चटकन लक्षात येतो, पण दुसऱ्या ‘योगी’ या शब्दाकडे सर्वांचंच दुर्लक्ष होतं. आपल्या भारतीय संस्कृतीत राजा हा योग्यासारखा वागावा हे अपेक्षित असतं. आधुनिक शब्दांत सांगायचं तर तो ‘ट्रस्टी’ असतो. सर्व संपत्ती ही प्रजेची असून मी तिचा रखवालदार (चौकीदार हा शब्द मी मुद्दाम टाळलाय) आहे, असा त्याचा अर्थ. योगी या शब्दाचं हिन्दीत जोगी होतो. म्हणजे संन्यासी. मला वाटतं पर्रीकर असे राजयोगी होते. गोव्याचे तीन-चारवेळा मुख्यमंत्री, काही काळ देशाचे संरक्षण मंत्री ह्या ‘राजा’सम पदांवर असुनही ते सदैव वावरले ते एखाद्या ‘योग्या’च्या भुमिकेत. सत्ता-संपत्तीचा त्यांनी स्वत:च्या अर्ध्या बाह्यांना विटाळ होऊ दिला नाही, असं त्यांच्या विषयी सर्वच जे म्हणतायत, त्यावरून निष्कर्ष काढता येतो. नेत्या-जनतेसकटचे पर्रीकरांविषयी काढले गेलेले उद्गार ‘गेलेल्या विषयी वाईट बोलू नये’ या प्रकारचे नक्कीच नव्हते. ते अंत:करणापासूनचं विव्हळणं होतं. असं विव्हळायला लावणारे मनोहर पर्रिकर शेवटचे. राजयोग म्हणतात तो हा..! त्यासाठी भगवी वस्र परिधान करुन देखावा करायची आवश्यकता नसते.
संरक्षण पर्रीकर संरक्षण मंत्र्यांच्या भुमिकेत असताना सर्जिकल स्ट्राईक झाला. त्याचं भांडवल त्यांच्याच पक्षाचे नेते करत असताना, संरक्षण मंत्री असलेले पर्रीकर मात्र ‘मी माझं कर्तव्य केलं’ याच भावनेने निर्लेपपणे वावरत होते. तेंव्हा मला ते ‘संन्यस्त योद्ध्या’सारखे वाटले होते. त्यातही त्यांनी त्यांचं संन्यसत्व सोडलं नाही. हा त्यांचा अभिनिवेश नव्हता, तर अगदी सहज म्हणावा असा अंगभूतपणा होता..!
सध्याच्या ‘सेवक’ आणि ‘योगी’शब्दांतून, त्या शब्दांत अपेक्षित असलेल्या नम्र सौम्यपणापेक्षा आक्रमक आक्रस्ताळेपणाच उठून दिसणाऱ्या राजकीय पार्श्वभुमीवर, मनोहर पर्रीकरांचा साधे-सौम्यपणा उठून दिसतो, तो ते राजयोगीपणा जगल्यामुळेच..!!
शेवटचा राजयोगी गेला..!
–©️नितीन साळुंखे
9321811091
18.03.2019
Leave a Reply