जाणिवा ओल्या हव्या सखे
शब्दांचं कोरडेपण नको
शुभेच्छा ते श्रद्धांजली
एकाच मापात तोलणं नको
दिवसामागून रात्री जातात
तसेच प्रहर ढकलू नको
एक एक क्षण जगून घे
शेवटी राहीलं जगायचं असं नको
भेटून घे हवं त्याला
नुसते आभासी चेहरे नकोत
नाहीतर किमान बोलून बघ
फक्त लेखणीचे खेळ नकोत
माझ्यातला ‘मी’ शोधून बघ
एकांत हवाचं एकटेपण नको
छंदांत मग्न झिंगून घे
कामात स्वतःला झोकू नको
आपल्यासाठी व्याप आहेत
व्यापांसाठी आपला बळी नको
वेगळ्या वाटांवर अडखळून बघ
वहिवाटीवरचं धोपट पळणं नको
जगणंच इतकं बेफाम धावतंय
तरीही जगणं सोडू नको
धाप लागली तर थोडं थांबून बघ
चटकन यातून पळणं नको!!
— वर्षा कदम.
Leave a Reply