गेल्या वर्षी कॉलेज ऍडमिशन च्या दिवसांमध्ये एका एनजीओ ने साधारण दहा मुलींचा ग्रुप माझ्याकडे पाठवला होता. प्रत्येकीची आई त्या एनजीओ तर्फे चालविल्या जाणाऱ्या एका उपक्रमात काम करत होती. काहींचे वडील छोटे मोठे काम करत होते तर काहींचे वडील हे घरीच बसून दारूच्या आहारी गेलेले. एक गोष्ट बरी होती की त्यातल्या बहुतांशी मुलींना दहावीला निदान फर्स्ट क्लास होता.
मी त्यांच्याशी पहिल्यांदा गप्पा मारायला सुरुवात करून त्यांना बोलके केले. मग हळू हळू त्यांना काय बनायचे आहे ते विचारू लागलो. त्यातल्या दोघी सोडून बाकीच्यांकडे सांगण्यासारखे काही नव्हते. त्या दोघींपैकी एकीला एअर होस्टेस आणि दुसरीला ब्युटीशिअन बनायचे होते.
मग मी त्या सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा विषयी सांगितले. त्या सर्व जणी डिप्लोमा करु शकतील की नाही या विषयी माझ्यासाहित इतर माझ्या टीम ला जराही शंका नव्हती. आम्हाला आमच्या शिकविण्याच्या पद्धतीवर आणि अभ्यासक्रमावर पुरेपूर विश्वास होता. या मुलींसारख्याच आमच्या इतर अनेक मुलींचे करिअर घडलेले आम्ही पाहिले होते. त्यामुळे प्रश्न फक्त त्यांच्या इच्छाशक्तीचा होता.
नंतरचे दोन तास मी त्यांच्याशी बोलत होतो. त्यांना पूर्ण कोर्स ची ओळख करून दिली, डिप्लोमा झाल्यावर त्या इंडस्ट्री मध्ये कोणते काम करतील याची कल्पना दिली, आमच्या काही सद्य आणि एका माजी विद्यार्थिनींची गाठ घालून दिली आणि इंजिनिअर बनल्यावर त्यांचे आयुष्य कोणत्या प्रकारे बदलू शकते, गरिबीच्या चक्रातून त्या कशा बाहेर येऊ शकतात या सगळ्याची जाणीव करून दिली.
माझ्याकडे असणारा डिप्लोमा कोर्स हा चार वर्षाचा असल्याकारणाने त्यात एका वर्षाच्या इंडस्ट्री ट्रेनिंग चा समावेश आहे. त्यामुळे या मुलींना जॉब मिळण्यास अडचण येत नाही. बहुतांशी मुलींना कॉलेज जॉब मिळवून देते. शिवाय या एका वर्षाच्या दरम्यान मिळणाऱ्या स्टायपेंड मध्ये त्यांच्या चारही वर्षाच्या फी ची भरपाई होते. म्हणजे तसा शिक्षणाचा खर्च शून्य. एनजीओ बरोबर झालेल्या बोलण्यानुसार या १० मुलींची अर्धी फी त्यांच्यातर्फे भरली जाणार होती आणि अर्धी फी ही डिपार्टमेंटच्या माजी विद्यार्थिनी उचलणार होत्या. त्यामुळे तसाही या मुलींवर शिक्षणाचा कोणताही आर्थिक भार पडणार नव्हता. उलट स्टायपेंड द्वारे अधिकचे पैसे त्यांना मिळणार होते. नोकरी मिळण्याची हमी तर मी आधीच दिली होती!
दुसऱ्या दिवशी दहा पैकी सात मुलींनी डिप्लोमा करायची तयारी दाखवली आणि त्या कॉलेज ला यायला लागल्या. आणि त्यांना इंडस्ट्री मध्ये नोकरी करण्याच्या पात्र बनविण्याचे चॅलेंज स्विकारायला माझा स्टाफ ही सिद्ध झाला. त्यानंतर चार पाच दिवसांन सात पैकी सहा मुली यायच्या बंद झाल्या. चौकशी केल्यावर कळले की सहा पैकी एका मुलीने सगळ्यांचे मन हे सांगून वळवले होते की चार वर्षांनी हे लोक आपल्याला पंधरा वीस हजाराची नोकरी देणार त्या पेक्षा आताच आपण कुठेतरी मॉल किंवा ब्युटी पार्लर मध्ये नोकरी केली तर तेवढे दहा बारा हजार आपल्याला सहज मिळतील, मग त्यासाठी चार वर्षे का वाया घालवायची?
खरं तर गेली वर्षानुवर्षे हेच घडत आले आहे. रोजंदारीवर काम करणारे पालक केव्हा एकदा मूल काम करण्याऐवढे मोठे होईल याचीच वाट पहात असायचे. मुलींची शाळा तर केव्हाच बंद व्हायची. त्यानंतर शाळेत जेवण मिळू लागल्यापासून त्या निमित्ताने का होईना मुलांना शाळेत पाठविणाऱ्यांची संख्या थोडी तरी वाढली. “शिकून कोण मोठा साहेब होणार आहेस आणि काय एवढे दिवे लावणार आहेस” ही मानसिकता अजून पूर्णतः नाही बदलली आहे. ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळलंय ती लोकं कसेही करून मुलांना शिकवताहेत पण या मुलींसारखे त्यांना आजच्या घडीला कमवायला लागण्यावाचून गत्यंतरच नाही किंवा ज्यांना आजच्या पुरताच विचार करण्याची सवय लागली आहे तो वर्ग तिथेच चक्रव्यूहात अडकला आहे. कसेही करून त्यांना मुख्य प्रवाहात आणता यायला हवे.
आज येऊ घातलेली मंदी, नोकऱ्यावर येणाऱ्या गदा या सगळ्याचा विचार केला तर ही परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे. येत्या काही वर्षात मुलांनी उच्चशिक्षणाची वाट न धरता लवकरात लवकर नोकरी कशी करता येईल असा विचार करायला सुरुवात केली तर याचे परिणाम खोलवर जाणवतील हे नक्की!
– #करिअरसोच
Leave a Reply