नवीन लेखन...

शिकारा – बोलका पांढरा पडदा !

आजवर चित्रपटगृहातील पांढरा पडदा “दाखवायचा”, काल मी त्याला दोन तास बोलताना पाहिलं. ही किमया साधलीय विधू विनोद चोप्राने ! शरणार्थी (?- हा शब्दच मुळात चुकीचा आहे – कोणाला शरण आलेत ते , जर मुळातून हा देश तुमच्या माझ्या इतकाच त्यांचा आहे.) काश्मिरींनी मूकपणे १९९० पासून जे सोसलंय, जे फारसं कालपर्यंत मलाच माहीत नव्हतं, त्या साऱ्यांच्या वतीने काल त्या पांढऱ्या पडद्याला बोलताना मी पाहिलं. कमल हसन च्या “पुष्पक ” प्रमाणे हा चित्रपट शब्दहीन असता तरी चाललं असतं.

शरणार्थी (refugee) च्या ऐवजी मला “निर्वासित ” हे त्यांचं अधिक योग्य वर्णन वाटतं. नेसत्या वस्त्रांनिशी, हातात मावेल तेवढं आयुष्य घेऊन ही मंडळी त्यांची “जन्नत ” सोडून आपल्या दाराशी आली आणि तेथील कॅम्पमध्ये ब्र न उच्चारता तीस वर्षे राहिली , हे जगड्व्याळ दुःख वर्णन करायला कोठलीही भाषा /शब्द पुरेसे नाहीत. स्वतःच्याच देशात स्वतःच्याच बांधवांसमोर उभं ठाकायला, तितकाच उन्नत माथा लागतो. “आमुचा प्याला दुःखाचा ” म्हणत कोणाविरुद्धही एक चकार अपशब्द नाही, सत्ताधीशांना जाब विचारणं नाही ही फक्त आणि फक्त त्या “घाटी “ची शिकवण असू शकते. या संपूर्ण चित्रपटात उद्रेक नाही ,तक्रार नाही, आवाज चढलेला नाही फक्त समोर आलेल्या भागधेयाचा निमूट स्वीकार आहे.

मलाच एकाक्षणी त्यांना ओरडून सांगावंसं वाटलं – बाबांनो, नका रे इतकं ऍडजस्ट होऊ, तुमचा टाहो जाऊ द्या आमच्या कानी ! पण  चित्रपटाच्या नायकाला निषेध करायचा एकमेव मार्ग सापडलाय – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ३० वर्षात १६०० हून अधिक पत्रं पाठवायचा, कां तर म्हणे त्यांनी निर्ममपणे शस्त्रास्त्रे पुरविली शेजारी देशाला आणि त्यांनी धरतीवरची अमनपसंद वस्ती देशोधडीला लावली. ” लीडर का काम जोडनेका होता हैं , तोडनेका नहीं ” एवढी सोप्पी नेतृत्वाची व्याख्या आम्हां व्यवस्थापन क्षेत्रातील मंडळींना आजवर सुचली नाही, त्यासाठी “शिकारा ” पाहावा लागला.

जिवलग मित्राचा नजरेसमोर आतंकवादी होताना बघायचं भाग्य (?) नायकाला मिळालं . तो आतंकवादी म्हणतो – ” आम्ही तुमचे जवान मारले , तुम्हीं आमचे साथीदार मारले . हा खेळ कधी संपलाच नाही. ” मात्र नायकाचं घर (” शिकारा ” या काव्यमय नावाचं , कारण नायक चक्क हळुवार कवी /प्राध्यापक दाखवलाय ) बांधायला एकेकाळी याच रणजी खेळाडू असणाऱ्या आतंकवादीने स्वतःच्या घरातील पत्थर आणून दिलेले असतात. हा भाईचारा कोणाची तरी नजर लागल्याने जळून राख होतो. ग्रेसला “पक्ष्यांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी ” हे काव्य काश्मीरच्या उध्वस्तीकरणानंतर तर सुचले नसेल ना ?

त्या “शिव “ची पत्नी “शांती ” ( काश्मीर खोऱ्यासाठी काय कॉन्ट्रास्ट नांव आहे ?) – या चित्रपटातील खळाळतं जीवन ! हसत हसत सगळं पचवायचं , नवऱ्याला पदोपदी उभं करायचं या वाटचालीत ती आतून खचते आणि मनावरचं ओझं तिचं शरीर एकदाचं झुगारून देतं. त्याआधी दैवाचे सगळे शिव्याशाप ती हसून साजरे करते. नवऱ्याला पदोपदी चिडवते. एकदा म्हणते ” लिही तुझ्या राष्ट्राध्यक्षाला – आम्ही आता तंबूतून बांधलेल्या घरात आलोय. किती ही प्रगती ! ” दुसऱ्या प्रसंगी म्हणते – “लिही तुझ्या राष्ट्राध्यक्षाला – माझी बायको आज तीस वर्षांनी लग्नाची साडी नेसून आत्ताही तशीच दिसतेय . ”

आमचे सुधीर मोघे म्हणतात तसे- ” मनाचिया घावाला, मनाची फुंकर ! ”

सगळं जिणं मनाआड करताना तिला एकदाच संधी मिळते तिच्या घरी , काश्मीरला जायची. त्यांचे घर बळकावून बसलेल्या माणसाला ती ठणकावून सांगते – ” हे घर आम्ही विकणार नाही. परत येणार आहोत कधी ना कधी ! माझी राख इथल्याच नदीत टाकायची आहे.”

आणि ती ‘गेल्यावर” अस्थिकलश घेऊन शिव गावी परततो आणि तिची इच्छा पूर्ण करतो. आता तो गांवी पडक्या घरात राहणार असतो – दिवसा गावातल्या मुलांना शिकविणार असतो आणि रोज रात्री एक अशी वर्षाला ३६५ पत्रं तिला लिहिणार असतो. ( मृत पत्नीला अशी पत्रे लिहिणारे एक सांगलीचे गृहस्थ आम्हांला  ऐकून माहीत आहेत.) आणि खिन्न हसून तिला म्हणतो – ” नाहीतरी मला राष्ट्राध्यक्षांना पत्रं लिहायची आणि त्यांची उत्तरे न येण्याची सवय आहेच. तुला स्वर्गात भेटायला आलो की एक एक चिट्ठीका जवाब मांगूगा ! ”

तिची आणखी एक इच्छा पुरी करण्यासाठी तो गावातील प्राणप्रिय घर विकतो, औटघटकेचं presidential suite मधलं सुख तिला बहाल करतो. रात्रीच्या चांदण्यात तिला ताज दाखवून तीही मागणी पूर्ण करतो. ती शांतपणे त्याच्या खांद्यावर जीव सोडते.

एक बेनझीर भुट्टोचा टीव्ही वरील भाषणाचा अंश सोडला तर भारतीय सत्ताधीश, काश्मिरातील राज्यकर्ते यांचा साधा उल्लेखही या चित्रपटात आढळत नाही.

गुलजार /अमृता प्रीतम यांनी फाळणीच्या वेदना शब्दबद्ध केल्यात , इथे “शिव” घाटीला उद्देशून एक कविता सुनावतो.

हा वेदनांचा मूक स्वीकार प्रेक्षकांना बधीर करून सोडतो. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मंडळी काल चित्रपटगृहात होती. आमचा शो संपल्यावर पडदा काहीकाळ निर्विकार झाला – पुढच्या शो च्या मंडळींना काही सांगण्यासाठी !

मला पुन्हा अस्वस्थ होण्यासाठी “शिकारा” पाहायचाय. थोडाफार हृदय नावाचा अवयव शिल्लक असणाऱ्यांनीही ही संधी सोडू नये.

शांतपणे उध्वस्त करणारे असे अनुभव वारंवार येत नसतात.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..