कोठेतरी डोंगराच्या कपारीत तो आदिवासी पाडा जगापासून स्वतःला लपवून होता. उशाला शंभर एकरच किर्रर्र आणि घनदाट जंगल. पायथ्याला खवळलेला समुद्र! कुक्कुचा पाडा! कुक्कु हे त्या पाड्याचे नाव नव्हते, तर त्याच्या मुखियाचे होते. या पाड्याचे जगच वेगळं होत.
कुक्कु उंचा पुरा भक्कम पुरुष. रंगीत पिसांच्या टोपाने तो अजूनच उंच भासायचा. पाड्यावर पोटच्या पोरासारखी माया. संकट कोणतंही असो, हा सगळ्यात पुढे! वस्तीच्या आसपास वाघाचा वावर असो कि निसर्गाचा कहर असो. अत्यंत न्यायप्रिय! त्याचे नियम मोठे विचित्र होते. पण त्याची जनता, ते नियम, निष्टेने पालन करीत असे!
आज पॊर्णिमेचा दिवस. म्हणजे न्याय निवाड्याचा दिवस! निष्पक्ष निवाड्या साठी, कुक्कु पांढऱ्या पिसांचे शिरस्त्राण घालून, आपल्या उंच दगडी आसनावर बसला होता. गावकरी समोर बसले होते. सभा सुरु झाली.
“काळू! तू कुबड्या म्हातारीचा कोयता चोरलास असे ती म्हन्तिया. तुला गुन्हा मान्य हाय का?”
“नाही! देवा! मी त्यो कामासठी उसना घेतला व्हता. माझे काम झालं, मंग काल मी परत बी दिला!”
“म्हातारीचं काय म्हनन हाय?” म्हातारी कडे आपला मोहरा वळवत कुक्कुने विचारले.
“देवा! घटकाभरात देतो म्हनून, कोयता नेला. चारदिसान, सतरा खेटे मारल्यावर देला! मला, या पावसाच्या दिसात वाळकी फांदी तोडायला, नारळ छीलायला रोजच लागतो. मजा हात मोडल्यागत झाल्ता. मी काल ‘देवाला सांगीन!’ म्हनाले तवा म्हागारी केला.”
“म्हातारी खोटं बोलतीया!” काळू ओरडला.
सभेत कुजबुज वाढली.
कुक्कुने हातातला न्यायदंड दगडावर आपटून सभा शांत केली.
“कुक्कूची खात्री झाली हाय! या म्हातारीच्या तक्रारीचा न्याय निवडा झाला! माझा निवडा समद्यांनी ऐका! काळू! तुला शरम वाटाला पाहिजे! एका म्हातारीचा चार चौघात अपमान केल्यापायी, त तुला शिक्षा करणार हायच! तिला ‘खोटारडी!’ बोलून तू तिचा, आपल्या पाड्याच्या जनतेचा अपमान केलास! या पाड्यावर खोटं बोलणं ‘पाप’ समजलं जात. आमी कुबड्या म्हातारीला, आमच्या न्हानपना पसन पहातोय. ती कधीच खोटं बोलली नाही! तू मुद्दाम तिचा कोयता वेळेवर देला नाहीस! हा गुन्हा तुला कबूल हाय का?”
काळू. खाली मान घालून उभा राहिला. त्याला खोटे बोलणे जमेना.
“काळू, बोलत नाही. हि त्याची गुन्ह्याची कबुली समजून, हि सबा, त्याला न्याय खांबाला दोन दिस, दोन राती बांधूनघालायची शिक्षा देत हाय!”
काळू तरुणाला, वस्तीच्या मध्यभागी असलेल्या, मैदानात रोवलेल्या थोरल्या खांबाला, मजबूत वेलींनी बांधून घातले. सगळे आपापल्या झोपड्यात परतले. कुक्कूच्या नियमाप्रमाणे, रोज एक जण काळूला जेवण भरवणार होता. त्याचे हात सोडायची मुभा नव्हती.
म्हातारीने, पहिला दिवस, आपण काळूच्या जेवणाची सोय करणार असल्याचे कुक्कुला सांगितले.
सकाळी तिने नारळाच्या दुधात गूळ घालून, शिजवलेला गोड भात करून आणला होता. बुधल्यातल्या पाण्याने काळूचे तोंड पुसून घेतले. आधी त्याला घोटभर पाणी पाजले. रातभर उभा राहून नरडं सुकून गेलं आसन. म्हातारीच्या मनात येउन गेलं.
“काळू, लेकरा कशापाई असं वागतेस? माग, रानात माज्या माग लांडगा लागला तवा. तूच त मला बाजूला सारून, त्याला पळवून लावलं व्हतस. याद हाय का? तू चांगला हैस! गुणी हैस. होत कदी कदी असं वंगाळ काम मानसाच्या हातून. देवाची माफी माग. अन पुन्ना असं करू नगस! आख्खा पाडा तुज्यावरून जीव ववळून टाकतोय!” एकीकडे म्हातारी बोलत होती. दुसरीकडे गोडाचा भात त्याला भरवत होती. तो लांडग्यांचा प्रसंग काळूच्या डोळ्यासमोर तरळून गेला.
दुपारी, चंडी तांदळाची भाकरी अन मिरचीचा खर्डा घेऊन आला.
“काळ्या, काय अवदसा सुचली मर्दा तुला? तू इतका उमदा गडी, माझ्या सुमीच्या लग्नात घरच्या सारखा राबलंस. तू मोठा सच्चा मानुस! झाली आसन एखांदी गल्ती. हितन दे सोडून हे वंगाळ वागणं! हो पैल्या सारखा सच्च्या! तुह्या सारक गरम रंगत, पाड्याची हिम्मत असावी का चोर? तूच ठरीव!” भाकरी भरवून, लोटाभर पाणी पाजून चंडी निघून गेला. त्यानंतर पाड्यावरचे सगळेच जण, एक- एक करून,’तू कसा चांगला आहेस’ हे काळूला सांगत होते. काळूला आपण क्षणिक मोहाच्या आहारी जाऊन, तो म्हातारीचा कोयता बळकावण्याचा डाव टाकला होता. त्याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. दुसऱ्या दिवशी त्याच्या मनात, एकीकडे झाल्या चुकीबद्दल खंत वाटत होती, तर दुसरीकडे पाड्याचा, इथल्या लोकांचा आपल्यावर किती जीव आहे, किती आपुलकीने वागतात याचा अभिमानपण वाटत होता. बाकी लोकांचं जाऊ द्या, आपली तक्रार करणारी म्हातारी, जिचे आपण गुन्हेगार आहोत, तिने गोड भात आपल्या हाताने खाऊ घालावा? या सारखा दुसरा आशीर्वाद या जगात दुसरा नाही! तिने सुद्धा मला माफ केलाय.
दिवस मावळला. कुक्कु हातात कुऱ्हाड घेऊन झोपडी बाहेर आला. मैदानात गावकरी जमले होते. कुक्कुने कुऱ्हाडीने सपासप दोन वार करून बांधलेल्या वेली तोडून टाकल्या आणि काळूला मोकळे केले.
“काळू! शिक्षा संपली! इथल्या कायद्या परमान, पाड्यावर रहायच का नाही, ते तूच ठरवायचं. जायच त जा! अन हितच रहायचं आसन त, पाड्यां तुला का ठिवून घ्यावं? हे सांग!”
“देवा! चुकी झाली मज्याकुन! या पूड असं करनार नाय! मी त्या म्हातारीच्या घरी रहावं म्हणतुया! तीच वय झालंय. काटक्या कुटक्या आनुन देत जाईन. बनलं तस संभालिन तिला. मला कोन नाय, तिला बी कोन नाय! मला आय भेटन, तिला ल्योक! म्हनून पाड्यान मला ऱ्हाऊ द्याव!”
जमलेल्या गावकऱ्यांनी काळूची मागणी मान्य केली. आनंदी आनंद पसरला. झोपड्यातुन मोहाच्या दारूचे गाडगे आणून, वाटप होऊ लागले.
तर हि झाली गोष्ट.
मुळात, कोणताच माणूस ‘गुन्हेगार’ म्हणून जन्मत नाही. परस्थिती त्याला घडवत असते, असं म्हणतात. खूप पूर्वी ‘जेल रहित राज्य!’ हि कल्पना माझ्या वाचनात आली होती. कदाचित त्याची मूळ या कथेत असावीत.
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
(मूळ कल्पना नेटवरून)
Leave a Reply