रहस्यकथा क्रमांक १४
भाऊसाहेब दोडके पाटील हे महाराष्ट्रातील शिक्षण सम्राटांपैकी एक. इंजिनिअरींग, मेडीकल, मॅनेजमेंट, अशा सर्व प्रकारची महाविद्यालये त्यांच्या संस्थेशी संलग्न होती आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी होती. अशा शिक्षणसम्राटांनी लोकांची गरज ओळखली. मोजक्या जागामुळे आधीची व्यवस्था फार अपुरी पडत होती. आपल्याला काहीं त्या संस्थांचं ॲाडीट करायचं नाही. आपल्याला फक्त दोडके पाटीलांच्या वारसांच यशवंतांकडे आलेलं प्रकरण पहायचंय.
शिक्षणसंस्थेचा ट्रस्ट असतो. विश्वस्त असतात पण अधिकार सर्व सम्राटांकडेच असतात. आताच्या दिवसांत शिक्षणाकडे फक्त उदात्त दृष्टीकोनांतून पाहिलं जात नाही. तो ही एक व्यवसाय आहे. व्यवसाय म्हटला तर नफा तोटा आलाच की.
शिक्षण संस्था चालवणाऱ्याची ती खाजगी मालमत्ताच असते. भाऊसाहेब दोडके पाटील आपल्यामागे कोणाला आपला शिक्षण सम्राटाचा वारसा सोपवणार, ह्या बद्दल लोकांच्यात चर्चा चालू असे. त्यांचे दोन पुत्र होते. त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता फारशी नव्हती. त्यामुळे त्यांनी मृत्यूपत्राप्रमाणेच शिक्षण संस्थेचे अधिकार त्यांनी सोपवायचे होते. त्यांचे दोघे पुत्र त्यांनी त्यांच्याच उद्योगात नेमले होते. मुलांना द्यायला बक्कळ पैसा होता. हा शिक्षणाचा वारसा कुणाकडे द्यायचा हा त्यांना प्रश्न होता. यशवंत धुरंधरांची आणि त्यांची जुनी मैत्री. ते यशवंतांचा सल्ला घ्यायला आले होते. यशवंतांना माहित होतं की दोडके पाटीलांनी स्वत:चं शिक्षण मेहनतीने पूर्ण केलं होतं. पीएचडी पण मिळवली होती.
दोडके पाटील यशवंतांच्या घरीच भेटले. यशवंताना ते म्हणाले, “यशवंतराव, हा मोठा घोर आहे बघा. आमच्या सगळ्या शैक्षणिक संस्था नांव राखून आहेत. आमच्या मागे कारभार कुणावर सोपवावा, हेंच समजेनासं झालंय ! मोठा मुलगा बारावीतच थांबला. त्याची खूप इच्छा आहे की बापाने सगळं शैक्षणिक साम्राज्य आपल्या स्वाधीन करावं. धाकटा जेमतेम बीएस्सी. ॲग्रिकल्चर झालाय. तो समजतोय की आपण जास्त शिकलेलो म्हणजे आपणच वारस. आता तुम्हीच सांगा काय करावं ?” यशवंत म्हणाले, “भाऊसाहेब, तुमच्या मनांत दोघांनाही द्यायचं दिसतं नाही.” भाऊसाहेब दोडके पाटील मोठ्याने हंसले आणि म्हणाले, “यशवंतराव, हे तुम्ही दुसऱ्याच्या मनांतल ओळखतां ना, ते जादूपेक्षा भारी आहे बघा.”
यशवंतही हंसत म्हणाले, “भाऊसाहेब, दोन मुलांत तुम्हाला निवड करायची नाही हे नक्की. बरं ह्या शिक्षणसंस्थाच्या कामात तुम्हाला कुणी खरी मदत केली ?” भाऊसाहेब म्हणाले, “आमच्या प्रिन्सिपाल जयकरांनी. पहिले इंजिनियरींग कॅालेज काढले, त्याचे प्रिन्सिपाल होते जयकरसाहेब. मग मी त्यांना माझ्या शैक्षणिक संस्थेचे सेक्रेटरी केले. गृहस्थ एकदम प्रामाणिक, माझ्याशी आणि शिक्षणाशीही. त्यांनीच हा एवढा पसारा वाढवलाय आणि सांभाळलाय. पैसा मी दिला पण शिक्षण द्यायसाठी लागणारी माणसं त्यांनी आणली. धुरंधरसाहेब, मला माझे शिक्षणसंस्थेवरचे सर्व हक्क माझ्या मागे त्यांच्याकडेच सोंपवायचेत. मुलांना कांही कमी नाहीय.” मुंबईच्या मुक्कामांतच भाऊसाहेब दोडके पाटील ह्यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं आणि वकीलातर्फे सर्व शैक्षणिक साम्राज्याचे अधिकार आपल्यानंतर प्रिन्सिपाल जयकरांना मिळतील अशी व्यवस्था केली. मुलांना त्यात कांही अधिकार नसतील असे स्पष्ट लिहिले. मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून यशवंतांची सहीसुध्दा घेतली. खरं तर भाऊसाहेब दोडके पाटील फक्त ६५ वर्षांचे होते व त्यांची प्रकृती चांगली होती.
मृत्यूपत्र करण्याची कांही निकड नव्हती. सूज्ञ भाऊसाहेबांना ते करून ठेवणे आवश्यक वाटले होते. ह्या गोष्टीला सहा महिने झाले आणि एक दिवस भाऊसाहेब दोडके पाटील हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने गेले, ही बातमी यशवंतांनी वर्तमानपत्रांत वाचली. कांही दिवसांनी बातमी आली की दोडके पाटील ह्यांचे ज्येष्ठ चिरंजीव चंद्रसेन, दोडके पाटील शैक्षणिक साम्राज्याचे अध्यक्ष होणार. यशवंताना मोठ नवल वाटलं, “आपल्याला दाखवलेल्या मृत्यूपत्राप्रमाणे प्रिन्सिपाल जयकर, हे अध्यक्ष व्हायला हवे होते. मृत्यूपत्र बदलले असते तर भाऊसाहेबांनी नक्कीच फोनवर तरी सांगितलं असतं !”
यशवंतांनी ह्यांत लक्ष घालायचं ठरवलं. दोडके पाटीलांच्या मुंबईतील वकीलाला ते भेटले. वकील म्हणाले, “कायद्याप्रमाणे ते मृत्यूपत्र हवे तेवढ्या वेळा बदलू शकत होते. ज्या मृत्यूपत्राची तारीख अखेरची असेल, तेंच कार्यान्वित करतां येते.
मी तुम्हाला फक्त ह्या मृत्यूपत्राची प्रत देऊ शकतो.” यशवंतानी विचारले, “तुमच्याशी त्या संबंधी फोनवर तसं कांही बोलले होते कां ?” वकील म्हणाले, “त्यानंतर पुन्हां ह्या विषयावर कोणतीही चर्चा त्यांच्यात झाली नव्हती. नवे मृत्यूपत्रवाचन आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांनी एका स्थानिक वकीलावर सोपवली होती. त्याप्रमाणे ते कार्यान्वित झाले आहे.
इतर कुणाची हरकत नसल्याने त्याचा कांही भाग कार्यान्वित केला असणार.” यशवंत म्हणाले, “वकीलसाहेब, तुम्ही जाणतांच की शैक्षणिक संस्था दोडके पाटील ह्यांना कुणावर सोपवायच्या होत्या ते !” वकील म्हणाले, “हो, त्यावेळी त्यांचा तसा मनोदय होता पण नंतर बदललाही असेल.
आफ्टर ॲाल ब्लड इज थिकर दॅन…..! मुलगा मागेच लागला असेल तर बदललं असेल मृत्यूपत्र. आपण साक्षीदार किंवा वकील त्याला हरकत घेऊ शकत नाही. जर नवं मृत्यूपत्र खोटं बनवलेलं असेल तर प्रथम ते सिध्द करावं लागेल.” यशवंत म्हणाले, “माझ्या मित्राची खरी इच्छा पुरी व्हायला पाहिजे. पाहूया.” वकील म्हणाले, “आता ह्या संबंधीची नोटीस जेव्हा वर्तमानपत्रात येईल, तेव्हा आपण कदाचित हरकत घेऊ शकू.” वर्तमानपत्रांतली दुसऱ्या दिवशीची बातमी होती, “भाऊसाहेब दोडके पाटील शैक्षणिक संस्थांच्या विश्वस्त आणि सचिव प्रिन्सिपाल जयकर ह्यांचा वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा.” यशवंतानी लागलीच हालचाल करायचे ठरवले. चंदूला त्यांनी दोडके पाटीलांच्या गांवी मुक्काम ठोकून ह्याबद्दल जी जी माहिती मिळेल ती पाठवायला सांगितले. फोन करून प्रिन्सिपाल जयकरांना आपल्याला भेटायला बोलावून घेतले. प्रिन्सिपाल जयकर हुशार पण नि:स्वार्थी असल्यामुळे त्यांना ह्यांत कांही आश्चर्य वाटले नव्हते. एकदम कामच हातातून गेल्याने त्यांना औदासिन्य आले होते, इतकेच. यशवंतानी त्यांना विचारले, “प्रिन्सिपाल साहेब, भाऊसाहेब कधी तुमच्याकडे आपल्या मृत्यूपत्राबद्दल बोलले होते कां ?” प्रिन्सिपाल जयकर म्हणाले, “कधीच नाही. असं कां विचारता आपण?” यशवंत म्हणाले, “त्यांनी एक मृत्यूपत्र बनवले होते. त्यांत तुमचा उल्लेख होता. त्यात ‘सर्व शिक्षण संस्था त्यांच्या पश्चात तुमच्या हवाली कराव्या,’ असे म्हटले होते.” प्रिन्सिपाल जयकर स्तब्ध झाले. नंतर ते म्हणाले, “ते कधी कधी म्हणत, हा शिक्षणाचा कारभार तुम्ही वाढवलाय, तो कायम तुम्हालाच बघायला लागेल.” यशवंत म्हणाले, “ज्या मृत्यूपत्रानुसार मुलाने सर्व हक्क हाती घेतलेत, ते तुम्ही पाहिलेत कां ?” प्रिन्सिपाल जयकर म्हणाले, “मृत्यूपत्र वाचनाच्या वेळी मला बोलावले होते. त्यांत दोन मुलांना मालमत्ता कशी वाटावी हे दिले होते आणि शिक्षण संस्थेच्या ट्रस्टवर दोघाही मुलांना घ्यावे व अध्यक्षांचे सर्व हक्क मोठ्या मुलास म्हणजे चंद्रसेन ह्यास द्यावेत असे म्हटले होते. मला त्यांत कांही गैर वाटत नाही.
मला ज्याप्रकारे काढले, ते अयोग्य वाटले पण शेवटी ते मालक आहेत.” यशवंतांनी आपल्याकडील मृत्यूपत्राची एक प्रत त्यांना दिली व सांगितले, “तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. ह्या मृत्यूपत्रानुसार तुम्ही नवीन मृत्यूपत्राला आव्हान देऊ शकतां ! माझा कयास आहे की ते खोटे आहे.” प्रिन्सिपाल जयकर म्हणाले, “मला असं करावं असं वाटत नाही.”
यशवंत म्हणाले, “तुमच्या मित्राच्या आत्म्याला शांती मिळावी, असं वाटत असेल तर आम्हाला मदत करा.”तरीही प्रिन्सिपाल गप्प राहिले. ते गेल्यावर यशवंतानी चंदूला सांगितले, “नव्या मृत्यूपत्राची कॉपी आणि दोडके पाटिल यांच्या अचानक मृत्यूमुळे पोस्ट मॅार्टेम झालेले असल्यास त्याचा रिपोर्ट कांही करून मिळव.” चंदू म्हणाला, “मामा मी मिळवतो दोन्ही गोष्टी.” यशवंत विचार करत होते की काय घडले असू शकेल. चंदू मनांत दोन्ही डॅाक्युमेंटस कशी मिळवावीत, ह्या साठी वेगवेगळे बेत करत होता व कुठला मार्ग नक्की यश देईल, ह्याचा विचार करत होता. मृत्यूपत्राची प्रत स्थानिक वकीलाकडे आहे. त्याच्या एखाद्या कारकूनाला पैसे दिल्यास कदाचित काम होईल पण जर झाले नाही तर मग दुसरा बेत अंमलात आणणे कठीण झाले असते. दुसरा बेत कठीण होता, बेकायदेशीर होता पण यश चंदूच्या हुशारीवर अवलंबून होतं. चंदू वकीलाच्या ॲाफीसात आणि सरकारी डॅाक्टरच्या ॲाफीसात चोरी करणार होता. रात्री बारानंतर संपूर्ण काळा वेश, काळा मास्क, काळी टोपी घातलेला चंदू प्रथम वकीलाच्या ॲाफीसकडे गेला. चंदूने मोजकी छोटी हत्त्यारं जवळ ठेवली होती. दाराचं कुलुप उघडण हा त्याच्या हातचा मळ होता. तो आंत गेला व त्याने दार बंद केले. मोबाईलच्या उजेडाहून कमी उजेड देणारी बॅटरी लावून तो शोध घेऊ लागला. एक साधे कपाट व एक कॅबिनेट ह्या दोनच वस्तू त्याला उघडाव्या लागतील असे वाटले. त्याने प्रथम कॅबिनेट उघडली. त्याला त्यासाठी हत्त्यारे वापरून दहा मिनिटात चावी तयार करावी लागली. कॅबिनेटमध्ये अल्फाबेटीकल ॲार्डर दाखवणाऱ्या पट्ट्या दिसल्या. डीमध्ये दोडके पाटीलांची फाईल मिळाली. त्यांत आधीच्या मृत्त्यूपत्राची कॅापी, नव्याचे दोन ड्राफ्ट आणि एक नव्या मृ्त्यूपत्राची कॅापी मिळाली. त्याने बॅटरीचा प्रकाश वाढवून मोबाईल कॅमेऱ्याने त्या सर्वांचे फोटो काढले. तिथून तो बाहेर पडला आणि थेट सरकारी डॅाक्टरच्या ॲाफीसात पोहोचला. तिथेही कुणीच नव्हतं. तिथलं कुलुप एका हिसड्यानेच उघडलं तर कपाट लाकडाचं होतं आणि त्याला कुलुप नव्हतच. त्याने आरामशीर शोध घेतला.
रजिस्टरमधील संबंधित नोंदी आणि पोस्ट मॉर्टेम रिपोर्टची त्याने कॅापी काढून घेतली सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या आणि तो बाहेर पडला. कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला म्हणून त्याने मागे पाहिलं तर कांही लोक अपघात झालेल्या एका माणसाला सरकारी दवाखान्यात उपाय करायला आणत होते. चंदू आपल्या भाड्याच्या खोलीत आणि यशवंत घरी मुंबईला तेच फोटो पहात होते. मृत्यूपत्राच्या एका प्रतीवर जी सही होती ती सही चुकलेली होती. ती परत केली होती. म्हणजेच नव्या अंतिम मृत्यपत्रावर खोटी सही करण्याचा कोणी तरी सराव केला होता आणि तरीही तो चुकला होता. दोन्ही ड्राफ्टसमधील चुका नंतर सुधारल्या होत्या. हा पुरावा त्या मृत्यूपत्राबद्दल शंका घ्यायला पुरेसा होता आणि कठोर न्यायाधीशाला नवे मृत्यूपत्र खोटे ठरवायला पुरेसा होता. पोस्ट मॅार्टेम रिपोर्टमध्येही थोडी खाडाखोड होती तरी शेवटी नैसर्गिक मृत्यू असल्याचे स्पष्ट लिहिले होते. रजिस्टरमध्ये मात्र गुन्हेगार मुलांच सार पितळ उघडं पडलं होतं.
सरकारी डॅाक्टरने आधी मृ्त्यूचे कारण वेगळे लिहिले होते व नंतर ते गिरगटून खोडले होते. मग खाली दूसरी नोंद होती.
नैसर्गिक मृत्यू. यशवंत प्रखर दिव्यावर कागद धरून गिरगटलेला भाग वाचायचा प्रयत्न करत होते. सर्व अक्षरे कळू शकली नाहीत तरी पहिले अक्षर वि आणि शेवटचे अक्षर धा होते असावे, असे खात्रीलायक म्हणतां येत होते. योग्य साधनांनी तो शब्द ‘विषबाधा’ होता, हे तज्ञानी नक्कीच सांगितले असते. यशवंत दुसऱ्या दिवशी साहसी चंदूशी बोलतांना म्हणाले, “मुलं इथवर जातील, असं मला वाटलं नव्हतं पण त्यांनी नुसतं खोटं मृत्यूपत्र नाही बनवलं तर बापाला मृत्यूही लवकर यावा, याची व्यवस्था केली. ह्या गुन्हेगारांनी मात्र खूपच चुका केल्या होत्या. तुझ्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच !
आपण आता हा सर्व पुरावा पोलिसांकडे द्यावा आणि त्यांना शिक्षा होईलच. पहिल्या मृत्यूपत्रान्वये प्रिन्सिपाल जयकरांना सर्व संस्थांच्या विश्वस्तमंडळाचे अध्यक्षपद स्वीकारावे लागेल. b
– अरविंद खानोलकर.
वि. सू. ह्या कथेतील पात्रे, प्रसंग, घटना, इ.
संपूर्णपणे काल्पनिक आहेत, साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Leave a Reply